For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगाचे निर्माण होणे किंवा नष्ट होणे हे पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून असते

06:30 AM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगाचे निर्माण होणे किंवा नष्ट होणे हे पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून असते
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

भगवंत म्हणाले, चार युगांच्या जेव्हा हजार फेऱ्या होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. रात्रही तेव्हढ्याच काळाची असते. ह्या कालावधीत जे मरत नाहीत ते खरे चिरंजीव होत. ह्यावरून भगवंतांची अनन्य भक्ती करून चिरंजीव होणाऱ्या भक्तांचे महात्म्य आपल्या लक्षात येते. मोहाचे प्रसंग टाळून देवाची भक्ती करणे मनुष्य देहातच शक्य आहे. त्यामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न न केल्यास पुन:पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रातून फिरावे लागते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालावधीत असे हजारो जन्म होऊ शकतात. ब्राह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व वस्तू उत्पन्न होतात आणि त्याच अव्यक्तामध्ये त्या ब्रह्मदेवाच्या रात्रीत नाहीशा होतात. ईश्वर सोडून कुणीही कर्ता नसल्याने कुणाच्या कितीही मनात असले तरी त्यात बदल होऊ शकत नाही. ब्रह्मदेवाचा दिवस उगवला की, अव्यक्तातून अखिल विश्वाची निर्मिती होते आणि रात्री ते अव्यक्तात विलय पावते हे सांगितल्यानंतर भगवंत पुढील श्लोकात सांगतात, ह्या अव्यक्तापलीकडे एक अव्यक्त आहे ते मात्र कधीही नाश पावत नाही.

अव्यक्त दुसरे तत्त्व त्या अव्यक्तापलीकडे। नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन ।।20।।

Advertisement

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जे दिसत नाही त्याला अव्यक्त म्हणतात. माया किंवा प्रकृती ही अव्यक्त असते तेव्हा तिच्यामध्ये असलेले सत्व, रज, तम हे त्रिगुण साम्यावस्थेत असतात. ती साम्यावस्था मोडली की, जगाची निर्मिती होते आणि ते सर्वांच्या दृष्टीस पडते. जेव्हा पुन्हा साम्यावस्था प्रस्थापित होते तेव्हा विश्वाचा नाश होतो. ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने आटवल्यावर त्यातील शुद्ध सोन्याची लगड तयार होते. पुन्हा हवे तेव्हा त्या लगडीपासून हव्या त्या नमुन्याचे दागिने तयार करता येतात. लगड किंवा दागिने ह्या दोन्हींचे अस्तित्व सोन्यावर आधारित असते. त्याप्रमाणे मायेने रचलेले जग किंवा त्याचे नष्ट होणे हे पूर्णपणे चैतन्यावर म्हणजे परमेश्वरावर अवलंबून आहे. तो जगाच्या असण्या किंवा नसण्याच्या पलीकडचा आहे. तो जर तसा नसता तर जगाचे अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे ह्या म्हणण्याला अर्थ उरला नसता. तो साकारही नाही आणि निराकारही नाही. तो असणे आणि नसणे या दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून त्याचे अस्तित्व कायम आहे. त्याच्या चैतन्यामुळे विश्व तयार होते परंतु ते नाहीसे झाले तरी चैतन्य नाहीसे होत नाही. पाण्यावर लाटा उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधारभूत असलेले पाणी सर्वकाळ असते, त्याप्रमाणे या नाशीवंत प्राणीमात्रास आधारभूत असलेले चैतन्य अविनाशी असते. ह्या चैतन्यातून मिळालेल्या चेतनेमुळे प्राणीमात्रांच्या हालचाली चालू असतात. ज्याप्रमाणे आटणाऱ्या अलंकारातच न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे जीवांच्यामध्ये चैतन्य असते. त्यांचे जीवन संपुष्टात आले तरी चैतन्य मात्र आहे तसेच असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.