For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Azan Banned in Denmark डेन्मार्कमध्ये लाऊडस्पीकर अजान बंद होणार? प्रशासन निर्णय घेण्यासाठी सज्ज, लवकरच आदेश निघणार

09:15 PM Jun 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
azan banned in denmark डेन्मार्कमध्ये लाऊडस्पीकर अजान बंद होणार  प्रशासन निर्णय घेण्यासाठी सज्ज  लवकरच आदेश निघणार
Advertisement

► वृत्तसंस्था
कोपेनहेगन (डेन्मार्क)
लाऊडस्पीकरवरुन अजानवर डेन्मार्कमध्ये देशव्यापी बंदी आणली जाणार आहे. तसा कायदा करण्यासाठी या देशाचे प्रशासन सज्ज झाले असून लवकरच ही बंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. मोठ्या आवाजातील अजानमुळे देशातील नागरीकांना त्रास होत असून धार्मिक शांतताही धोक्यात येत आहे. डेन्मार्कचे ‘इस्लामीकरण’ होत आहे, ही चिंता वाढल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे.
डेन्मार्क देशाचा काही भाग आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या शहराचे उपनगर झाल्याप्रमाणे वाटत आहे, अशी सूचक टिप्पणी डेन्मार्कचे स्थलांतर आणि एकात्मता मंत्री मोर्टेन बोडस्कोव्ह यांनी केली आहे. प्रत्येकाचा धर्म हा त्याच्यासाठी महत्वाचा असतो. तथापि, तो देशाचा कायदा आणि घटना तसेच लोकशाही यांच्यापेक्षा मोठा असू शकत नाही, असेही विधान त्यांनी केले आहे.
कायदा केला जाणार
डेन्मार्कमध्ये लाऊडस्पीकरवरुन अजान देण्याची प्रथा बंद करण्यासाठी कठोर कायदा केला जाणार आहे. डेन्मार्कचे धर्मनिरपेक्ष स्वरुप स्थायी राखण्यासाठी अशा कायद्यांची आवश्यकता आहे. डेन्मार्कमध्ये कोणाचीही आपण इस्लामाबादच्या उपनगरात राहतो, अशी भावना होऊ नये, हे पाहण्याचे उत्तरदायित्व आमच्या सरकारचे आहे. सध्या डेन्मार्कमध्ये स्थानिक ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांच्या आधारे अजानला अनुमती दिली जाते. पण आता अजान देताना लाऊड स्पीकरचा उपयोग करताच येणार नाही, असा नवा देशव्यापी कायदा करण्याची तयारी होत आहे.

Advertisement

बुरख्यावरही बंदी
गेल्या वर्षी डेन्मार्कच्या नेत्या मेटे फ्रेडरिकसन यांनी बुरख्यासंदर्भात एक घोषणा केली होती. सध्या या देशात सार्वजनिक स्थानी बुरखा किंवा निकाब धारण करण्यास बंदी आहे. आता हीच बंदी सर्व शिक्षण संस्थांमध्येही लागू करण्यात येणार आहे, अशी ती घोषणा होती. कोणत्याही धार्मिक प्रथेपेक्षा लोकशाही महत्वाची आणि श्रेष्ठ आहे, हे देशाचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. युरोपातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक स्थानी चेहरा पूर्ण झाकला जाईल, अशा वेषभूषेवर बंदी आहे. आता या देशांमध्ये डेन्मार्कचाही समावेश आहे. डेन्मार्कने हा कायदा 2018 मध्ये संमत केला होता. तथापि, शिक्षण संस्थांना मुभा होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.