मठातील महाराजांच्या निधनाच्या धक्क्याने तरुणांची आत्महत्या! आंबा घाटातील घटना
सहा तासांच्या मोहिमेनंतर मृतदेह दरीतून काढले बाहेर
देवरुख प्रतिनिधी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दिसून आलेले स्वरुप दिनकर माने (24, रा. कवठेपिरान, जि. सांगली) आणि सुशांत श्रीरंग सातवेकर (19, रा. निपाणी) या दोन तरुणांचे मृतदेह तब्बल सहा तासांच्या मोहिमेनंतर दरीतून बाहेर काढण्यात पोलीस आणि ग्रामस्थांना यश आले. कागल येथील जंगली महाराज मठातील महाराजांचे निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्याने या दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.
आंबा घाटातील सडा नावाच्या दरी परिसरात वनविभागाचे कर्मचारी शनिवारी फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांना एक दुचाकी आढळली. त्यानंतर परिसरात वावरताना काही तरी कुजल्याचा वास येऊ लागला. पुढे दरी परिसरात पाहणी केली असता दोन मृतदेह त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी या बाबतची खबर तत्काळ पोलिसांना दिली. त्यानुसार देवरुख व शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुचाकीच्या क्रमांकावरून तपास करण्यात आला. तपासाअंती स्वरुप माने आणि सुशांत सातवेकर हे बेपत्ता असल्याची फिर्याद 10 ऑगस्ट रोजी सांगली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हे मृतदेह स्वरुप व सुशांत यांचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. या घटनेची माहिती दोघांच्याही नातेवाईकांना देण्यात आली. नातेवाईकांनी पाहणी केल्यानंतर हे मृतदेह स्वरुप व सुशांत यांचा असल्याची खात्री पटली. दरम्यान मृतदेह दीडशे फूट खोल दरीत असल्याने आणि त्यातच काळोख पडल्याने शनिवारी शोधमोहीम थांबवण्यात आली होती.
मोहिमेतील सर्वांचे कौतुक
रविवारी सकाळी 8 वाजता मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, देवरुख पोलीस निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक शबनम मुजावर व सहकारी उपस्थित होते. या मोहिमेत राजू काकडे, हेल्प अॅकॅडमीचे अण्णा बेर्डे, राजू वनकुद्रे, संतोष मुंडेकर, संजय माईन, विशाल तळेकर, प्रदीप टक्के, राजा गायकवाड, विशा पवार, वरद जंगम, नीलेश तळेकर, आंबा येथील राजू लाड, गौरव जाधव व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. एक मृतदेह झाडावर लटकत होता तर एक झाडाच्या बुंध्यामध्ये पडला होता. दोरी, स्ट्रेचर, प्लास्टिक कापड आदी साहित्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. दुपारी 12.30 वाजता सुशांत सातवेकर यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. तर 2 च्या सुमारास स्वरुपचा मृतेदह बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना यश आले. मोहिमेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले.
तीन ते चार वर्षे जंगली महाराज मठात होते वास्तव्य
स्वरुप व सुशांत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, स्वरुप माने व सुशांत सातवेकर हे गेली तीन ते चार वर्षे कागल येथील जंगली महाराज मठात वास्तव्याला होते. मठात ते साधना घेत होते. मठातील महाराज यांचे एक महिन्यापूर्वी निधन झाले. याचा धक्का स्वरुप व सुशांत यांनी घेतला. या धक्यातून ते न सावरल्याने दरीत उडीत मारत त्यांनी आत्महत्या केल्याचे पाटील यांनी सांगितले.