पीक विमा भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात यावी
ठाकरे युवासेना उपतालुकाप्रमुख रियाज खान यांचे सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी
बांदा
शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची अंतिम तारीख १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती. परंतु विमा कंपनीच्या अनेक अटीशर्ती असल्यामुळे तसेच ई सेवा केंद्रावर वारंवार सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. यामुळे पिक विमा भरण्यासाठी दहा दिवस मुदत शेतकऱ्यांना वाढवून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना उपतालुकाप्रमुख रियाज खान यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत नुकतेच निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्गातील शेतकरी यांना २०२४-२५ च्या फळ पिक विम्यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक अडचणी येत असून मुळातच शेतकऱ्यांची सन २०२३-२४ ची नुकसान भरपाई वेळेत मिळाली नाही. महत्वाची बाब म्हणजे चालू वर्षीच्या सन २०२४-२५ च्या पिक विमा भरण्याकरिता महा ई सेवा केंद्रावर अनेक अडचणी येत असून त्याची भरण्याची अंतिम मुदतही संपली आहे. ही मुदत न वाढविल्यास अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. परंतु त्यांना त्रुटी असल्याचे संदेश आलेले असून त्यामध्ये सहहिस्सेदारांचे संमती पत्र देणे बंधनकारक आहे. त्याकरिता संमती पत्राची अट रद्द करून त्या शेतकऱ्यांकडून स्व संमतीचे हमीपत्र घेऊन येणारी अडचण दूर करावी. यामुळे जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना पिक विम्या मध्ये सहभागी होता येईल.यावेळी श्रीकांत धोत्रे, राहुल माने, साहिल खोबरेकर, सैफुल्ला खान आदी उपस्थित होते. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले.