For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संविधान हेच रक्षाकवच!

11:41 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
संविधान हेच रक्षाकवच
Advertisement

खासदार प्रियांका गांधी यांचे प्रतिपादन : ‘जय बापू, जय भीम,जय संविधान’ मेळावा : काँग्रेस शताब्दी अधिवेशनानिमित्त आयोजन

Advertisement

बेळगाव : भाजप सत्तेसाठी, राजकारणासाठी संविधान बदलण्याचा आणि संपविण्याचा प्रयत्न करत आहे. संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तुमचा होणारा अवमान सहन करू नका, जीव देईन पण संविधान बदलू देणार नाही, आम्ही देश व संविधानासाठी जीव समर्पित करण्यास तयार आहोत. संविधान न्यायाचा अधिकार देते. संविधान हेच आपल्या सर्वांचे रक्षाकवच असून त्यापेक्षा मोठे काही नाही. त्यामुळे सर्वांनी हक्कासाठी, समतेसाठी केंद्र सरकारविरोधात लढले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रधान कार्यदर्शी खासदार प्रियांका गांधी यांनी केले.

Advertisement

बेळगावात 1924 ला महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त मंगळवारी काँग्रेस आणि राज्य सरकारच्यावतीने सीपीएड मैदानावर आयोजित केलेल्या ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळाव्यात खासदार प्रियांका गांधी बोलत होत्या. सुरुवातीला प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राज्याचे प्रभारी कार्यदर्शी रणदीपसिंग सूरजेवाला यांनी केले. त्यानंतर केपीसीसी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार प्रियांका गांधी यांचे खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते शाल देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी, एआयसीसी कार्यदर्शी के. सी. वेणुगोपाल, प्रभारी कार्यदर्शी रणदीपसिंग सूरजेवाला, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व मान्यवरांच्या हस्ते चरखा फिरवून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा संविधान विरोधी

स्वातंत्र्य मिळाल्याने डॉ. आंबेडकरांचे पवित्र संविधान देशाला मिळाले.  समाजाला न्याय, लोकशाहीची सुरक्षा, न्याय मागण्याचा अधिकार, समानतेचा अधिकार देते. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अवमान केला आहे. असे गृहमंत्री आम्ही कधी पाहिले नाहीत. भाजप आणि आरएसएसकडून संविधानाचा अधिकार कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे, त्यांचा अवमान केला जात आहे. संविधानाच्या माध्यमातून महिलांनाही समानतेचा अधिकार देण्याचे डॉ. बाबासाहेबांनी प्रयत्न केले. त्यावेळी भाजपने त्यांचे पुतळे जाळले. याच विचारातून जन्मलेल्या भाजपकडून सतत समाजात दुरावा निर्माण केला जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संविधानात बदल करतो, असे सांगितल्यानंतर जनतेने भाजपला धडा शिकविला. भाजपला देश आणि संविधान नको असून केवळ सत्ता हवी आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा हे संविधान विरोधी आहेत. भारताच्या विविधतेवर, तत्त्वांवर हल्ला केला जात आहे, ते थांबले पाहिजे, असे खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या.

सरकारचे काम केवळ मोठ्या उद्योगपतींसाठी 

आरक्षणाला, न्याय व्यवस्थेला, माहिती अधिकार हक्क कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतकेच नव्हे तर सेबीचा कायदा, लोकपाल कमजोर केला. निवडणूक आयोगाला कमजोर करण्यात आले आहे. देशात ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्याठिकाणी महिलांवर हल्ला करणाऱ्यांचे रक्षण केले जात आहे. शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या 700 शेतकऱ्यांचे बळी गेले. मात्र निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजप सरकार कायदा मागे घेण्यासाठी पुढे आले. केंद्र सरकारचे सर्व कार्य संविधानविरोधी असल्याने त्याविरोधात लढा दिला जात आहे. अदानींकडे देशाची सर्व संपत्ती सोपविण्यात आली आहे. अमेरिकेत अदानींवर गुन्हा दाखल आहे, त्याची चौकशी करा, अशी विचारणा केल्यानंतर लोकसभेत आमचे तोंड बंद केले जात आहे. देशातील शेतकरी संकटात असून आत्महत्या करत आहेत. महागाई वाढत चालली आहे, भांडवलदारांचे कर्ज सरकारकडून माफ केले जात आहे. सर्वसामान्य जनतेकडून जीएसटी स्वरुपात टॅक्स घेणारे सरकार अदानी व अंबानी यांचे टॅक्स वाढवत आहे का? असा प्रश्न केला. सरकार केवळ मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत आहे, अशी टीका खासदार प्रियांका गांधी यांनी केली.

