For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केवळ बोलण्याचे दिवस संपले आहेत !

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
केवळ बोलण्याचे दिवस संपले आहेत
Advertisement

कृती कराल तसे परिणाम भोगाल : जयशंकर यांचा पाकिस्तानला रोखठोक इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध कसे असतील, हे परिस्थितीवर अवलंबून आहे. पाकिस्तानने काहीही केले, तरी भारत चर्चेचा मार्ग सोडणार नाही, असे समजण्याचे दिवस आता संपले आहेत. ज्याप्रमाणे शेजारी देशाकडून कृती होईल, तसे परिणाम त्या देशाला भोगावे लागतील, हे उघड आहे, असा इशारा भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दिला आहे. ते शुक्रवारी येथे एका ग्रंथाच्या प्रकाशन समांरभात भाषण करीत होते. त्यांनी भाषणात राज्यघटनेच्या अनुच्छेद 370 चाही उल्लेख केला. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा हा अनुच्छेद आता संपला आहे. केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी संसदेत हा अनुच्छेद निष्प्रभ करणारे विधेयक संमत करुन घेतले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारच्या भूमिकेवर आपली मुद्रा उमटविली आहे. त्यामुळे आता हा विषय पूर्णत: संपला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

शेजारी देशांसंबंधी...

सध्याच्या परिस्थितीत भारताचे शेजारी देशांसमवेत संबंध कसे आहेत, यासंबंधीही जयशंकर यांनी भाष्य केले. भारत शेजारी देशांशी नेहमीच चांगले संबंध असावेत अशी भूमिका घेत आला आहे. तथापि, अनेक शेजारी देश त्यांच्या राजकीय सोयीनुसार भारताशी वागतात. त्यांना सोयीचे असेल तेव्हा त्यांना भारताचे सहाय्य हवे असते. इतर वेळी ते भारताशी फटकून वागतात. आमच्या सरकारने पाकिस्तानशी संबंध ठेवताना एक पथ्य पाळले आहे. ते असे की पाकिस्तानची कृती सकारात्मक किंवा नकारात्मक, जशा प्रकारची असेल, त्याप्रमाणे आमची प्रतिक्रिया ठरत असते, असेही प्रतिपादन जयशंकर यांनी केले.

पाकिस्तानला स्वारस्य नाही...

भारताशी शांतता आणि सौहार्दाचे संबंध असावेत असे मुळात पाकिस्तानला वाटतच नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पाकिस्तानशी चर्चा करण्यात आली होती. संबंध सुधारण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातही ही प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न भारताने केला होता. तथापि, पाकिस्तानने कधीही गंभीरपणे भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु ठेवायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांच्या हातून भारताच्या सैनिकांचे बळी घ्यायचे, असे पाकिस्तानचे दुहेरी कारस्थान आहे. अशा स्थितीत चर्चेला कोणताही अर्थ रहात नाही, अशी मांडणी याच कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री जी. किशन रे•ाr यांनीही त्यांच्या भाषणात केली.

भारताच्या विनाशासाठी प्रयत्न

पाकिस्तान त्याच्या भूमीवर दहशतवादाला पोसतो. त्या देशात विविध दहशतवादी संघटना आहेत. त्यांना पाकिस्तानकडून खतपाणी मिळते. या संघटनांचे दहशतवादी भारताला संपविण्याची, भारताचा नाश करण्याची भाषा बोलतात. भारतात हिंसाचार घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक दहशतवादी हल्ले या संघटनांच्या हस्तकांनी पूर्वी भारतात घडवून आणले आहेत. यावरुन असे स्पष्ट होते, की भारताशी संबंध सुधारण्याची त्या देशाची इच्छा नाही. अशा परिस्थितीत भारताने जशास तसे ही भूमिका घेतली नाही, तर ते भारताचे दौर्बल्य समजले जाईल. त्यामुळे भारताला कठोर भूमिका घ्यावीच लागणार आहे, अशा अर्थाचे वक्तव्यही केंद्रीय मंत्री जी. किशन रे•ाr यांनी या कार्यक्रमातील भाषणात केले.

संघर्षाचा इतिहास

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरवरुन संघर्ष 1947 पासून आहे. आतापर्यंत या संदर्भात चार युद्धे दोन्ही देशांमध्ये झालेली आहेत. चारही युद्धांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला आहे. युद्धात भारतावर कुरघोडी करणे अशक्य आहे, याची जाणीव झाल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या साहाय्याने भारताचा रक्तपात करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा दोन्ही देशांच्या संबंधांमधील सर्वात मोठा अडथळा ठरलेला आहे.

रोखठोक भूमिका घेणार...

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पाकच्या कृतीवर अवलंबून
  • आतापर्यंत भारताने केलेल्या शांतता प्रयत्नांना पाकचा प्रतिसाद शून्य
  • एकीकडे चर्चा, दुसरीकडे दहशतवाद, अशी पाकिस्तानची दुहेरी नीती
  • पकिस्तानशी जशास तसे या न्यायानेच वागण्याची भारताची रणनीती
Advertisement
Tags :

.