गाय तारी त्याला...
भारत देश अनेक समाजघटकांचा बनला आहे. प्रत्येक समाजघटकाची संस्कृती आणि चालीरिती भिन्न भिन्न आहेत. काळानुसार अनेक मान्यता आणि समजुतींमध्ये परिवर्तन झालेले आहे तर काही समजुती पूर्वी होत्या तशा आजही आहेत. काही समजुती धोकादायकही असल्याचे इतरांना दिसून येते. तथापि, त्या पाळणारे लोक अत्यंत निष्ठावान असल्याने ते इतर लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता त्या पाळतात. कर्नाटकामध्ये अशी एक प्रथा आहे. या प्रथेनुसार नवजात अर्भकाला भूमीवर झोपविले जाते आणि गायीला त्याच्यावरुन चालविले जाते. अर्भक गाईच्या पायाखाली तुडविले गेले नाही, तर ते शुभ मानले जाते.
कर्नाटकातील श्री कालभैरवेश्वर स्वामी मंदिरात ही प्रथा पाळली जाते. येथे आसपासच्या प्रदेशांमधून अनेक मातापिता आपल्या नवजात अर्भकांना घेऊन येतात. मंदिरात पूजा आणि प्रार्थना करतात. त्यानंतर मंदिराच्या फरशीवर अर्भकाला झोपविले जाते. मंदिराची गाय या अर्भकावरुन चालत जाते. तथापि, बहुतेकवेळा ती आपला पाय खाली झोपविलेल्या अर्भकाला लागू देत नाही. हे मंदिर या प्रथेसाठीच प्रसिद्ध आहे. गाईचे पाय जरी अर्भकाला लागत नसले तरी ते त्याच्या अगदी जवळ येतात आणि ते दृष्य पाहणाऱ्याच्या अंगाचा थरकाप होतो. ही प्रथा बंद करावी, अशी मागणी अनेकांनी केली असूनही ती सुरु आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण अनेकांना परिचित आहे. आता गाय तारी त्याला कोण मारी अशी नवी म्हण निर्माण करावी, असे हे दृष्य पाहताना वाटते.