दार यांच्या बांगलादेश भेटीमागील गौडबंगाल
गेल्या शनिवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आले. पाकिस्तानच्या वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्याने बांगलादेशास भेट देण्याची 13 वर्षांनंतर ही पहिलीच वेळ. यापूर्वी हिना खार या परराष्ट्रमंत्री महिलेने बांगलादेशास 2012 साली भेट दिली होती. मात्र त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. तो बांगलादेश पाकिस्तानच्या कह्यात जाणारा नव्हता. आता बदलत्या परिस्थितीत भारत-बांगलादेश संबंधात निर्माण झालेल्या दरीमुळे जी पोकळी दृष्यमान झाली आहे ती भरुन काढण्याचा अटोकाट प्रयत्न पाकिस्तानने सुरू केला आहे. इशाक दार यांच्या ताज्या भेटीत याचा पुन:प्रत्यय आला.
वर्षापूर्वी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पदभ्रष्ट होऊन आश्रयास भारतात आल्या आणि बांगलादेशाची सत्तासूत्रे अंतरिम सरकारकडे गेली. या सरकारचे प्रमुख सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात बांगलादेशाच्या विदेश नीतीने एका बाबतीत जे अनपेक्षित वळण घेतले ते भारतासाठी धोक्याची घंटा वाजवणारे ठरले. ज्या बांगलादेशास त्यांच्या पाकिस्तानपासूनच्या स्वातंत्र्यासाठी भारताने तन, मन धनाने सहाय्य करुन ते साकारण्यात सिंहाचा वाटा उचलला तोच बांगलादेश भारतास बाजूस सारून ज्याच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढून स्वातंत्र्य मिळाले त्या पाकिस्तानास जवळ करीत आहे. या स्थितीबदलामुळे कधी अमेरिकेच्या तर कधी चीनच्या हातचे बाहुले बनून आपस्वार्थ साधत भारतासारख्या स्थिर व स्वतंत्र देशास उपद्रव देण्यात धन्यता मानणाऱ्या पाकिस्तानास आयतीच संधी प्राप्त झाली आहे.
इशाक दार यांच्या भेटीदरम्यान बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. ज्यात व्यापार विषयक मुद्यांवर संयुक्त कार्यगटाची स्थापना, उभय देशांच्या परराष्ट्र सेवा संस्थांतील सहकार्य, दोन्ही देशांच्या सरकारी वृत्तसंस्थांतील सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय व राजनैतिक अभ्यास केंद्रांची परस्पर देवाण-घेवाण अशा करारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तान व बांगलादेशाने अधिकृत आणि राजनैतिक पासपोर्टधारकांसाठी व्हिसा सवलत करारावर स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ अधिकृत किंवा राजनैतिक पासपोर्ट बाळगणारे पाकिस्तानी व बांगलादेशी परस्पर देशांचा व्हिसामुक्त प्रवास करु शकतील. या दौऱ्या दरम्यान दार यांनी अंतरिम सरकार प्रमुख मुहम्मद युनूस यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, व्यापार वाढवणे, युवा पिढीतील देवाण-घेवाण, शैक्षणिक व सांस्कृतिक नाते बळकट करणे आणि सार्कच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला.
बांगलादेश भेटीत दारनी बांगलादेश
नॅशनॅलीस्ट पार्टी (बीएनपी) नेत्या बेगम खलिदा झिया यांची भेट घेतली. शेख हसीना राजवटीत बीएनपी प्रमुख विरोधी पक्ष होता. हा पक्ष कट्टरतावादी व भारतविरोधी मानला जातो. 2001 ते 2006 साली जेंव्हा बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी आघाडी सरकार सत्तेत होते तेंव्हा पाकिस्तानशी सहकार्य वाढविण्याचा या आघाडीचा प्रयत्न राहिला. परंतु त्यानंतर दिर्घकाळ सत्तेत असलेल्या अवामी लीगच्या हसीना सरकारने भारताशी संबंध वाढवत पाकिस्तानला दूर सारले. दरम्यान खलिदा झिया भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बराच काळ तुरुंगात व त्यानंतर सशर्त नजरकैदेत होत्या. हसिना सरकार कोसळल्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांची मुक्तता झाली व त्या पुन्हा सक्रिय झाल्या. याच सुमारास अवामी लीग बांगलादेशाच्या राजकारणातून नेस्तनाबूत झाला आणि झियांच्या बीएनपीस प्रमुख राजकीय पक्षाचे स्थान मिळाले. येत्या फेब्रुवारीत जर निवडणूका झाल्या तर हा पक्ष सत्तेत येण्याच्या दाट शक्यता आहेत. तसे झाल्यास अंतरिम सरकारने सुरू केलेले पाकिस्तान मैत्रीचे धोरण अधिक घट्ट व घनिष्ट बनेल. या पार्श्वभूमीवर इशाक दार यांना झियाकडून भविष्यात पाक मैत्रीचे दार सदैव खुले राहण्याचे आश्वासन मिळाले असावे.
