कबुतर पाळण्याचा नाद खुळा!
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कबूतर पाळायचे की नाही? पाळीव कबुतराचा सहवास चांगला की वाईट? ही चर्चा मुंबईतील कबुतरखान्याच्या निमित्ताने सुरू झाली आहे. पण कोल्हापूरात 70 ते 80 ठिकाणी कबुतरांच्या पेट्या आहेत. कबुतरे पाळण्याचा छंद अनेकांनी जपला आहे. आणि कबुतराची पेटी, त्यातली कबुतरे आणि त्या कबुतरांची आकाशात विहार करण्याची क्षमता यावर जी स्पर्धा भरते, त्यात कोल्हापूरकरांना अगदी आग्रहाचे स्थान आहे.
कोल्हापुरातली यावर्षीची कबुतरांची ही अनोखी स्पर्धा पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाली. गंगावेश कबूतरप्रेमींनी ही स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेत शिवन्या विलास चव्हाण यांच्या कबुतराने 9 तास 34 मिनिटे आकाशात सलग विहार करून पहिला क्रमांक पटकावला. कोल्हापुरातील बहुतेक तालमीच्या आवारात किंवा आताही कबुतरे खासगी जागी पण शक्यतो टेरेसवर आणि गच्चीतच आहेत. जरूर यापूर्वीच्या तुलनेत त्यांची संख्या थोडी कमी असेल. पण कबुतरे पाळण्याचा छंद आजही कोल्हापुरात अतिशय आस्थेने जपला आहे. कबूतर पाळणारे, या कबुतरांवर प्रेम करणारे कबूतरप्रेमीही आहेत. कबुतरांच्या स्पर्धेचा मोठा शौकीनवर्ग कोल्हापुरात आहे आणि स्पर्धेत असलेल्या कबुतरांवर खालून लक्ष ठेवणारे अतिशय तीव्र दृष्टीचे मानले जाणारे पंच कोल्हापुरात आहेत.

अलीकडे कबूतरांचा माणसाशी संपर्क येण्याने काही आजार उद्भवतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण कोल्हापूरतील कबुतरे पालन करणाऱ्यांच्या मते त्यांनी वर्षानुवर्षे कबुतरे पाळली आहेत. आमची कबुतरे पाळीव आहेत. आम्हाला त्यांच्यामुळे कोणताही आजार झालेला नाही. पण शांततेचे प्रतीक असलेली ही कबुतरे मनापासून जतन करत आहोत आणि त्यात आम्हाला मोठा आनंद आहे, तेवढीच त्यांची प्रतिक्रिया आहे.
कोल्हापुरात गेल्या तीन-चार पिढ्यांत एखादी व्यक्ती, एखादे कुटुंब आणि खासगी व्यक्तींनी कबुतर पाळण्याचा छंद जपला आहे. त्यासाठी छोटे-छोटे कप्पे असलेली लाकडी कपाटे आहेत. पहिल्यांदा या कबुतराच्या पेट्या मोकळ्या जागेत होत्या. पण मोकळ्या जागेवर बांधकामे झाल्याने कबुतरांच्या या पेट्याची जागा आता टेरेस गच्चीवर गेली आहे. हा छंद कमी-अधिक प्रमाणात आजही सुरू आहे.
कोल्हापुरात कबूतरप्रेमी तर आहेतच. पण या कबूतरप्रेमींचे वेगवेगळे ग्रुप आहेत. ते कबुतरांची स्पर्धा भरवतात. गंगावेश कबूतरप्रेमींनी 1 ते 28 एप्रिल या कालावधीत स्पर्धा घेतली. जास्तीत जास्त वेळ जे कबूतर आकाशात विहार करेल, त्याला 30 हजार रूपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. कोल्हापुरातील पाळलेली सर्व कबुतरे पाळीव प्रवर्गातील आहेत. यात एकही जंगली कबूतर नाही. या कबुतरांना ठराविक महिन्यांनी लस दिली जाते. सर्व पाळीव कबुतरांना उच्च दर्जाचे खाणे दिले जाते. ही कबुतरे त्यांच्या कुटुंबांचा एक भाग झाली आहेत. कबुतरांना दीपा, बाबू, राणी, विद्या, जाई, जुई अशी वेगवेगळी नावे आहेत. अलीकडच्या काळात टेरेसवर जाळी बांधून कबुतरे पाळली जातात. त्यांची स्वच्छता ठेवली जाते. लाडक्या किंवा शर्यतीत नंबर मिळवून देणाऱ्या कबुतरांना काजू बदामाचा आहार दिला जात आहे. किंबहुना एक स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट त्यांना आहे.

- तालमीच्या आवारात कबुतरांचे पालन
कोल्हापुरातील बहुतेक सर्व तालमींच्या आवारात कबुतरांच्या पेट्या होत्या. तालमीच्यावतीने किंवा तालमीच्या परिसरातील एखाद्या व्यक्तीच्या मदतीने या कबुतरांचे पालन पोषण होत होते.
- कबुतर स्पर्धेतील पंचांची नजरही तितकीच तीव्र
दरवर्षी कोल्हापुरात एप्रिल महिन्यात आणि दिवाळीनंतरच्या महिन्यात कबुतरांची स्पर्धा भरवण्याची परंपरा आहे. या स्पर्धेत कबुतरांना आकाशात उडवले जाते आणि हे कबूतर सलग किती वेळ आकाशात उडत राहते, याच्या नोंदी घेतल्या जातात. स्पर्धेतील कबूतर उडत असताना चार पंच एखाद्या इमारतीच्या टेरेसवरून या कबुतरांवर नजर ठेवून असतात. उडणारे कबुतर जमिनीवरून अगदी कागदाच्या छोट्या तुकड्याइतके लहान दिसत असते. या स्पर्धेतील पंचांची नजर इतकी तीव्र असते, की स्पर्धेतील म्हणजे अवकाशातील प्रत्येक कबुतराला ते पाहू शकतात. शर्यतीचा हा प्रकार कल्पनेच्या पलीकडचा आहे. पण कोल्हापुरात दरवर्षी कबुतरांची स्पर्धा भरणार, हे ठरवून गेले आहे.
- कबुतर जोडीला दर हजारांपासून पुढे
कबुतरांचे जोडीचे दर हजार आणि लाखांत आहेत. त्यांच्या पालनाचा खर्चही मोठा आहे. पण कबूतर पालनाचा छंद असलेले लोक कोल्हापूर, सांगली परिसरात आहेत.