‘महाराष्ट्रात झालाय असत्याचा पराभव’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रातील विजयासाठी मित्रपक्ष, कार्यकर्त्यांचे अभिनंदन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘महाराष्ट्रात आज असत्याचा पराभव झाला आहे. तुष्टीकरणाच्या नीतीला कसे हारवायचे हे आज महाराष्ट्रातील जनतेने आपल्या सर्वांना दाखवून दिले आहे. भारतातील जनतेला केवळ विकास हवा आहे, हे महाराष्ट्रातील निवडणूक मतगणनेनंतर स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील अभूतपूर्व विजयासाठी मी या राज्यातील मतदार, आमचे मित्रपक्ष आणि कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांचा मन:पूर्वक आभारी आहे, अशा भावोत्कट शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर आपला संदेश दिला आहे. ते दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात विजयोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करीत होते. झारखंडच्या मतदारांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे .
महाराष्ट्रातील जनतेने अपप्रचार आणि असभ्य वृत्तीला झटका दिला आहे. यासाठी मी महाराष्ट्राच्या जनतेचे विशेष अभिनंदन करतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काही जणांनी आम्हाला धोका दिला. आज लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. काही राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्थापोटी लोकांना जाती-जातींमध्ये विभागण्याचा आणि त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. तथापि, महाराष्ट्रातील जनतेने ‘एक है तो सेफ है’ या घोषणेला पाठबळ दिले. फूट पाडून स्वार्थ साधणाऱ्या पक्षांनी त्यांनी धडा शिकविला. जनता यासाठी योग्य संधीची वाट पहात होती. ती संधी या निवडणुकीत मिळताच जनतेने आपला हिसका दाखविला, अशी खोचक टिप्पणी त्यानी आपल्या अभिनंदनपर भाषणात केली.
मराठीतूनही काही वाक्ये
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मराठी वाक्यांचीही पेरणी केली. काँग्रेसने मराठी भाषेसाठी काही केले नाही. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुढाकार घेतला आणि तसा निर्णयही घेत मराठी जनतेची एक महत्वाची मागणी पूर्ण केली, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी मुख्यालयात जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत विजयाचा आनंद व्यक्त केला.
विरोधक सत्य पचवू शकत नाहीत`
आपल्या त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधी पक्ष सत्य पचवू शकत नाहीत. या देशातील जनतेशी त्यांचा संबंध तुटला आहे. विरोधी पक्षांची आघाडी मतदारांना तुच्छ लेखते. लोकांना खोटी वचने दिली की लोक भुलतात अशी या आघाडीची समजूत आहे. त्यामुळेच लोकांनी त्यांची अशी दुर्दशा केली आहे. यातून त्यांनी धडा घ्यावा, अशी टिप्पणीही त्यांनी केली. तुष्टीकरणाचे बीज काँग्रेसनेच या देशात रोवले. आता याचे परिणाम या पक्षाला भोगावे लागत आहेत. याच पक्षाने देशात जातीयवादाचे बीज रोवले, असा घणाघात त्यांनी केला.
घटनेचा स्वार्थासाठी उपयोग
घटना धोक्यात आहे, आरक्षण काढून घेतले जाईल अशी भीती काँग्रेसने जनतेला दाखविली. त्यांनी भारताच्या राज्य घटनेचा दुरुपयोग राजकीय स्वार्थासाठी आणि सत्ताकारणासाठी केला. काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचाही अवमान केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा या पक्षाने उपमर्द केला आहे. या सर्व प्रमादांची किंमत महाराष्ट्रातल्या सूज्ञ आणि चाणाक्ष जनतेने काँग्रेसला चुकवावयास लावली, आज काँग्रेस देशात बहुतेक स्थानी स्वबळावर सरकार बनवू शकत नाही. तो एक परोपजीवी पक्ष बनून राहिला आहे. काँग्रेस सहकारी पक्षांनाही दगा देते. त्यामुळे या पक्षाची विश्वासार्हता कमी झाली आहे. इतके पराभव होऊनही काँग्रेसची सत्तेची भूक कमी होत नाही. महाराष्ट्रातल्या या निवडणूक परिणामाने या पक्षाला त्याच्या कृत्यांची फळे भोगावयास लावली आहेत, असा टोला त्यांनी लगावला.