देशाला प्रगतीकडे नेणारा मतदार 'इंडिया' आघाडीला नक्की नाकारेल; खासदार संजय मंडलिक
यांना विश्वास : मुरगुडात विजयमाला मंडलिक यांचा ४३ वा स्मृतिदिन संपन्न
मुरगुड / वार्ताहर
दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि माझ्या विजयामध्ये जय शिवराय एज्युकेशन संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान अर्ध्याहून अधिक असून या निवडणुकीमध्येही हा घटक मोठ्या हिमतीने राबेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षातील क्रांतीकारक बदलांमुळे देशाला प्रगतीकडे नेणारा मतदार इंडिया आघाडीला नाकारुन नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाची हॅटट्रिक नक्की साधेल असा ठाम विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
कै. विजयमाला सदाशिवराव मंडलिक यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत होते.
कोल्हापूरचा महापूर, कोरोनाचा कहर आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष यामुळे तब्बल अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्याला विकास निधी मिळाला नाही. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून जिल्ह्याला विविध विकास कामासाठी ८०० कोटीपर्यंतचा निधी देता आला. जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग यामुळे भरून निघाला असेही प्रा. मंडलिक यांनी सांगितले.
स्वागत शिवरायांचे प्राचार्य पिढी माने यांनी केले तर प्रास्ताविकात मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी विजयमाला मंडलिक यांच्या स्मृतींना उजाळा दिला. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले अॅङ वीरेंद्र मंडलिक आदींनी मनोगते व्यक्त केली. माजी नगरसेवक एस. व्ही. चौगले, जीवन साळोखे, प्रा. संभाजी अंगज, किरण गवाणकर, सुनील रणवरे, दिलीप कांबळे, सुनील मंडलिक यांच्यासह संस्थेतील सर्व शाळा -कॉलेजचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. आभार यु. बी. पाटील यांनी मानले.
आम्हाला गुलाब फूल तोडण्यासही तलवारच घ्यावी लागते
मंडलिक गटाला संघर्ष काही नवा नाही. गुलाबाचे फुल तोडतानादेखील आम्हाला तलवारच घ्यावी लागते. त्यामुळे या निवडणुकीत मध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी प्रचारामध्ये प्रयत्नची पराकाष्टा करावी असे आवाहन प्रा. मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.