आजगाव परिसरावर पुन्हा घोंघावतेय मायनिंगचे संकट !
सावंतवाडी । प्रतिनिधी
आजगाव परिसरावर पुन्हा मायनिंगचे संकट घोंघावत आहे. आजगाव परीसरातील गावात सोमवारी दिनांक 8 जुलैला जेएसडब्लु (jsw) कंपनीद्वारे ड्रोनद्वारे मायनिंगचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आजगाव ग्रामपंचायतीला 4 जुलै रोजी परवानगीसाठी कंपनीतर्फे पत्र प्राप्त झाले आहे. यापुर्वी मायनिंग टेस्टिंगसाठी कंपनीने आजगाव, धाकोरे, मळेवाड आदी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती. मात्र , ग्रामसभा घेऊन टेस्टिंगला विरोध झाला होता. त्यामुळे वर्षभर हा विषय थंड बासनात पडला होता. परंतु,आता हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गुरुवार 4 जुलै 2024 रोजी साय 6 वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले . त्या पत्रात असे नमूद आहे की मायनिंगसाठी ड्रोनने सर्व्हे करायची परवानगी कंपनीला महाराष्ट्र सरकारने तसेच जिल्हाधिकारी(कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक 8 जुलै ते 30 जुलै कालावधीत ड्रोनने मायनिंग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत , ग्रामपंचायतने त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही .तरीही त्यांचे म्हणणे आहे आम्ही ग्राम पंचायतची परवानगी मागायला आलो नाही फक्त सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्रामपंचायतला कळवीत आहोत . वरील पत्रात 840 हेक्टर एवढी आजगाव ब्लॉकमधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनीला मायनिंगसाठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबतचे हे पत्र आहे. अतिशय गंभीर असा हा विषय असून 840 हेक्टर पैकी किती लोकांची जमीन ,घरे ,बागबागायत घेणार आहेत हे आज तरी सांगता येत नाही . संपूर्ण आजगाव गावावर आलेले हे संकट आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येउन एकजुटीने निर्णय घेण्याची गरज आहे. सोमवारी होणाऱ्या या सर्व्हेबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. तरी सर्व स्त्री -पुरुष ग्रामस्थांनी रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता आजगाव, मराठी शाळा वाचनालय हॉल येथे सभेसाठी जमावे असे आवाहन करण्यात आले आहे.