‘मुद्रा’ योजनेचे दशक यशस्वीरित्या पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला लाभार्थींचा सत्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने साकारलेल्या ‘मुद्रा’ योजनेचे दशक पूण्& झाले आहे. या दहा वर्षांच्या काळात या योजनेतून कोट्यावधी महिलांना स्वयंरोजगारासाठी 33 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या कर्जाच्या आधाराने लघुउद्योगाचा प्रारंभ करुन अनेक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या आहेत. भारतातील एक यशस्वी लघुवित्तसाहाय्य योजना म्हणून मुद्रा योजना परिचित आहे. या योजनेच्या दशकपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी काही महत्वाच्या लाभार्थींचा मंगळवारी सत्कार केला.
मुद्रा योजनेच्या अंतर्गत महिला आणि पुरुषांही लघुकर्ज दिले जाते. हे कर्ज हमीमुक्त असते. तसेच ते सहजगत्या आणि कागदोपत्री जंजाळात न अडकता दिले जाते. आतापर्यंत 52 कोटी लोकांनी या लघुकर्ज योजनेचा लाभ उठविला असून या कर्जदारांमध्ये बव्हंशी महिला आहेत. ही योजना महिलांना सर्वाधिक लाभदायक ठरली आहे. महिलांचे कर्जफेडीचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे ही योजना यापुढे अधिक विस्तारित होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
निवासस्थानात स्वागत
या योजनेच्या काही निवडक लाभार्थींचे स्वागत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी केले. आपल्या आगमनामुळे हे निवासस्थान पुनित झाले आहे, असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. ही योजना कोणत्याही सरकारसाठी एक आदर्श आहे. सरकारने साहाय्य केल्यास किती मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभे केले जाऊ शकते, याचा एक वस्तुपाठ या योजनेने घालून दिलेला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विरोधकांवर टीका
आमचे सरकार केवळ श्रीमंतांच्या हितासाठी कार्य करणारे आहे, अशी टीका आपण वृत्तपत्रांमधून वाचली असेल. तथापि, आज माझ्यासमोर बसलेले जे लोक आहेत, ते धनिक नव्हते. तरीही त्यांना आमच्या सरकारने सुलभरित्या आणि प्रक्रियेच्या जंजाळात न अडकता कर्ज मिळवून दिले. या कर्जाच्या माध्यमातून या गरीबांनी आणि मध्यमवर्गियांनी आपले आयुष्य घडविले. हे आमच्या विरोधकांना झोंबणारे प्रत्युत्तर या योजनेच्या लाभार्थींनीच दिले आहे. ही योजना गरीबांना स्वाभिमान मिळवून देणारी ठरली आहे, अशीही प्रशंसा त्यांनी केली.
रोजगारांचे सृजन
या योजनेच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण झाले आहेत. केवळ नोकरीच्या मागे लागून आयुष्याची उत्साहाची वर्षे वाया घालविण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतेचा विकास करुन नवा व्यवसाय स्थापन करणे, हे केव्हाही अधिक श्रेयस्कर आहे. या योजनेच्या लाभार्थींनी हे दाखवून दिले. युवकांमध्ये नवे साहस या योजेनेमुळे निर्माण झाले, अशी भलावण त्यांनी केली.
महिला कर्ज फेडण्यात आघाडीवर
या योजनेचा लाभ मुख्यत: महिलांनी उठविला आहे. या महिला कर्ज फेडण्यामध्येही अत्यंत तत्पर आहेत, हे दिसून येते. त्यांनी या कर्जाचा सदुपयोग करुन स्वत:चे जीवन घडविले आणि कर्जाची परतफेडही त्वरित केली. त्यामुळे ही योजना सातत्याने कार्यरत राहिली आहे. यापुढेही ही किंवा अशा प्रकारची योजना लोकांसाठी अर्थपूर्ण ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
इन्कमटॅक्सवाला येणार नाही...
या कार्यक्रमात अनेक लाभार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. आमंत्रितांनी मोकळेपणाने आपले विचार आणि अडचणी मांडाव्यात. येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनही आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही. कारण इन्कमटॅक्सवाला आपल्या येथे येणार नाही, असाही भरवसा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांना दिल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. अनेक लाभार्थींनी या योजनेचा आपल्याला कसा लाभ झाला, याची माहिती दिली. तर काही आमंत्रितांनी सुधारणाही सुचविल्या, अशी माहिती देण्यात आली.