महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशाच्या विकासात तांत्रिक शिक्षणाचे योगदान महत्त्वाचे

12:00 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हीटीयू दीक्षांत समारंभात राज्यपाल गेहलोत यांचे प्रतिपादन : राष्ट्राच्या उभारणीत तरुणांचा सहभाग मोलाचा

Advertisement

बेळगाव : भारताने जगामध्ये आर्थिक विकासाबरोबरच वैज्ञानिक संशोधन, तांत्रिक नवकल्पना, औद्योगिक वाढ आणि शैक्षणिक सुधारणांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या वाटचालीमध्ये तरुणांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांना केले.

Advertisement

येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या 24 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशाला जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी तरुणांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या योगदानात तरुणांनी सक्रिय सहभाग घेऊन देशाच्या परिवर्तनामध्ये सक्रिय होणे आवश्यक आहे. भारताने आर्थिक विकासामध्ये मोठी प्रगती साधली आहे. देशाच्या आर्थिक विकासाचे कौतुक करताना ते म्हणाले, जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ही परिस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी जागतिक स्तरावर भारताला आघाडीच्या विकसित राष्ट्रांमध्ये स्थान देण्यासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशाच्या आर्थिक विकासात तांत्रिक शैक्षणिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

अवकाश संशोधन, तंत्रज्ञानात भारताने यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. चांद्रयान, मंगळयान या यशस्वी मोहिमा राबवून जगाचे लक्ष वेधले आहे. मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी ही प्रगती महत्त्वाची आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात संशोधन, तंत्रज्ञान अन् विज्ञानाची अत्यंत आवश्यकता असून आपल्या तरुणांमध्ये ती क्षमता आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे ‘उठा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका’ या त्यांच्या प्रेरणेनुसार तरुणांनी वाटचाल केली पाहिजे, असे राज्यपाल गेहलोत यांनी सांगितले.

प्राचीन काळामध्ये भारताला विश्वगुरु म्हणून ओळखले जात होते. नालंदा, तक्षशीला आणि विक्रमशीला या प्राचीन शिक्षण विद्यापीठांचा वारसा लक्षात घेऊन पर्यावरणाबरोबरच देशासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धनाला चालना देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीने ‘वसुधैव कुटुम्बकम’चा पुरस्कार केला आहे. जागतिक शांततेसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. समानता आणि सौहार्दपूर्ण वातावरणाला प्रोत्साहन देण्यात आले, असे सांगत राज्यपालांनी देशाच्या आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक विकासावर भर दिला. यावेळी व्यासपीठावर उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे डायरेक्टर प्रा. गोविंदन रंगराजन, कुलगुरु एस. विद्याशंकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article