दासबोध ग्रंथ थोर
समर्थ रामदास स्वामी असे नाव घेतले की सगळ्या भक्तांच्या मनात ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा घोष निनादतो. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र ओठांवर येतो. लोककल्याण आणि राष्ट्रोद्धार हे समर्थ रामदासस्वामींचे ध्येय होते. श्रीराम हे समर्थांचे इष्टदैवत, कुलदैवत असले तरी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या साधकांना ते श्रीराम उपासना करा असा आग्रह करीत नसत.
आपापल्या आराध्य दैवताची उपासना करा आणि नैतिक आचरण पाळून देशसेवेत मग्न रहा असा ते उपदेश करीत. श्रीराम, श्रीदत्त, विठोबा, देवी, गणपती... दैवत कोणतेही असो, सगळ्यांचा अधिकार एकच आहे. सारी दैवते एकरूप आहेत, हे समर्थ रामदासस्वामींच्या उपदेशाचे सार आहे. आकाशातून पावसाच्या रूपाने पडत असलेले पाणी चहूबाजूंनी गेले, पसरले तरी ते शेवटी समुद्रालाच जाऊन मिळते. त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो एका परमेश्वरालाच पोचतो, हे समर्थ रामदासस्वामींचे तत्त्व होते.
समर्थांना माहूरगडावर श्री दत्तात्रयांनी दर्शन दिल्याची कथा त्यांच्या चरित्रात येते. श्रीदत्तात्रय महाराजांनी मलंग वेषात विश्वपसाऱ्यासह समर्थांना भेट दिली. श्री दत्तात्रयांचे दर्शन घडावे म्हणून अनुष्ठान करणाऱ्या मंडळींना समर्थांमुळे श्री दत्तात्रयांचे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असे दर्शन झाले तेव्हा तेथील भक्तांना श्रीदत्तात्रयांनी उपदेश केला की ‘जो मी तोच रामदास’ अशी भावना धरून नित्य निरंतर सेवा ही समर्थांची करावी. समर्थ रामदासस्वामींनी श्री दत्तात्रयांची आरती रचलेली आहे. त्यात ते म्हणतात, ‘काशी स्नान करवीर क्षेत्री भोजन । मातापुरी शयन होते प्रतिदिन । तैसे हे अघटित सिद्ध महिमान । दास म्हणे हे तो नव्हे सामान्य?’ समर्थांनी श्री दत्तात्रयांवर भूपाळीही रचली आहे. त्यात कृष्णा नदीचा उल्लेख आहे. तिथे देवादिक दर्शनास येतात असे समर्थ म्हणतात. पतितांचा उद्धार करण्यासाठी आणि संकटी भक्तांचे रक्षण करण्यासाठी तू हा अवतार घेतला आहेस असे सांगून समर्थ शेवटी दत्तात्रयांना म्हणतात, ‘रामदास लागे पायी । मागे इच्छा हेचि देई । तुझी माझी बाप माई । प्रतिपाळावे भक्तांसी?’ ही प्रार्थना समर्थांना श्री दत्तात्रयांप्रती असलेली आत्मियता व आदर व्यक्त करते. एकदा समर्थांना श्री दत्तप्रभूंनी आपल्या कमंडलुतील जल प्राशन करून उंच शिखरावर नेले आणि त्यांचे संरक्षण करणारा एक मणी समर्थांच्या पायात स्वहस्ते बांधला अशी कथा आहे. एकदा कंगाल वेष धारण करून श्री दत्तप्रभूंनी स्वामींना समर्थ हे नाव दिले आणि एक सोटा दिला, तो सज्जनगडावर बघायला मिळतो.
समर्थ संप्रदाय आणि श्री दत्त संप्रदाय यांचा अनोखा अनुबंध प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या चरित्रामध्ये आहे. आद्य शंकराचार्यांचा अवतार असलेल्या स्वामींनी पत्नी सौ. अन्नपूर्णाबाई यांच्या मृत्यूनंतर संन्यास घेतला. श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने ते दंडग्रहण करण्यास श्रीक्षेत्र उज्जैन इथे प. प. श्री नारायणानंद सरस्वती स्वामींकडे आले. प. प. स्वामींना दंड देणारी विभूती मोठ्या अधिकाराची आणि श्री दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वंशातील होती. हे रामाचे उपासक आणि समर्थ संप्रदायी होते. त्यांनी स्वामींना दंड आणि वासुदेवानंद सरस्वती असा योगपट्ट दिला. आपल्या सद्गुरूंची स्वामींनी उत्तम प्रकारे सेवा केली. सुमारे सतरा वर्षे गुरूशिष्यांचा संबंध आला. प. प. नारायणानंद सरस्वतींनी समर्थ संप्रदायाचे परम आराध्य असलेल्या श्री प्रभू रामचंद्रांसमोर चाफळ येथे समाधी घेतली. प. प. टेंबे स्वामी महाराज आपला संप्रदाय लक्षात घेऊन श्री दासनवमीचा उत्सव करीत असत. स्वामी महाराजांचा मुक्काम ब्रह्मावर्त येथे असताना माघ वद्य नवमी म्हणजे दासनवमीच्या दिवशी विद्वान, शास्त्राr, पुराणिक यांच्यासमोर नित्य पुराणाचा अर्थ सांगितल्यावर श्रोत्यांना स्वामी म्हणाले, ‘आज समर्थ रामदास नवमी आहे. कुणाकडे दासबोध आहे का? असल्यास मागवून घ्या.’ एका गृहस्थांनी ग्रंथ आणून दिला.