संविधान म्हणजे आमचा विचार 

एकंदरीत संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू असून जनतेने त्याचा विचार केला पाहिजे. संविधान तुमचे असून त्यापेक्षा मोठे काही नाही. सत्तेसाठी, राजकारणासाठी संविधान संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस नेत्यांनी देश व संविधानासाठी सर्वकाही समर्पित करण्याचा निश्चय केला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सत्यासाठी लढत आहेत. मात्र त्यांच्यावर खोटे-नाटे गुन्हे दाखल केले जात असून तशा गुन्ह्यांना राहुल गांधी घाबरणारे नाहीत. संविधान म्हणजे आमचा विचार आहे. देशासाठी जीवाची आहुती देणारी आपली परंपरा असून कारागृहात बसून पत्र लिहिण्याची आपली परंपरा नाही. त्यामुळे आपल्या हक्कासाठी, समानतेसाठी सरकारविरोधात लढा, असे आवाहन खासदार प्रियांका गांधी यांनी यावेळी केले.

गांधी कुटुंबीयांचा त्याग 

एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, देशासाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी त्याग केला आहे. गोरगरीब जनतेसाठी काँग्रेस सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या. मात्र, आमच्यावर टीका करणाऱ्या एनडीए सरकारने काय दिले, आमच्यावर टीका करून अप्प्रचार करून ते सत्तेवर आले आहेत. काँग्रेस हे गरिबांचे सरकार आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. पण माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला सोनिया गांधी यांनी काँग्रेस एआयसीसीचा अध्यक्ष बनविला आहे. भाजप आणि आरएसएसवाले दलित व हिंदू विरोधी आहेत. आजच्या कार्यक्रमातून काँग्रेस कर्नाटकात बळकट आहे हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कधीही गांधीजींबद्दल प्रेम दाखविले नाही. त्यांच्याकडून नथुराम गोडसे यांची पूजा केली जाते. समाजामध्ये विविध गैरसमज पसरवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही आग असून आमच्या नादी लागू नका, अन्यथा तुम्ही जळून खाक व्हाल, असा इशारा खर्गे यांनी भाजपला दिला. भाजपच्या कार्यालयावर कधीही तिरंगा ध्वज फडकवला नाही. त्यामुळे लाज वाटली पाहिजे. संविधान जाळणारे आता संविधान वाचवा म्हणून बोंब मारत आहेत. 17 डिसेंबर 2024 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. आंबेडकरांव्यतिरिक्त देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग प्राप्त झाले असते, असे वाद्ग्रस्त विधान केले आहे. याविरोधात आपण लढा देत असून कर्नाटकातील सर्व जिल्ह्यात आंदोलन केले जाईल. पंतप्रधान मोदींनीही गांधीजींबद्दल वाद्गस्त वक्तव्य केले आहे. इतिहास माहीत नसलेल्यांना जनतेने धडा शिकवावा. भाजपवाले देशासाठी नाही तर खुर्चीसाठी लढत आहेत. लोकशाही धोक्यात आहे. देशातील सर्व मशिदींखाली मंदिर शोधले जात आहे, अशी टीका केली.

हा कार्यक्रम देश, संविधानाच्या रक्षणासाठी  

स्वागत भाषणात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, गांधीजींच्या तत्त्वांची व आदर्शांची माहिती पुढील पिढीला समजण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा केवळ पक्ष आणि सरकारचा कार्यक्रम नसून देश, संविधानाच्या रक्षणासाठी आहे. म. गांधी हे देशाची आत्मा आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. मात्र ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत. पण त्यांनी आपला संदेश पाठविला आहे. संविधान आमचा धर्म असून काँग्रेसच्यावतीने यावर्षी देशभरात जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी केली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री एच. के. पाटील, मंत्री आर. व्ही. देशपांडे, खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार राजू सेठ, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह काँग्रेसप्रणित राज्यातील मंत्री, तसेच काँग्रेसचे राज्यातील खासदार, आमदार उपस्थित होते. मेळाव्याला राज्यातील विविध भागातून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा गांधीजींच्या स्मृती पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बेळगाव पवित्रभूमी

यावेळी खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, बेळगाव येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याने देशातील ही पवित्रभूमी आहे. या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध येथे अनावरण करण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर अक्कमहादेवी आणि बसवाण्णा यांचे चित्र आहे. त्या माध्यमातून कर्नाटकातील एकात्मतेचे दर्शन घडते. समानता दिसून येते. सत्य तत्त्वावर म. गांधीजींनी सत्याग्रह केला. अहिंसा आणि सत्य या दोन तत्त्वांवर देशाचा स्वातंत्र्यलढा लढला गेला. देशातील हा एकमेव लढा आहे. जो अहिंसेच्या माध्यमातून तडीस गेला आहे.

Advertisement
Tags :

.