सलगच्या घसरणीला अखेर पूर्णविराम!
सेन्सेक्स 740 तर निफ्टी 255 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
आशियाई बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार सकारात्मक पातळीवर सुरु झाले. मागील जवळपास 10 दिवसांच्या सलगच्या घसरणीला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये आयटीच्या समभागातील तेजीमुळे बाजाराला बळ मिळाले आहे. यासोबतच जागतिक पाळीवरील घटनांमध्ये अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी कॅनडा आणि मेक्सिको टेरिफवर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स बुधवारी किरकोळ वाढून 73,005.37 वर खुला झाला आहे. दरम्यान दिवसअखेर सेन्सेक्स 740.30 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 73,730.23 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 254.65 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 22,337.30 वर बंद झाला आहे. बुधवारी व्यापक बाजारांमध्येही वाढ दिसून आली. निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 2.96 टक्क्यांनी वाढून बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक देखील 2.42 टक्क्यांनी वाढून सकारात्मक क्षेत्रात बंद झाला.
बाजार तेजीत का आला?
कमी पातळीवर खरेदीदार असल्याने बाजार तेजीसह बंद झाला. आशियाई बाजारातील तेजीचा देशांतर्गत बाजारांवर सकारात्मक परिणाम झाला. याशिवाय, निर्देशांकात मोठे वजन असलेल्या आयटी समभागांमधील तेजीनेही बाजाराला बळ मिळाले आहे. भारतीय बाजारपेठेतील सुधारणा अनेक दिवसांच्या घसरणीनंतर नैसर्गिक पुनर्प्राप्तीमुळे होऊ शकते, असे विश्लेषकांनी सांगितले.
निफ्टीमधील 50 पैकी 46 समभाग वधारून बंद झाले. अदानी पोर्ट्स टॉप वर राहिले आहेत. त्यात 5 टक्के वाढ झाली. टाटा स्टील, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन 5.15 टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये मात्र बजाज फायनान्स, इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि श्रीराम फायनान्स 3.37 टक्क्यांपर्यंत घसरले.
अमेरिकेतील बाजार घसरणीत
अमेरिकेतील सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांवर कर लादण्याच्या डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयावर कंपन्या आणि गुंतवणूकदारांच्या प्रतिक्रियेमुळे वॉल स्ट्रीटवरील शेअर्स पुन्हा घसरत आहेत. अमेरिका, चीन, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यातील वाढत्या व्यापार युद्धामुळे अमेरिकन शेअर्समधील अलिकडच्या घसरणीत आणखी भर पडली आहे.