सायंसंध्येला थोडा अवकाश आहे तोवर ग्रंथ वाचू, असे स्वामींनी म्हणताच संस्कृतप्रेमी विद्वान मंडळी उठून जाऊ लागली. या प्राकृत ग्रंथांमध्ये काय असणार असे त्यांना वाटले. स्वामींच्या हे लक्षात येताच ते म्हणाले, कुणीही जाऊ नका. जास्त वेळ वाचण्यास लागणार नाही. तरी फक्त पाच-दहा ओव्या वाचून घेऊ आणि मग सगळेच स्नान संध्येसाठी जाऊ. स्वामी महाराजांचीच ती आज्ञा. त्यापुढे कोण काय म्हणणार? सगळेजण परत जागेवर श्रवणास बसले.
प. प. स्वामींनी सर्वांसमोर दासबोध ग्रंथ उघडला. समोर आले ते पान उघडून समासाच्या मधूनच वाचायला सुरुवात केली. स्वामींनी एक ओवी वाचावी आणि त्या ओवीच्या अर्थाचा वेदमंत्र म्हणावा आणि त्याप्रमाणे भाष्यासह अर्थ सांगावा असे सुरू झाले. पाच-सात ओव्या त्यानुसार वेदमंत्र, भाष्य, अर्थ सांगून झाल्यावर स्वामींनी ग्रंथांचे पान मिटून ठेवले आणि सायंसंध्येचा काल समीप आला असे म्हणून स्वामी तिथून उठले. श्री दासबोध ग्रंथाची महानता त्या विद्वानांच्या, वैदिकांच्या लक्षात आली. त्यांनी स्वामी महाराजांना वंदन करून त्यांची क्षमा मागितली. स्वामी म्हणाले, ग्रंथ आधी वाचावा, श्रवण करावा. ग्रंथाची योग्यता निरीक्षण केल्याशिवाय कळत नाही. ग्रंथ न बघताच, न वाचताच त्याला दोष देणे हे विचारी माणसांना शोभत नाही. ग्रंथाची उपेक्षा केवळ तो प्राकृत आहे म्हणून करणे योग्य नाही. दासबोध ग्रंथावर स्वामींचे विशेष प्रेम होते. स्वामींचे परम शिष्य निसरपूरचे बाळाभाऊ वैद्य यांना स्वामींनी श्री दासबोध ग्रंथ नित्य वाचण्याची आज्ञा केली होती. तो नियम त्यांनी कटाक्षाने पाळला.
समर्थ संप्रदायातील श्रेष्ठ विभूती भगवान श्री श्रीधर स्वामी यांनी काही दिवस एकांतवासात श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान असलेल्या कुरवपूर येथे साधना केली आहे. श्रीपादांची स्तुती, कृष्णास्नान आणि अनुष्ठान केले आहे. एकदा श्रीधर स्वामी कृष्णा नदीमध्ये स्नान करीत असताना नदीकाठावर ठेवलेल्या पादुका अदृश्य झाल्या. हे बघून त्यांच्याबरोबर असणाऱ्या श्री दत्तबुवांना दु:ख झाले. आता नवीन पादुका कुठून आणायच्या हा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा श्रीधर स्वामी म्हणाले, नव्या नकोच. जुन्या शोधू चल. तेव्हा पादुका जागेवरच सापडल्या. त्यावर गंध, चंदन, फुले, अक्षता अर्पण केल्या होत्या. तेव्हा श्री दत्तबुवांनी त्याचा अर्थ विचारताच श्रीधर स्वामी म्हणाले, इथल्या स्थानदेवतांनी पादुका पूजेसाठी नेल्या आणि पूजा करून परत आणून ठेवल्या. श्रीधरस्वामी श्री दत्तप्रभूंविषयी म्हणतात, ‘अवतार उदंड होती । सवेची विलया मागुती जाती । तैसी नव्हे दत्तमूर्ती। नाश कल्पांति असेना?’ श्री दत्तप्रभू हे चिरंजीव आहेत. श्रीराम आणि दत्तप्रभू दोघेही विष्णूस्वरूपच. सगळ्या देवता या अभेद स्वरूपात कळाव्यात आणि मनात रुजाव्यात म्हणूनच संतांची धडपड आहे.
- स्नेहा शिनखेडे