पडझड कायम; सेन्सेक्स 600 अंकांनी नुकसानीत
गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये बुडाले : निफ्टीही घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारातील पडझडीचे सत्र कायम राहिल्याचे पहावयास मिळाले. सलग पाचव्या दिवशी बाजारात घसरण झाली आणि सप्टेंबर 2025 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण होती. शुक्रवारी रिअल्टी, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली.
दिवस अखेरीस, सेन्सेक्स 604.72 अंकांनी घसरून 83,576.24 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 193.55 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 25,683.30 बंद झाला. सेन्सेक्समधील शेअर्सपैकी, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, बीईएल, इटरनल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एसबीआय हे सर्वाधिक वाढलेले शेअर्स होते. एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि सन फार्मा हे सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत.
बाजारातील मोठ्या प्रमाणात दबाव दिसून आला. निफ्टी मिडकॅप-100 0.79 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप 1.81 टक्क्यांनी घसरला. यापैकी, एनर्जी इंडिया, एलेकॉन इंजिनिअरिंग, इंडियन एनर्जी एक्सचेंज आणि गोदरेज प्रॉपर्टीज हे सर्वात कमकुवत समभाग राहिले होते.
बाजारातील घसरणीचे कारण?
शेअर बाजारातील या घसरणीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे बाजार कमकुवत झाला. गेल्या गुरुवारी, एफआयआयने भारतीय शेअर बाजारातून सुमारे 3,367 कोटी रुपये काढून घेतले. हे सलग चौथे सत्र होते जेव्हा विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली, ज्यामुळे बाजारावर स्पष्ट दबाव आला.
यासोबतच, कच्च्या तेलाच्या किमतीही वाढत आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 62 डॉलरपर्यंत वाढली आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारताचा आयातीचा खर्च वाढतो आणि महागाईचा दबाव निर्माण होतो, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होतो.