भंडारी समाजातील वाद आणखी उफाळला
दुसऱ्या गटाकडून आज तातडीची बैठक
पणजी : भंडारी समाजातील वाद आणखी उफाळून आला आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना अध्यक्ष अशोक नाईक यांनी भंडारी समाजाची निवडणूक जाहीर केली. त्याचबरोबर मतदारयादीतून अनेकांची नावे वगळल्याने एकच गोंधळ माजला आहे. संतप्त भंडारी समाजातील उपेंद्र गावकर गटासह इतर सर्वांनी आज मंगळवारी भंडारी समाजाची तातडीने महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. भंडारी समाजाच्या नोंदणीसंदर्भात उत्तर गोवा नोंदणी प्रबंधकांनी उपेंद्र गावकर यांना मान्यता दिल्यानंतर उच्च न्यायालयाने नव्याने सुरळीत प्रक्रिया करण्याचे निर्देश देऊन तोपर्यंत प्रबंधकांनी दिलेला आदेश रद्दबातल ठरविला आणि नव्याने प्रक्रिया सुऊ करण्यास सांगितले आहे. यामुळे आपला विजय झाला, असे समजून आता अशोक नाईक गटाने भंडारी समाजाच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडणुकीची घोषणा केली. प्रकरण न्यायालयात असताना देखील निवडणुकीची प्रक्रिया सुऊ झाल्याने भंडारी समाजात खळबळ उडाली आहे.
ही निवडणूक एकतर्फी होऊ नये म्हणून दुसऱ्या गटातील अनेकांनी भंडारी समाजाच्या पाटो येथील कार्यालयात जाऊन विहित नमून्यातील अर्ज मागितले असता अनेकांना त्यांची नावे मतदारयादीतून रद्द करण्यात आल्याचे उघड झाले. उपेंद्र गावकर यांच्यासह अनेकांची नावे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे गोंधळात आणखी भर पडली आहे. जाब विचारण्यास गेलेल्या व्यक्तींना परतून लावण्यात आले. त्यामुळे गोव्यातील भंडारी समाजाचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आणि तळमळीने कार्य करणाऱ्यांची आज मंगळवारी पणजीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत पुढील रणनीती निश्चित करण्यात येणार आहे. बैठक कुठे व किती वाजता? याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आलेली आहे. मात्र बैठकीत महत्त्वाचे निर्णय होतील आणि सायंकाळी त्याची घोषणा होईल, असा अंदाज आहे.