पोलादाची मागणी 27 कोटी टनवर पोहचणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील 10 वर्षाच्या कालावधीत पोलादाची मागणी 27.5 कोटी टनपर्यंत राहू शकते, असा अंदाज डेलॉइट या सल्लागार कंपनीने नुकताच मांडला आहे. आयएसए स्टील इन्फ्राबिल्ड शिखर संमेलनात कंपनीने आपला अहवाल सादर केला आहे.
आर्थिक वर्ष 2013-14 पासून ते आर्थिक वर्ष 2023-24 या अवधीत भारतात पोलादाचा खप 5.67 टक्के दराने वाढीव राहिला आहे. ही वाढीव मागणी वार्षिक स्तरावर गणली गेली आहे. विविध क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ वाढत असून देशातील पोलादाची मागणी पुढील दशकात वर्षाला 5 ते 7 टक्के वाढीव असणार असल्याचा अंदाज डेलॉइटने मांडला आहे.
कोणत्या राज्यांचा वाटा अधिक
2033-34 आर्थिक वर्षापर्यंत पोलादाची मागणी 22 ते 27 कोटी टन इतकी होणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यात पोलादाची मागणी मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण खप पाहता या राज्यांचा वाटा यात 41 टक्के इतका राहिला आहे. पायाभूत सुविधांकरीता सरकारकडून आगामी दशकात खर्च केला जाणार आहे, ज्यात पोलादाची मागणी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
सेल करणार 6500 कोटीची गुंतवणूक
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेल ही कंपनी पोलाद उत्पादनात विकासासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये 6500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढील काही वर्षांमध्ये एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना कंपनीची असून या अंतर्गत पहिली गुंतवणूक वरीलप्रमाणे असणार आहे. चीनमधून स्वस्तात आयात होणाऱ्या धातूवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीने सरकारकडे मागणी केली आहे.