इशाक दारनी जमात-ए-इस्लामी पक्षाचे नेते अमीर शफीकूर रहमान यांचीही भेट घेतली. जमात-ए-इस्लामी कट्टर धर्मवादी पक्ष आहे. भारत द्वेष त्याच्या नसानसात भरला आहे. या पक्षाचे नेते व कार्यकर्ते बांगलादेश स्वातंत्र लढ्यात पाकिस्तानशी संधान साधून देशद्रोहात गुंतले होते. 1971 च्या युद्ध गुन्ह्dयांसाठी त्यांच्यावर खटले चालवून हसीना सरकारने अशा नेत्यांना फासावर चढवले होते. ज्यांचा त्याकाळी पाकिस्तान सरकारने तीव्र शब्दात निषेध केला. कालांतराने दहशतवादी कृत्यास जबाबदार धरुन या पक्षावर बंदी घातली गेली. अंतरिम सरकारने अलीकडेच ही बंदी उठवल्याने हा उपदव्यापी पक्ष पुन्हा मुख्य राजकीय प्रवाहात आला आहे. शेख हसीनांच्या विरोधात जे विद्यार्थी आंदोलन बांगलादेशात झाले त्यात जमात-ए-इस्लामी पक्षाच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता आणि या सहभागास पाकिस्तानचा उघड पाठिंबा होता. आगामी निवडणुकीत जर बीएनपी-जमात-ए-इस्लामी ही अभद्र युती पूर्वीप्रमाणे सत्तेत आली तर बांगलादेशातील भारत विरोधाची धार अंतरिम सरकार कारकिर्दीपेक्षा अधिक घातक बनू शकते. ती तशी बनण्यासाठी पाकिस्तान स्वत:च धार दगडाची भूमिका वठवण्यास एका पायावर तयार आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचा बांगलादेश दौरा खरेतर याआधीच एप्रिलमध्ये होणार होता. परंतु पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संघर्ष व भारतीय सिंदूर मोहीम यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. या संघर्षात बांगलादेशाने तटस्थ भूमिका घेतली. मात्र हा संघर्ष निवळताच दार तातडीने बांगलादेश भेटीवर आले. यातून या देशाचे भारतावर दबाव वाढवण्यासाठीचे साधन म्हणून पाकिस्तानसाठी असलेले महत्त्व अधोरेखित होते. दार यांच्या ताज्या दौऱ्यातून पुढे आलेला एक लक्षणीय मुद्दा म्हणजे त्यांनी बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यावेळी पाकिस्तानकडून झालेला नरसंहार व इतर न सुटलेल्या मुद्यांपैकी दोन महत्त्वाचे मुद्दे आधीच दोनदा निकाली काढण्यात आल्याचे खळबळजनक विधान केले. वास्तविक या लढ्यात पाकिस्तानने केलेल्या सुमारे 30 लाख लोकांच्या नरसंहाराबाबत माफी तसेच 1971 पूर्वीच्या मालमत्ता नुकसान भरपाईपोटी 4-5 अब्ज डॉलर्स निधी या बांगलादेशाच्या दोन महत्त्वाच्या मागण्या पाकिस्तानकडे प्रलंबित आहेत. परंतु हे मुद्दे आता न राहिल्याचे दार यांनी सांगताच त्याचे तीव्र पडसाद बांगलादेशात उमटले. युनूस सरकारचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी लागलीच खुलासा केला. ते म्हणाले, मी निश्चितच दार यांच्याशी सहमत नाही. जर असे झाले असते तर समस्या कधीच सुटल्या असत्या. दोन्ही देश भविष्यात प्रलंबित मुद्यांवर चर्चा सुरू ठेवतील. पाकिस्तान रंग बदलण्यात किती पटाईत आहे याची झलक यावरुन दिसून आली असली तरी बांगलादेश त्यातून धडा घेण्याच्या शक्यता कमीच आहेत.
