महावितरणच्या विरोधातील माडखोलवासियांचे जोडे मारो आंदोलन स्थगित
उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांनी तात्काळ कार्यवाही केल्यामुळे बैठकीत निर्णय
ओटवणे | प्रतिनिधी
माडखोल गावातील विविध विज समस्यांबाबत माडखोल ग्रामस्थांनी सहा दिवसांपूर्वी सावंतवाडी वीज वितरण कार्यालयासमोर उप अभियंत्यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून जोडे मारो आंदोलन छेडण्याचा इशारा देताच खडबडून जागे झालेल्या महावितरणने दोन दिवसांपासुन गावातील विविध समस्या सोडविण्यास प्रारंभ केला. तसेच उपअभियंता शैलेंद्र राक्षे यानी सोमवारी रात्री गावात जाऊन विज समस्या सोडवण्यासह वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिल्यामुळे माडखोल ग्रामस्थांनी आज मंगळवारी पुकारलेले जोडे मारो आंदोलन स्थगित केले.माडखोल उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला माडखोल गाव विकास संघटनेचे दत्ताराम राऊळ, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, बंटी सावंत, अविनाश राऊळ, दशरथ राऊळ, सहदेव राणे, संदेश राऊळ, कृष्णा राऊळ, आत्माराम राऊळ, अनंत राऊळ, प्रसाद राऊळ, रोहित राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.माडखोल गावातील विविध विजेच्या समस्याबाबत गेल्या चार महिन्यांपासून जैसे थे स्थिती असुन याबाबत महावितरणचे अनेकवेळा लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याच्या निषेधार्थ माडखोल ग्रामस्थांनी जोडे मारो आंदोलनाचा इशारा दिला होता. महावितरणने याची तात्काळ दखल घेत दोन दिवसांपासून गावातील विजपुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. तसेच उपअभियंता शैलेंद्र राक्षे यानी आपले इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सोमवारी रात्री माडखोल गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे ग्रामस्थानी मंगळवारचे जोडे मारो आंदोलन स्थगित केले. मात्र या सेवेत सातत्य न राहिल्यास पुन्हा आठ दिवसांनी जोडे मारो आंदोलनाचा छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थानी दिला.