For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोव्यातील क्रिकेट स्टेडियम प्रकल्प 2011 पासून रखडलाय...

06:47 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यातील क्रिकेट स्टेडियम प्रकल्प 2011 पासून रखडलाय
Advertisement

गोव्यातील पेडणे तालुक्यातील धारगळ येथील क्रिकेट स्टेडियम प्रकल्प 2011 पासून रखडलेला आहे. गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम नेमके कधी होईल, हे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. जोपर्यंत गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) मालकीचे स्वत:चे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होत नाही, तोपर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही होऊ शकत नाहीत. त्यामुळे क्रिकेट खेळावर प्रेम करणाऱ्या गोवेकरांवर एकप्रकारे होत असलेला हा अन्याय आहे.

Advertisement

‘जीसीए’च्या निवडणुकीत दरवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्याचे गाजर पुढे करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र निवडून आल्यानंतर कुणीही पोटतिडिकीने हा विषय पुढे नेत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्यात भर म्हणून सरकारला हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम धारगळ येथे व्हावे, असे खरेच वाटते का? हा देखील प्रश्न आहे. कारण, ‘जीसीए’ने म्हावळींगे-डिचोली येथे क्रिकेट स्टेडियमसाठी स्वत:ची जागा खरेदी केली होती. त्याठिकाणी हे स्टेडियम व्हावे, अशी सरकारमधील काही जणांची इच्छा आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत क्रिकेट संदर्भातील एका प्रश्नावर उत्तर देताना धारगळ येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम प्रकल्पाचे बांधकाम करारानुसार 2028 पर्यंत सुरू होईल, अशी माहिती दिली होती मात्र स्टेडियमसाठी विशेष अशी कोणतीच हालचाल ‘जीसीए’तर्फे होत नाही.

Advertisement

गोव्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 14 फेब्रुवारी 2007 रोजी मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या दोन संघात झाला होता. या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात, भारताने श्रीलंकेवर विजय मिळविला होता. त्यानंतर 24 ऑक्टोबर 2010 साली भारत विऊद्ध ऑस्ट्रेलिया, असा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार होता मात्र मैदानातील ओलावा व पावसामुळे सामना रद्द करावा लागला.

त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यासाठी संबंधित राज्य क्रिकेट संघटनेकडे स्वत:चे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असणे अनिवार्य आहे आणि गोवा क्रिकेट असोसिएशनकडे स्वत:चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नसल्याने गोव्यात क्रिकेटचे सामने पाहण्याची इच्छा असलेल्यांना आणखीन किती वर्षे वाट पाहावी लागेल, हे देखील सांगता येत नाही.

गोवा क्रिकेट असोसिएशनला जमीन मिळून, चौदा वर्षे उलटूनही प्रकल्प सुरू न झाल्याबद्दल आज सर्वत्र नाराजी आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनने प्रकल्पासाठी आवश्यक असलेली काही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळविली असल्याचे सांगितले जात आहे परंतु अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुऊवात झालेली नाही. ‘करारानुसार, गोवा क्रिकेट असोसिएशनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम 2028 पर्यंत सुरू करणे बंधनकारक आहे’ मात्र या मुदतीत ‘जीसीए’ क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी पुढाकार घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी ‘जीसीए’ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी एक वर्षाची मुदत दिलेली आहे. जर दिलेल्या मुदतीत स्टेडियमचे काम हाती न घेतल्यास, जमीन पुन्हा ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे.

धारगळ येथील स्टेडियम, क्रीडा आणि युवक कल्याण संचालनालयाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या 1,89,930 चौरस मीटर जागेवर उभारण्याचे प्रस्तावित आहे मात्र अद्याप या ठिकाणी कोणतेही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. गोवा क्रिकेट असोसिएशनला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शंभर कोटी ऊपयांचे अनुदान मिळाले आहे. ही रक्कम सध्या तीन बँकांमध्ये मुदत ठेव स्वरुपात ठेवण्यात आली आहे.

‘जीसीए’ची नोंदणी ‘सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट’ अंतर्गत झालेली असून, ते  आपले ताळेबंद ‘रजिस्ट्रार ऑफ सोसायटीज’कडे सादर करते तसेच या असोसिएशनचे लेखा परीक्षण अंतर्गत आणि बाह्य अशा तीन प्रकारच्या सनदी लेखापालांकडून केले जाते. त्यात 50 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झालेले आहे. त्यामुळे स्टेडियमसाठी ‘जीसीए’ किती प्रमाणात पुढाकार घेणार, हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे.

गोव्यात काणकोणपासून पेडणेपर्यंत क्रिकेटवर प्रेम करणारे असंख्य चाहते आहेत. अनेक खेळाडू मैदानावर घाम गाळतात. त्या सर्वांचे एक स्वप्न आहे की, गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शक्य तितक्या लवकर व्हावे परंतु ‘जीसीए’वर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची तशी इच्छाशक्ती दिसत नाही. आर्थिक घोटाळ्यापलीकडे स्टेडियम उभारण्यासाठी कधीच गांभीर्याने प्रयत्न केलेला नाही. गोव्यात जोपर्यंत गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्वत:च्या मालकीचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम होत नाही, तोपर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीत, हे मात्र कटू सत्य गोवेकरांना पचवावे लागत आहे.

महेश कोनेकर

Advertisement
Tags :

.