अलीकडच्या काळात बांगलादेशाचे पाकिस्तानशी राजकीय संबंध वाढीस लागलेच आहेत. शिवाय व्यापारी संबंधातही उल्लेखनिय वाढ झाल्याचे दिसते. 2024 ते 2025 आर्थिक वर्षात द्विपक्षीय 20 टक्यांनी वाढला. याच कालावधीत भारत-बांगलादेश व्यापारात सुमारे 10 टक्क्याने घट झाली. दोन्ही शेजारी देशांच्या वाढत्या व्यापारी भागीदारीस भारत नाराजीने स्वीकारु शकतो. परंतु पाकिस्तान-बांगलादेश लष्करी सहकार्य ही अशी एक मर्यादा आहे की, ज्याचे उल्लंघन भारताच्या पाकिस्तान विषयक दुखऱ्या नसेवरील दाब वाढवित आहे. दोन्ही देशात संयुक्त लष्करी सराव आणि प्रशिक्षण, गुप्तचर खात्याचे परस्पर सहकार्य, पाकिस्तानचा बांगलादेशास थंडर जेएफ-17 ही लढाऊ विमाने देण्याचा मानस, नौदल सरावाबाबत चर्चा, उभयपक्षी लष्करी शिष्टमंडळाच्या वाटाघाटी, यामुळे भारताच्या विस्तीर्ण सीमारेषेनजीक चीन-पाकिस्तान-बांगलादेश असा धोकादायक अक्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. चीन हा पाकिस्तान व बांगलादेशाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार व पायाभूत सुविधा निर्मितीतील भागीदार देश आहे. अधिकृत आकडेवारीनुसार चीन, पाकिस्तानला गरजेच्या 81 टक्के तर बांगलादेशास 74 टक्के या प्रमाणात शस्त्रास्त्रs निर्यात करतो. ही सारी स्थिती ध्यानात घेता आगामी काळात भारतास सुरक्षाविषयक नव्या चिंतांना सामोरे जावे लागेल. बदलत्या स्थितीचा लाभार्थी ठरलेल्या पाकिस्तानास अधिक अवसान प्राप्त होऊन त्याचे उपद्रवमूल्यही वाढलेले दिसेल. विशेष म्हणजे, बांगलादेशाचे भारतविरोधात जाणारे धोरण हे केवळ तेथील सरकारचे एकतर्फी धोरण आहे, असे मानण्यासही जागा नाही. बांगलादेशी जनतेचा एक मोठा भाग, ज्यामध्ये विद्यार्थी व तरुणांचा समावेश आहे. तो भारताला हसीनांचे समर्थक म्हणून पाहतो. या जनसमुहाच्या पाठिंब्यावर उभे असलेले नवे बांगलादेशी प्रशासन व सरकार भारतविरोधात संतुलन साधणारा घटक म्हणून पाकिस्तानकडे आकर्षिले गेले आहे. भारताने ज्याला सर्वोतपरी मदत केली तो बांगलादेशासारखा दीर्घकालीन मित्र पाकिस्तानसारख्या दीर्घकालीन शत्रुच्या कच्छपी लागावा याचे दु:ख भारतास निश्चित असेल. तथापि, आंतरराष्ट्रीय राजकारण भावनेच्या आधारावर न चालता वस्तुस्थितीच्या आधारावर चालते. याचे भान ठेऊन प्राप्त स्थिती संदर्भात सावध धोरणात्मक पाऊले भारताने उचलणे अपेक्षित आहे.
- अनिल आजगांवकर