पाणीकपातीचे संकट
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणीकपात योग्यच म्हटली पाहिजे. एल निनोचा प्रभाव, मान्सूनचा ताण, धरणातील अपुरा साठा यामुळे सर्वदूर सध्या अभूतपूर्व स्थिती आहे. पुढच्या सात ते आठ महिन्यांचा विचार करता केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यातही 10 टक्के वा त्यापेक्षा अधिक पाणीकपात अटळ असेल.
भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून हा अतिशय संवेदनशील घटक मानला जातो. येथील शेती, माती, जलव्यवस्थापनापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी या मोसमी पावसावर अवलंबून असतात. किंबहुना, यंदाचा मान्सूनचा संपूर्ण हंगाम एल निनोच्या कचाट्यात सापडल्याने पावसाचे प्रमाण जेमतेमच राहिले. वास्तविक, यंदा एल निनोचे मळभ दाटल्याने 96 टक्के इतकाच पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. प्रत्यक्षात त्यापेक्षाही कमी म्हणजे सरासरीच्या 87 टक्के इतक्याच पावसाची देशभरात नोंद झाली. एकूण सरासरीचा विचार करता ही तूट 13 टक्के इतकी प्रचंड असल्याचे आकडेवारीरून दिसते. त्यात 15 ऑक्टोबरला परतीचा मान्सूनही माघारी फिरल्याने उरलीसुरली आशाही संपुष्टात आली. मुळात जुलैचा अपवाद वगळता बहुतांश राज्यांमध्ये फारसा पाऊस झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही यंदा बिकट झाला आहे. काही भागांतील धरणे कोरडीठाकच राहिली असून, काही धरणांमध्ये जेमतेम वा मध्यम पाणीसाठा झाल्याचे चित्र आहे. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत हा साठा कमीच दिसतो. त्यात वाढते उष्णतामान, तीव्र ऑक्टोबर हिटमुळे तुलनेत अधिक बाष्पीभवन होत आहे. हे पाहता पाणीकपात अटळच ठरते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, ग्राऊंडवरील स्थिती पाहता यापेक्षा अधिक कपात होण्याची चिन्हे दिसतात. तसा विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत पुणे व परिसरात बरा पाऊस झाला. तरीही खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षीपेक्षा 25 टक्के कमी पाणी आहे. त्यामुळे पुढील ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात करण्याची सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात आधीपासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. प्रामुख्याने पवना धरणावर अवलंबून असलेल्या या शहराला 20 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्याशिवाय पर्याय नसेल. विदर्भ व मराठवाडा पट्ट्यातील स्थिती आणखी भयानक आहे. तेथे किती कपात करावी लागेल, हे आताच सांगणे अशक्य. लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याचे उदाहरण फार जुने नाही. या खेपेलाही वेगळे चित्र नाही. जी स्थिती महाराष्ट्राची, तीच कर्नाटक, दक्षिण भारताची वा उत्तरेकडची. ग्लोबल वॉर्मिंग, एल निनोच्या झळा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होऊ शकतात. सर्वसाधारण जूनपासून पाऊस सुरू होतो, हे लक्षात घेता पावसाळ्याला अद्याप सात महिन्यांचा अवधी आहे. त्यात 2027 वर एल निनोचा परिणाम होणार असल्याचा अंदाज आहे. इतक्या दीर्घ कालावधीत उपलब्ध पाण्याचे नियोजन कसे करायचे, हे सरकार व प्रशासनापुढील आव्हान असेल. याकरिता काटेकोर जलव्यवस्थापन, पाणी गळती रोखण्यासह पाणीबचतीचा मंत्र जपावा लागेल. त्याचबरोबर बांधकाम, स्वीमिंग टँक वा तत्सम गोष्टींवर निर्बंध घालणे क्रमप्राप्त ठरते. अर्थात यामध्ये लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असेल. पाण्याची नासाडी करणे, गाड्या धुणे, रस्त्यावर पाणी मारणे याला मूरड घालावी लागेल. कूपनलिका, विहिरी यांच्याकडेही पाण्याचा स्रोत म्हणून पाहिले जाते. तथापि, मागच्या काही वर्षांमध्ये भूजलाचा अनिर्बंध उपसा झाल्याने भूजल पातळीही लक्षणीयरीत्या खालावली आहे. परिणामी अनेक भागांत उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच कूपनलिका आटतात. वाढत्या काँक्रिटीकरणाचे हे साईड इफेक्ट आहेत. रेन वॉटर हा चांगला पर्याय असला, तरी त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था तितक्याशा गंभीर दिसत नाहीत. जुन्या विहिरी वा इतर जलाशये पुनरुज्जीवित करणे, हेही महत्त्वाचे असेल. खरेतर तहान लागल्यावर आपल्याकडे उपाययोजना सुरू होतात. यापुढे तरी असे होऊ नये. आता पाणीसंकटाच्या मुकाबल्यासाठी सामूहिक प्रयत्नांशिवाय पर्याय नसेल.