For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रघुवंशी हत्येचे कारस्थान पत्नीचेच !

06:14 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
रघुवंशी हत्येचे कारस्थान पत्नीचेच
Advertisement

पोलिसांच्या तपासात प्रकरणाला वेगळीच कलाटणी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मध्यप्रदेशातील राजा रघुवंशी याच्या मेघालयमध्ये झालेल्या हत्येच्या कारस्थानाची सूत्रधार प्रत्यक्ष त्याची पत्नीच असल्याचे पोलीस तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच या कारस्थानात तिचा प्रियकरही समाविष्ट होता. चार मारेकऱ्यांच्या माध्यमातून ही हत्या करण्यात आली, अशी माहिती उघड झाल्याने या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पत्नी सोनम आणि मारेकरी आनंद यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

हे प्रकरण ‘मेघालय मधुचंद्र हत्या प्रकरण’ म्हणून ओळखले जात आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथील निवासी राजा रघुवंशी त्याच्या विवाहानंतर त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासह मेघालय येथे मधुचंद्रासाठी गेला होता. जाताना पत्नीच्या आग्रहावरुन त्याने 10 लाख रुपयांचे दागिनेही समवेत नेले होते. तथापि, त्याची पत्नी सोनम हिचे विवाहापूर्वीपासूनच राज कुशवाह नामक युवकावर प्रेम होते. तिने आणि तिच्या प्रियकराने राजा रघुवंशी याची हत्या करण्याचे कारस्थान केले होते.   विवाहानंतर मधुचंद्रासाठी तिनेच मेघालयची निवड करुन तिकिटेही बुक केली होती. राजा रघुवंशीच्या कुटुंबियांचा मेघालयला जाण्यास विरोध होता, अशा अनेक बाबीं आता पोलिस तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरीत सापडला मृतदेह

मेघालयमधील एका खोल दरीत राजा रघुवंशी याचा मृतदेह मेघालय पोलिसांना आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यास प्रारंभ झाला. राज कुशवाह हा या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचे नंतर उघड झाले. त्याचप्रमाणे विकी ठाकूर, आकाश आणि आनंद या संशयितांची नावे समोर आली आहेत.

सोनम, आनंदला अटक

राजा रघुवंशी याची पत्नी सोनम आणि एक संशयित मारेकरी आनंद यांना आता अटक करण्यात आली आहे. यो दोघांनीही गुन्हा केल्याचे मान्य केले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर तिचाच कर्मचारी होता, अशीही माहिती समोर आली आहे. हत्या का करण्यात आली, कोणी केली, हत्याचे कारस्थान कोठे आणि कसे रचण्यात आले, इत्यादी माहिती मिळविण्यासाठी पोलीस अटक केलेल्यांची कसून तपासणी करीत आहेत, असे स्पष्ट केले गेले.

मेघालय पोलिसांचे यश

मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाल्यापासून केवळ चार दिवसांमध्ये या जटील प्रकरणाचा छडा लावला आहे. यासाठी मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी यांनीही या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल असे प्रतिपादन केले होते.

सोनमला गाझीपूरहून अटक

या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्नी सोनम हिला उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमधून अटक सोमवारी अटक करण्यात आली आहे. सोनम ही एका ढाब्यावर आली आहे, अशी माहिती गुप्तचरांकडून मिळताच त्वरित धाड टाकून तिला अटक करण्यात आली, अशी माहिती गाझीपूर पोलिसांकडून देण्यात आली.

धागेदोरे अनेक राज्यांमध्ये

सर्वत्र चर्चेचा विषय झालेल्या या भीषण हत्या प्रकरणाचे धागेदोरे केवळ मेघालयपुरते मर्यादित नाहीत. या प्रकरणाची पाळेमुळे अनेक राज्यांमध्ये पसरली असल्याची शक्यता मेघालय पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांची अनेक पथके विविध स्थानी पाठविण्यात आली आहेत. विविध राज्यांमध्ये धाडी घालण्यात येत आहेत. या प्रकरणाच्या कारस्थानात किमात पाच ते सहा जणांचा सहभाग असावा, असा पोलिसांनी संशय असून लवकरच हे गूढ उकलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तपास कार्य वेगाने होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.