पीक मागतंय पाणी... पाऊस झाला गायब...
ऐन पीक फळधारणेच्या कालावधीतच पावसाने दिली दडी : शेतकऱ्यांमध्ये चिंता,भात पिकाच्या फळधारणेसाठी सध्या दमदार पावसाची गरज
वार्ताहर/किणये
तालुक्यात सध्या भात पोसवणीला सुरुवात झाली आहे. तसेच विविध पिकांच्या फळधारणेला प्रारंभ झाला आहे. या कालावधीत पिकासाठी पावसाची आवश्यकता असते. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. बहरून आलेलं पीक फळधारणेसाठी पाणी मागत आहे. मात्र पाऊस गायब झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. तालुक्यात खरीप हंगामात भात, बटाटा, रताळी, भुईमूग, नाचणा, सोयाबीन आदी पिके घेण्यात आलेली आहेत. यामध्ये सध्या काही ठिकाणी भुईमूग व बटाटा काढणीची कामे सुरू आहेत. तालुक्यात भात हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. शेत शिवारामधील भात पोसवणीला सुरुवात झालेली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. बहुतांशी शिवारातील भातपिकावर सध्या करपा रोग व किडीचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आहे. याचा फटका भात पिकाच्या उत्पादनावर बसणार आहे. भात पिकावर पडलेला करपा रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी व भात पिकाच्या फळधारणेसाठी सध्या दमदार पावसाची गरज आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये, कर्ले, बेळवट्टी, बेळगुंदी, राकसकोप, सावगाव, सोनोली, झाडशहापूर, संतिबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, बामणवाडी, जानेवाडी, बहाद्दरवाडी, बाळगमट्टी, बोकनूर, यळेबैल, इनाम बडस, कावळेवाडी, बीजगर्णी आदी गावांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात रताळी वेलीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. जून महिन्याच्या मध्यानंतर ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शिवारात मेरा (बांध)तयार करून त्यावर शेणखत व रासायनिक खत घालून रताळी वेलीची लागवड करण्यात आलेली आहे. या रताळ्याचे वेलीला खताचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भांगलण केलेली आहे. परंतू पाऊस नसल्यामुळे रताळी वेलीची वाढ खुंटलेली आहे. रताळी वेलीची वाढ होऊन वेलीची पाने मोठी व्हायला हवी. त्यामुळे सध्यातरी पावसाची गरज आहे. यंदा मान्सून बऱ्यापैकी झाला मध्यंतरीच्या कालावधीत जोरदार मान्सून झाल्यामुळे शेतशिवारात पाणी साचून राहिले होते.यावेळी भात व अन्य पिके पाण्याखाली जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उर्वरित शिल्लक राहिलेल्या भात पिकाला सध्या योग्य हवामानाची व पावसाची गरज आहे.
शिवारातील पिकांच्या उत्पादनासाठी योग्य प्रमाणात हवामान-मान्सून हवा
अलीकडे निसर्गाचे चक्र बदलत चालले आहे. पूर्वी दसरा व दसऱ्यानंतर दमदार पावसाच्या सरी बरसत होत्या. यामुळे भातपिकावरील रोगराई कमी होत होती. आणि भातपीक बऱ्यापैकी बहरून येत होते. आणि उत्पन्नही चांगल्या प्रमाणात मिळत होते. यामुळे या पिकासाठी विहिरी व कूपनलिकांचे पाणी शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे. ज्यांच्या शेतशिवारात विहिरी व कूपनलिका आहेत ते शेतकरी धडपड करून पिकांना पाणी देत आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही. त्यांची मात्र चिंता वाढलेली आहे. तसेच पिकांना पाणी देण्यासाठी सुरळीत थ्री फेज विद्युत पुरवठाही केला जात नाही. एकंदरीत आम्हा शेतकऱ्यांसाठी भात, नाचणा व रताळी पिकासाठी दमदार पाऊस हवा आहे.
- महादेव बिर्जे, संतिबस्तवाड
