विरोधकांचा पराभव काँग्रेसमुळेच!
ममता बॅनर्जी यांच्या आरोपामुळे मतभेद उघड
वृत्तसंस्था / कोलकाता
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या पराभवाला काँग्रेसच कारणीभूत आहे. काँग्रेसमुळेच भारतीय जनता पक्षाला विजय मिळविणे शक्य झाले आहे, असा सनसनाटी आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी हा तसेच इतर अनेक महत्वाचे आरोप केले आहेत.
काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे देशाल सलग तिसऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार येऊ शकले. काँग्रेसने या पक्षाला काही प्रमाणात रोखले असते तरी असे घडले नसते. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नसतानाही सत्ता स्थापन करता आली. याला काँग्रेसचे दुबळेपण कारणीभूत आहे. अन्य विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाला त्यांच्या त्यांच्या प्रभावक्षेत्रात रोखण्यात यश मिळविले होते. काँग्रेसमुळे हे प्रयत्न वाया गेले, असे बॅनर्जी यांचे म्हणणे आहे.
मजबूत आघाडीचा प्रयत्न
भारतातल्या जवळपास सर्व विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भक्कम आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. प्रारंभापासूनच आमच्या आघाडीने किमान समान कार्यक्रम आणि समान निवडणूक घोषणापत्र यांवर भर दिला होता. या आघाडीचे नावही माझ्या प्रस्तावानुसार देण्यात आले होते. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसच्या नेत्यानेच करावे, असेही आम्ही ठरविले होते. तथापि, कोणताही किमान समान कार्यक्रम आणि समान निवडणूक घोषणापत्र तयार करण्यात आम्हाला शेवटपर्यंत यश आले नाही. विरोधकांच्या आघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधातच लढत राहिले. याचा लाभ भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या आघाडीतील पक्षांना झाला आणि या आघाडीला बहुमत मिळू शकले, अशी कारणमीमांसा ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या या नव्या पुस्तकात केली आहे.
काँग्रेसला यश मित्रपक्षांमुळेच
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढलेल्या दिसतात. पण काँग्रेसचे हे मर्यादित यशसुद्धा इतर विरोधी पक्षांनी त्या पक्षाला केलेल्या सहकार्यामुळेच आहे. मात्र, काँग्रेसचा अन्य विरोधी पक्षांना कोणताही लाभ झाला नाही. ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी प्रमुख लढत होती. तेथे काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या त्रुटीचा लाभ भारतीय जनता पक्षाला झाला आणि त्याच्या आघाडीची सत्ता आली, अशी व्यथा ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पुस्तकाता स्पष्टपणे मांडलेली दिसून येते.
काँग्रेसची परस्पर आघाडी
काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आणि अन्य काही राज्यांमध्ये डाव्या पक्षांशी परस्परच आघाडी करुन टाकली. या काँग्रेसप्रणित आघाडीचा भारतीय जनता पक्षाशी गुप्त समझोता होता. तृणमूल काँग्रेसची मते खेचण्यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली होती, असेही गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केले आहेत.
काँग्रेसचा प्रतिसाद नाही
ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकातील आरोपांच्या संदर्भात काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे वृत्त नाही. सोशल मिडियावर मात्र या पुस्तकाच्या आशयासंबंधी विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या काँग्रेस विरोधातील या आरोपमालिकेमुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील मतभेदांची धुसफूस अधिकच वाढेल, अशी शक्यता अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत या मतभेदांचे प्रतिबिंब या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आधीच उमटले आहे. विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीतील आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातही लढत होत आहे. विरोधी आघाडीतील इतर पक्षांनी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसला कोणत्याही विरोधी पक्षाने समर्थन दिलेले नाही.