For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम कामगारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

11:05 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम कामगारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Advertisement

दहा दिवसांच्या आत कामगारांचे अर्ज निकालात काढा : कामगार उपायुक्तांचा आदेश

Advertisement

बेळगाव : बांधकाम कामगार संघटनेची आणि कामगारांची मजगाव येथील कामगार कार्यालयामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये कामगारांना येणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचण्यात आला. बांधकाम कामगार तसेच त्यांच्या मुलांना लग्नासाठी देण्यात येणारी रक्कम वेळेत दिली जात नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर योजना लागू करताना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. तो थांबवावा, अशी जोरदार मागणी यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कामगारांनी केली. लोकसभा निवडणूक असल्याने आंदोलन करता येत नाही. त्यामुळे कामगार अधिकाऱ्यांशी बैठकच घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सायंकाळी 5 वाजता बांधकाम कामगार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. आमच्याकडून घेण्यात आलेल्या करातूनच आम्हाला योजना लागू आहेत. आम्ही इतरांच्या किंवा सरकारच्या पैशातून आम्हाला योजना लागू करा, असे म्हणत नाही. तर आमचाच पैसा आमच्यासाठी खर्च करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून विवाहनिधी देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. लग्न होऊन वर्ष उलटले तरी आम्हाला निधी दिला जात नाही. नको त्या अटी लादण्यात येत आहेत. त्या तातडीने शिथिल कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बांधकाम संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर यांनी कामगारांच्या अडचणी मांडल्या. आम्हाला केवळ कामगारांसाठी असलेल्या योजना वेळेत द्याव्यात. ओळखपत्राचे नूतनीकरण वेळेत करून द्यावे. याचबरोबर कामगारांना घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये दिले जातात. मात्र आतापर्यंत एकाही कामगाराला ही रक्कम देण्यात आली नाही. तेव्हा ती रक्कमही तातडीने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीनंतर कामगार उपायुक्त डी. जी. नागेश यांनी तातडीने दखल घेतली. ज्या कामगारांनी विवाहनिधी, आरोग्य, अपघातानंतर देण्यात येणारी रक्कम,  पेन्शन व शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत, त्या सर्व कामगारांना दहा दिवसांच्या आत रक्कम द्यावी, अशी सक्त सूचना उपायुक्त डी. जी. नागेश यांनी केली आहे. जिल्हा कामगार अधिकारी मल्लिकार्जुन जोगूर यावेळी उपस्थित होते. यावेळी राहुल पाटील, अजित मजुकर, प्रशांत हेरेकर, यल्लाप्पा मरगाण्णाचे, रमेश काकतीकर, सुरेश मायण्णाचे यांच्यासह इतर कामगार उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.