मराठीच्या निर्णायक लढ्याचा आज पणजीत गाजणार हुंकार
पणजी : विविध मराठी गटांना प्रातिनिधिक स्वऊपात एकत्र आणून अभिजात मराठीला राजभाषा करण्याची 40 वर्षांची जुनी मागणी निर्णायक स्वऊपात धसाला लावण्यासाठी जनमत आजमावू पाहणारा नव्यानेच स्थापन झालेल्या ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ आयोजित मराठी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आज सोमवार 31 मार्च रोजी पणजीतील मिनेझीस ब्रागांझाच्या मोठ्या सभागृहात दुपारी 3.30 ते 6 या वेळेत होणार आहे. या मेळाव्यात मराठी राजभाषेच्या निर्णायक लढ्याची घोषणा करण्यात येणार असून आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. मेळाव्यास निवडक प्रातिनिधिक छोटी भाषणे होतील.
गेली 40 वर्षे मराठी राजभाषेसाठी सातत्याने समर्पित कार्य केलेले मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर व मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल. गोव्याची मूळ भाषा मराठी आहे. या भाषेतूनच आजही प्राथमिक शिक्षण दिले जाते. याच मराठी भाषेने संस्कृती, परंपरा टिकवून ठेवण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. तरीही या भाषेला सातत्याने दुजाभावाच्या वागणुकीला सामोरे जावे लागले. आता मराठी भाषेचा निर्धार हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे या निर्धार मेळाव्याला सर्व मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावून निर्धार मेळाव्याचा उद्देश सफल करावा. त्यावरच आपल्या मराठी राजभाषेच्या मागणीचे भवितव्य अवलंबून आहे, असे आवाहन राज्यनिमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी सर्व मराठीप्रेमींना केले आहे.