‘देवखेळ’ सीरिजचे होतेय कौतुक
पौराणिक कथा, गुन्हा अन् न्यायाची सरमिसळ
झी5ची मराठी ओरिजन सीरिज ‘देवखेळ’चे सध्या कौतुक होत आहे. कोकणातील फारशा ऐकिवात नसलेल्या लोककथांपासून प्रेरित देवखेळ एक गहन मानसशास्त्राrय थरारपट आहे. ही सीरिज 30 जानेवारीपासून झी5 वर स्ट्रीम झाली आहे. देवखेळ एका थरारक रहस्यावर आधारित आहे. दरवेळी होळी पौर्णिमेच्या रात्री एखाद्याचा मृत्यू होतो, हे मृत्यू न्यायाचे प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर पूजल्या जाणाऱ्या शंकासुर या पौराणिक लोककथा व्यक्तिरेखेने दिलेल्या दैवी शिक्षेची कृत्यं आहेत असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. भीती ही शांततेला अधोरेखित करते आणि सत्य विधीत दडलेले असते. पोलीस अधिकारी विश्वास सरंजामे गावात येतो, तेव्हा तो अंधविश्वासाला स्पष्टीकरण म्हणून स्वीकारण्यास नकार देतो. ही कटानुसार केलेली हत्या असल्याचे त्याचे मत असते आणि तो तपास सुरू करतो.
या सीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अंकुश चौधरी असून प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, वीणा जामकर आणि मंगेश देसाई यांच्या प्रमुख भूमिका पहायला मिळाल्या आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन चंद्रकांत लता गायकवाड यांनी केले आहे.
देवखेळ हा विश्वास आणि तर्क यांच्यातील संघर्ष आहे, विश्वास सरंजामे हा तर्कशास्त्र, पुरावे आणि कायद्यात खोलवर रुतलेला माणूस आहे, तरीही त्याला जिथे भीती, श्रद्धा आणि शतकानुशतके जुन्या अंधश्रद्धा लोकांच्या निवडी ठरवतात, अशा ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाते. कोकणातील वातावरण, शंकासुराची पौराणिक कथा आणि मानसिक तणाव या सीरिजला अविश्वसनीय हटके स्वरुप देत असल्याचे अंकुश चौधरीने म्हटले आहे.