देशाचा शाश्वत विकास जगाला मार्गदर्शक
डॉ. अनिरुद्ध पंडित यांचे प्रतिपादन : वाय. के. प्रभू-आजगावकर व्याख्यानात मांडले विचार
प्रतिनिधी/ बेळगाव
सौर ऊर्जेच्या संशोधनामुळे पर्यावरणाचा समतोल राखून जो विकास होत आहे, तो भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. भारताने शाश्वत विकासासाठी मांडलेली भूमिका ही जगाला दिशादर्शक आहे. शाश्वत विकासाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे इतर देशांपेक्षा पर्यावरणाची हानी कमी झाली आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरु डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केले.
साऊथ कोकण एज्युकेशनच्यावतीने शनिवारी आरपीडी कॉलेजच्या जिमखाना हॉलमध्ये तात्या उर्फ डॉ. वाय. के. प्रभू-आजगावकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ‘तरुण भारत’ ट्रस्टच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी ‘सस्टेनॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट’ या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसकेई सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर होते.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही चांगल्या सुविधा पुरविल्या तर शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल. स्थलांतर रोखायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरणाचा ऱ्हास न करता अनेक उपक्रम ग्रामीण भागात सुरू केले जाऊ शकतात. देशाचे दरडोई उत्पन्न वाढत असून आज देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये गणली जात आहे. जय जवान, जय किसान या बरोबरच आता जय विज्ञान व जय अनुसंधान हेदेखील कालांतराने जोडावे लागणार आहे. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय भविष्यात प्रगती होणे अशक्य आहे, हे अनिरुद्ध पंडित यांनी उदाहरणांसहित स्पष्ट केले.
संस्थेचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर म्हणाले, विज्ञानामुळे प्रगती झाली की अधोगती हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. सौर ऊर्जेचा वापर करून देशामध्ये अनेक प्रकल्प सध्या राबविण्यात आले आहेत. भरपूर सूर्यप्रकाश असल्यामुळे सौर ऊर्जेची निर्मिती होत असते. यामुळे प्रदूषणाची हानी टाळता येत असून पर्यवरणाचा समतोल राखणे शक्य होत आहे. प्रत्येकाने झाडे लावून आपापल्या परीने पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल, याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
तात्या प्रभू-आजगावकर हे प्रगल्भ बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीसाठी केला. संस्थेत नवीन विभाग सुरू करणे, प्राध्यापकांशी स्वत: संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्या शाखांचा जास्त उपयोग होईल, यानुसार शिक्षण देणे यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे एसकेई सोसायटीच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान नेहमीच दिशादर्शक राहिले, असे विचार डॉ. ठाकुर यांनी मांडले.
वैष्णवी सडेकर हिने ईशस्तवन सादर केले. प्राचार्य अरविंद हलगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हेमांगी प्रभू व प्रा. अभय सामंत यांनी परिचय करून दिला. एसकेई सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉ. एस. वाय. प्रभू यांनी तात्या प्रभू-आजगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य सुभाष देसाई यांनी आभार मानले. यावेळी साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.