Gadhinglaj News: गडहिंग्लज उपजिल्ह्याची मागणी पुन्हा एकदा का चर्चेत आलीये?
जनतेला शासकीय कामासाठी कोल्हापूरला हेलपाटे मारावे लागतात
By : जगदीश पाटील
गडहिंग्लज : जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूरवर चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुके आहेत. तेथील जनतेला शासकीय कामासाठी कोल्हापूरला हेलपाटे मारावे लागतात. यातून वेळ, पैसा खर्च होतो. त्यामुळे गडहिंग्लज येथे मध्यवर्ती ठिकाण ठरवून जिल्ह्यातील सर्वच विभागांची कार्यालये सुरू करावीत, अशी मागणी प्रलंबित आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या निमित्ताने पुन्हा यावर भाष्य झाल्याने हा प्रश्न चर्चेत आला आहे. जिल्ह्याचे मुख्य शहर कोल्हापूर आहे. येथेच जिल्हा कार्यालय कार्यरत आहेत. पण शहरापासून चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुके फारच लांब आहेत.
येथील जनतेला कोल्हापूर गाठायचे झाल्यास कर्नाटक राज्याच्या हद्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे कर्नाटकचा वाहनांना टोलही त्यांना भरावा लागतो. शिवाय मालवाहतूक वाहनांना कर्नाटकचा टॅक्सही भरावा लागत असल्याने अडचण होत आहे.
चंदगडपासून कोल्हापूर हे अंतर सुमारे 108 किलोमीटर इतके आहे. त्यापेक्षा चंदगड तालुक्यातील कोलीक गावचे अंतर कोल्हापूरपासून 170 किलोमीटर अधिक आहे. त्यामुळे तिलारीनगर परिसरातील जनतेला कामासाठी कोल्हापूर गाठायचे झाल्यास मोठा त्रास, वेळ खर्च करावी लागते. यासाठीच गडहिंग्लजला विविध विभागांची शासकीय कार्यालये असणे आवश्यक ठरले आहे.
सध्या गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यांसाठी महसूल विभागाचे उपविभागीय कार्यालय येथे कार्यरत आहे. पण येथे जोडलेला आजरा तालुका आता भुदरगड तालुक्याला जोडला आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील जनतेला महसुली कामासाठी गारगोटीला चकरा माराव्या लागत आहेत.
वीज महावितरणचे विभागीय कार्यालय गडहिंग्लज येथेच आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय गडहिंग्लज येथेच आहे. कृषी विभागाचे उपविभागीय कार्यालय आणि उपजिल्हा रूग्णालय यांचे मुख्यालय गडहिंग्लज हेच आहे. पण अन्य विभागांची कार्यालये मात्र येथे होण्याची आवश्यकता आहे.
अपर पोलीस अधिक्षकांचे कार्यालय गडहिंग्लजला मंजूर असताना त्याचा कारभार इचलकरंजी येथून चालवला जातो. असाच प्रकार पाटबंधारे दक्षिण विभागाचा आहे. हे कार्यालय गडहिंग्लजला मंजूर असताना त्याचा कारभारही कोल्हापूरातून होतो आहे. शिवाय गडहिंग्लजला सुसज्ज त्यामुळे येथे विभागीय क्रीडा कार्यालयाची आवश्यकता आहे.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील वाहनधारकांना वाहनाच्या कामासाठी कोल्हापूर गाठावे लागते. आठवड्यातून एक दिवस कॅम्प असला तरी अन्य दिवशी अडचण होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपविभागीय कार्यालयही गडहिंग्लजला असणे आवश्यक आहे. तसेच आयकर, महसूलचे अपर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आवश्यक आहे.
आमदार शिवाजीराव पाटील यांनी गडहिंग्लजला उपविभागीय कार्यालय होण्यासाठी व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आमदार पाटील राज्यात सत्ताधारी महायुतीत सहभागी आहेत. त्यांनीच केलेली मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे आमदार पाटील यांचे गडहिंग्लज उपजिल्हा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार का? याकडे लक्ष आहे.
कोल्हापूरचे मार्ग
►चंदगड ते गडहिंग्लज-कोल्हापूर
►कोवाड ते राजगोळी, हत्तरगी, संकेश्वर कोल्हापूर
►शिनोळी ते बेळगाव, संकेश्वर, कोल्हापूर
►कानूर ते चितळे, आजरा, उत्तूर, कोल्हापूर.