‘लॅण्ड यूज’ बदलासाठीचा खर्च, वेळ वाचणार
सरकारचा नवीन नियम लवकरच : कृष्णभैरेगौडा यांची माहिती
बेळगाव : मास्टर प्लानमधील लॅण्ड युजनुसार जमिनीचा वापर करण्याची मुभा भविष्यात सरकारकडून दिली जाणार आहे. ज्या उद्देशासाठी मास्टर प्लानमध्ये जमीन राखीव असेल त्या उद्देशासाठी सदर जमिनीचा वापर करता येणार आहे. याबाबतची माहिती महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी विधानसभेत दिली. कर्नाटक भू-वापरबदल विधेयक मांडण्यात आले. त्याला मंजुरी देण्यात आल्याने लवकरच भू-वापर बदलासंबंधीचे नियम जारी केले जाणार आहेत.
यापूर्वीच्या नियमानुसार शहरातील जमिनीच्या लॅण्ड यूज बदलाची प्रक्रिया बुडा प्रशासनाकडून पूर्ण करून घ्यावी लागत होती. शेतजमीन असेल तर बिगर शेतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवावी लागत होती. व्यावसायिक, औद्योगिक वापरासाठी राखीव जमिनीच्या लॅण्ड यूज बदलासाठी बुडा किंवा शासनाकडे अर्ज करावा लागत होता. पण आता मास्टर प्लॅन तयार करताना शहर किंवा नगरविकास प्राधिकरणच्या कार्यक्षेत्रात जी जमीन ज्या उद्देशासाठी राखीव ठेवली जाईल, त्या जमिनीचा त्या कारणासाठी थेट वापर करता येणार आहे. त्यामुळे जमिनीचा एनए करण्याचीही गरज भासणार नाही. व्यावसायिक, औद्योगिक उद्देशासाठी वापरता येणार आहे.
बेळगाव शहराचा नवा मास्टर प्लान लवकरच
बेळगाव शहराचा नवा मास्टर प्लान तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. शहर व तालुक्यातील 55 गावांसाठी नवा मास्टर प्लान तयार केला जाणार आहे. त्यामुळे नव्या मास्टर प्लानमध्ये बेळगाव नगरविकास प्राधिकरण तथा बुडाकडून जे आरक्षण दाखविले जाईल तेच आरक्षण कायम राहणार आहे. यामुळे भू-वापर बदलासाठीची नागरिकांना करावा लागणारा खर्च व वेळ वाचणार आहे. महसूल मंत्र्यांनी सादर केलेले हे विधेयक आता विधानपरिषदेत सादर केले जाणार आहे.