काळादिन गांभीर्याने पाळून सायकल फेरी यशस्वी करणार
येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार
बेळगाव : येळ्ळूर गावाने सीमाप्रश्नासाठी दिलेले योगदान आणि केलेला त्याग अमूल्य आहे. रस्त्यावरच्या आणि न्यायालयीन संघर्षातही येळ्ळूरचे योगदान आहे. येत्या काळ्यादिनाच्या सायकल फेरीमध्येही शेकडोंच्या संख्येने येथील नागरिक सहभागी होतील, असा निर्धार येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत केला. बुधवारी बालशिवाजी वाचनालय येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष विलास घाडी होते. ग्राम. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, मराठी भाषा, संस्कृती व ओळख टिकवण्यासाठी लढाई अजूनही सुरूच आहे. ही ज्योत आपण जिवंत ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. माजी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी अन्यायाविरोधात एकत्र येऊन काळ्यादिनाच्या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी नारायण कुंडेकर, ग्रा. पं. सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेणसे, जोतिबा चौगुले, परशराम परीट, मनोहर पाटील, परशराम घाडी, मनोहर पाटील, मधु पाटील, शुभम जाधव, निखिल पाटील, मल्लाप्पा काकतीकर, यल्लाप्पा बिर्जे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.