For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडामार्गातील संकट ‘हत्ती’एवढे

06:51 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोडामार्गातील संकट ‘हत्ती’एवढे
Advertisement

कोकणातील तिलारी खोऱ्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींचा धुमाकुळ सुरू झाला आहे. अन्न व पाण्याच्या शोधात आता हत्तींचे कळप जंगलातून थेट लोकवस्तीमध्ये येऊ लागले असून दिवसाढवळ्या रस्त्यावर फिरू लागले आहेत. गेली 21 वर्षे या रानटी हत्तींपासून शेतकरी त्रस्त असून भयभीत जीवन जगत आहेत. हत्ती संकट दूर करण्यात शासन व प्रशासन अपयशी ठरले असून या हत्ती संकटापासून आमची मुक्तता कधी होणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात रानटी हत्तींचा वाढता उपद्रव तेथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या काळजात धडकी भरवत आहे. शेती बागायतीत नुकसान करणारे हे गजराज पिल्लांसह आता थेट लोकवस्तीतही  दाखल होऊ लागल्याने आणि नागरिकांनी बाहेर ठेवलेले पाणी पिण्यासाठी गजराज येऊ लागल्याने नागरिकांना आता घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले आहे. सिंधुदुर्गात हत्तींचे आगमन होऊन 21 वर्षे झाली, तरी ‘हत्ती संकटा’पासून मुक्तता करण्यात शासन, प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.

2002 मध्ये प्रथम सात हत्तींचा कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला होता. त्यानंतर पुढील वर्षभर या कळपाच्या हालचाली दोडामार्ग तालुक्यापुरत्याच मर्यादित होत्या. याच दरम्यान 2004 मध्ये आठ हत्तींनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी मध्येच दोडामार्ग तालुक्यात आलेल्या 25 हत्तींपैकी 16 हत्तींना मागे पिटाळून लावण्यात वन विभागाला यश आले. मात्र 2005 पासून रानटी ‘सिंधुदुर्ग निवासी’ झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2009 मध्ये एकूण 17 हत्ती असल्याचे सांगितले जात होते. 2009 मध्ये दुसऱ्या वेळी वन विभागाने ‘हत्ती पकड’ मोहिमेची तयारी केली. आसाममधून विशेष पथक आले होते. मात्र या मोहिमेत दोन हत्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर 2015 मधील ‘हत्तीपकड’ मोहिमेनंतर पकडलेल्या तीन हत्तींपैकी दोन हत्तींचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर कर्नाटकच्या जंगलातून सिंधुदुर्गात तिलारी खोऱ्यात हत्तींचे येणे-जाणे सुरूच राहिले. या हत्तींनी शेतशिवारात येत प्रचंड प्रमाणात पिकहानी केली आहे. हत्तींच्या पायी शेतकऱ्यांना संकटाचे दिवस झेलावे लागत आहेत. हत्तींच्या हल्ल्यात जीवित हानीही झाली आहे. भारतात सर्वाधिक हत्ती नुकसान भरपाई दिलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचे नाव घेतले जाते. परंतु, हत्तींच्या भीतीपोटी शेती पीक घेणेच शेतकऱ्यांनी सोडले. बागायती नष्ट झाल्या, तर नुकसान भरपाई तरी कुठली मिळणार आहे, हा प्रश्न आहे. हत्तींच्या संकटापासून मुक्त करणेच आवश्यक ठरणार आहे.

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यामधील आजरा, चंदगड या भागासह सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे, सोनावल, पाळये, केर, मोर्ले आदी गावांमध्ये हत्तींच्या कळपाने अक्षरश: थैमान घातले आहे. शेतीच्या नुकसानीबरोबरच थेट आता फणस खाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी हत्ती शिरकाव करू लागले आहेत. या परिसरात एकूण सहा हत्ती वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे. यात दोन टस्कर, एक मादी व तीन पिल्लू आहेत. हे सहाही हत्ती एकत्र कळपात नसून विखुरलेले आहेत. मोर्ले व हेवाळे येथे दोन टस्करचे वास्तव्य असून चार दिवसांपूर्वीच दोन्ही टस्करमध्ये जोरदार झुंज झाली. दोन्ही टस्करमध्ये झालेले घमासान भयावह होते. गत आठवड्यात मोर्ले येथे काजू बागेत जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अंगावरही टस्कराने चाल केली होती. आता काजूचा हंगाम असून हत्तींच्या वावरामुळे आणि टस्करच्या दहशतीने शेतकरी एकंदरच भयभीत झाले आहेत.

तिलारी परिसरात हत्ती अभयारण्य करण्याच्या घोषणा केल्या गेल्या. परंतु,आजवर प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. मिळणारी नुकसान भरपाईही तुटपुंजी असून ती अधिक मिळाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तिलारी खोऱ्यात सर्वाधिक काजू पिक तसेच केळी, माड, रबर लागवड, भात शेती व इतर पिके घेतली जातात. मात्र भविष्यात शेती बागायतीच नाही, तर नुकसान भरपाई तरी कुठून मिळणार असा प्रश्न आहे.

कर्नाटक राज्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या रानटी हत्तींचे मार्ग कसे रोखता येतील किंवा लोकवस्तीत हत्ती येणार नाहीत, यासाठी काय नेमक्या उपाययोजना करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. पर्याय आहेत नाही असे नाही. पण त्याबाबतच नेहमीच सरकारची उदासिनता दिसून आली आहे. हत्ती लोकवस्तीत येण्यापूर्वी पूर्वसूचना देणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. हत्ती पकड मोहिमेसाठी गुंतविण्यात येणारा पैसा जर हत्तीग्रस्त गावामध्ये सायरन, प्लॅश लाईट, रेडिओ कॉलर, कम्युनिटी गार्डनिंगमध्ये गुंतविल्यास मानव-हत्ती संघर्ष निवळण्यास मदत होईल. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे तांत्रिक अनुभव नसताना हत्ती प्रशिक्षण केंद्र उभारून हत्तींचा कोंडमारा करण्यापेक्षा त्यांच्या संवर्धनावर लक्ष दिले गेले पाहिजे. हत्तींपासून होणाऱ्या पिक नुकसान भरपाईमध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे.

सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले बांबू, भेडले माड व इतर खाद्य आणि बारमाही पाण्याचे स्त्राsत त्याशिवाय नारळ, केळी, काजूच्या बागा, मोठ्या प्रमाणावर भात लागवड हे खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने जवळपासच्या भागातच हत्ती स्थिरावलेले आहेत. त्यांच्यापासून शेती बागायती बचावाच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.  आसामसारखे ‘लिव्हिंग विथ एलिफंट्स’ असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

कोकणातील वन्य प्राणी संपदा पाहता वास्तविक येथे वन विभागाचा स्वतंत्र वन्यजीव विभाग सुरू करणे अपेक्षित आहे. हत्तींबरोबरच आता गवारेडेही शेतीचे नुकसान करू लागले आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवर शेती, बागायती आणि शेतकऱ्याचे संरक्षण आणि वन्य प्राण्यांचे संवर्धन यात सुवर्णमध्य निघण्याची आवश्यकता आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.