सलग सहाव्या सत्रात घसरण कायम
सहा दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे 21 लाख कोटींचे नुकसान : सेन्सेक्स 123 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील बुधवारच्या सत्रातसह मागील सलग सहा दिवस भारतीय शेअर बाजारात घसरणीचा प्रवास कायम राहिला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात 1 टक्क्यांहून अधिकची घसरण झाल्यानंतर मुख्य निर्देशांकांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी नुकसानीसह बंद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात निराशेचे वातावरण आहे. मंदावलेली जीडीपी वाढ, देशांतर्गत कंपन्यांचे कमकुवत डिसेंबर तिमाही निकाल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे बाजारावर दबाव राहिला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 122.52 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.16 टक्क्यांसह 76,171.08 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 26.55 अंकांनी घसरुन निर्देशांक 23,045.25 वर बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स बुधवारी 100 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह खुला झाला. व्यवहारादरम्यान तो 75,388 अंकांवर घसरला होता. व्यवसायाच्या दुसऱ्या भागात निर्देशांकात रिकव्हरी आली.
6 व्यवहारांमध्ये गुंतवणूकदारांचे 21 लाख कोटी बुडाले
गेल्या (5 फेब्रुवारी) पासून शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 21 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बुधवारी (12 फेब्रुवारी) बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 4,07,46,408 कोटी रुपयांवर घसरले. 5 फेब्रुवारीत ते 4,28,03,611 कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 20,57,203 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
बाजारातील घसरणीची कारणे...
1.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, कॅनडा आणि युरोपियन युनियनने गरज पडल्यास टॅरिफला तीव्र आणि ठामपणे विरोधठ करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेत स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणखी टॅरिफचा इशाराही दिला आहे. त्याच वेळी, युरोपियन युनियन आणि कॅनडा म्हणतात की ते त्यांचे आर्थिक हित आणि त्यांचे कामगार, व्यवसाय आणि ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी कठोर आणि प्रमाणबद्ध प्रति-उपाय वापरून प्रत्युत्तर देण्याची तयारी करणार असल्याची माहिती आहे.
2.भारतीय शेअर बाजारात एफआयआयची विक्री परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात विक्री करत आहेत. एफआयआय जवळजवळ दररोज भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत. मंगळवारी भारतीय शेअर बाजारात एफआयआयने 4,486.4 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री झाली आहे.