For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमल दलाच्या राजवाड्यातील काटेरी मुकुट !

06:54 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमल दलाच्या राजवाड्यातील काटेरी मुकुट
Advertisement

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ज्या पक्षाची ख्याती आहे, अशा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची मंगळवारी झालेली निवड ही त्या पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब आहे. देशात सर्वाधिक राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता असल्यामुळे या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आणखी फार मोठे महत्त्व आहे. भारतीय जनता पार्टी घराणेशाहीला चिकटलेली नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांचा अध्यक्ष हा बदलला जातो. त्यामुळेच या पक्षाला एक वेगळे महत्त्व आहे. या पक्षाने आतापर्यंत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे अनेक प्रभावी राष्ट्रीय नेते देशाला दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सतत तोंड देत, संघर्ष करीत हा पक्ष सत्तास्थानी पोहोचला आहे. नरेंद्र मोदींसारखा जागतिक स्तरावरचा बलाढ्या नेता या देशाला भाजपने दिला. बिहारमधील मंत्री असलेले आणि यापूर्वी अनेकवेळा मंत्रीपद भूषविलेले, अनेक राज्यांमध्ये जाऊन पक्षाचे निरीक्षक म्हणून काम केलेले, संघटन सचिव म्हणून देखील सार्थ भूमिका बजावणारे नितीन नबीन हे नेहमीच शांत स्वभावाचे आणि प्रसिद्धी माध्यमातून तसे दूर राहणारे आहेत. प्रथमच त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तमाम जनतेला आणि भाजपच्या देखील अनेक नेत्यांना धक्काच दिला. पक्षाचे संघटनात्मक काम त्यासाठी लागणारे कौशल्य हे नितीन नबीन यांच्याकडे निश्चितच आहे. त्यांनी आज राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुकुट परिधान केला. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या मस्तकावर घातलेला हा मुकुट काटेरी आहे की सुवर्णा अलंकारांचा आहे, हे पाहणे आवश्यक आहे. लवकरच पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपसाठी फार मोठे आव्हान बनून राहिले आहे. केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल ही तीनही अत्यंत महत्त्वाची राज्ये आहेत, जिथे भाजपला सत्ता मिळविणे तेवढे सहज सोपे नाही. यानंतर गुजरात व आसाम राज्यांमध्ये देखील निवडणुका आहेत. पुढील वर्षी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा व पंजाब या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय हे निवडणुका जिंकून सत्तेवर येणे हेच आहे आणि तेच असते. नितीन नबीन यांच्यासमोर या राज्यांतील निवडणुका जिंकणे हे आव्हान आहेच शिवाय आज केंद्रामध्ये जी सत्ता आहे ती बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांतील सरकार पक्षातील खासदारांच्या टेकूवर. सत्ता ही मजबूत नाही कारण कोण कधी पाठिंबा काढून घेईल हे कळणार नाही. त्यामुळेच केंद्रातील सत्ता टिकवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सरकार एवढेच प्रयत्न आणि जबाबदारी पक्षावर देखील आहे. मावळते अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या कारकिर्दीत भाजपला तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता प्राप्त झाली, शिवाय अनेक राज्यांमध्ये देखील भाजपला सत्ता प्राप्त झाली. आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जाते. एवढ्या प्रचंड संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व सदस्य संपूर्ण देशभरात विखुरलेले आहेत. जागतिक पातळीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या जे ‘प्राईस वॉर’ सुरू केलेले आहे त्याचा फटका भारताला बसलेला आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर देखील अनेक आव्हाने त्यामुळेच उभी राहिली आहेत. देशाचा आर्थिक पाया अत्यंत मजबूत आहे, परंतु आर्थिक क्षेत्र हे नेहमीच अळवावरच्या पाण्यासारखे असते. छोट्या छोट्या कारणास्तव देखील बाजार कोसळतात. अर्थव्यवस्थेचा तोल सावरण्यासाठी अनेक उपाययोजना वारंवार हाती घ्याव्या लागतात. देशांतर्गत सुरक्षेचा देखील गंभीर प्रश्न आहेच. पाकिस्तान बरोबरच आता शेजारचा बांगलादेश हा देखील एक नवा शत्रू निर्माण झालेला आहे. चीनने तर यापूर्वीच आपला कपटीपणा सिद्ध केलेला आहे. म्हणजे देशाच्या चारही बाजूने भारत संघर्ष करीत आहे. सरकार या नात्याने वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील परंतु पक्ष या नात्याने देखील फार मोठी जबाबदारी असते. भाजपचा एकंदरीत इतिहास पाहता या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील आतापर्यंत झालेल्या अध्यक्षांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. नबीन हे पहिले युवा अध्यक्ष भाजपला मिळालेले आहेत. भाजप हा ज्येष्ठांचा पक्ष बनलेला आहे आणि नबीन हे युवा नेते आहेत. पक्षांमध्ये आता नव्याने युवा नेते तयार होणे आवश्यक आहे. युवावर्गाची अपेक्षा लक्षात घेऊन पक्षाला आपल्या राष्ट्रीय धोरणांमध्ये देखील कालानुरूप बदल करणे आवश्यक आहेत. हे बदल करीत असताना ज्येष्ठ दुखावले जाणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागेल. अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून युवा नेत्यांना संधी देणे फार गरजेचे असल्याने पक्षांतर्गत ‘जनरेशन

Advertisement

गॅप’ निर्माण होईल आणि त्यातून काहीवेळा संघर्षमय परिस्थितीला देखील सामोरे जावे लागेल. नव्या अध्यक्षाची सूत्रे नबीन यांनी हाती घेतल्यानंतर देशातील युवावर्गासाठी काहीतरी नवे संकल्प हाती घ्यावे लागणार आहेत. तसेच देशात भाजपला दीर्घकाळ सत्तेवर राहायचे आहे आणि जनतेमध्ये राष्ट्रीय भावना सातत्याने जागृत ठेवणे आवश्यक आहे. पक्षाला एकसंघ ठेवणे हे दिसते तेवढे सोपे काम नसते. पक्ष कोणताही असो, भावना कितीही असो, परंतु प्रत्येक ठिकाणी ‘जनरेशन गॅप’ मध्ये संघर्षमय स्थिती निर्माण होतेच. अलीकडच्या काळात भाजपने प्रत्येक राज्यांतर्गत मतदारसंघनिहाय गट अध्यक्ष निवडताना कमाल वयोमर्यादा 30 घातली, याचा अर्थ पक्ष नव्या पिढीच्या शोधात आहे. नवे नेते निर्माण करण्याचे काम पक्ष सूक्ष्म पातळीवर करीत आहे, हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरते. नबीन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यापेक्षा नबीन हे मोठे आहेत, असे जाहीर करून पक्षापेक्षा आपण मोठा नाही ही निती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ऊजवली. या पार्श्वभूमीवर नबीन यांनी हीच भावना लक्षात घेऊन आपल्यावर आता फार मोठी जबाबदारी आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अध्यक्षपदाचा जो मुकुट त्यांनी आपल्या शिरावर घेतलेला आहे त्याचा अर्थच असा आहे की भविष्यात नवे युवा नेते निर्माण करणे. पक्षासमोर आणि देशासमोर असलेली एकंदरीत आव्हाने पाहता डोक्यावरचा मुकुट हा निश्चितच काटेरी आहे आणि काटा लागल्याशिवाय आवडणारा गुलाब हाती लागणार का? नबीन हे कमल दलाच्या नव्या राजवाड्यात उतरलेले आहेत. पक्षासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांनी जी दर्शविली आहे तो एक पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरावा..!

Advertisement

Advertisement
Tags :

.