संत मंडळी दयेचे सागर असतात
अध्याय पाचवा
बाप्पा म्हणाले, साधुसंत हे जरी आपल्याला देहाने इथे वावरत असलेले दिसले, तरी त्यांची जागा ईश्वराच्या शेजारी असते. जास्तीतजास्त माणसांना ईश्वराचे महत्त्व पटवून देऊन त्यांना त्यांची भक्ती करायला लावणे हेच त्यांच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट असते. ते पूर्ण झाले की, ते परत ईश्वराच्या सान्निध्यात राहण्यासाठी निघून जातात. ह्या सगळ्या कालखंडात ते ईश्वराच्या मूळ स्वरूपाला कधीही विसरत नसल्याने मी कर्ता आहे हा विचार त्यांना कधीही शिवत नाही. तसेच सर्वांच्यात ईश्वराचा वास आहे ह्याची त्यांना सदैव जाणीव असते. हे सर्व कशामुळे घडते ते आता जाणून घेऊयात
बाप्पा म्हणाले, सुख, दु:ख, द्वेष, क्षुधा, तोष, तृषा यांचे ठिकाणी जो समान असतो, तो प्राणिमात्राला व सर्वव्यापी मला खऱ्या अर्थाने जाणतो. ह्या अर्थाचा सुखे सुखेतरे द्वेषे क्षुधि तोषे समस्तृषि । आत्मसाम्येन भूतानि सर्वगं मां च वेत्ति यऽ ।। 17 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.
प्रत्येक प्राणीमात्रात राग, द्वेष, सुख दु:ख हे विकार असतात. तसेच ते संतांच्याकडेही असतात पण त्याचबरोबर त्यांच्याकडे दया, क्षमा, शांती ह्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते सामान्य मनुष्याप्रमाणे दु:खाच्या प्रसंगी कोलमडून जात नाहीत किंवा सुखाच्या प्रसंगी हुरळून जात नाहीत. दोन्ही प्रसंगात ते स्थिर असतात.
त्यांना विकार बाधत नाहीत कारण ते हे जाणून असतात की, समोर दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती व परिस्थिती ह्या गोष्टी मिथ्या आहेत. त्यामुळे कुणी अपमान केला किंवा कुणी कौतुकाचा वर्षाव केला तरी ते सर्व तात्पुरते आहे ह्याची त्यांना खात्री असल्याने कुणाबद्दल प्रेम वाटणे किंवा कुणाचा राग येणे ह्या गोष्टी त्यांच्या बाबतीत संभवतच नाहीत. तसेच ते हेही जाणून असतात की, समोर दिसणाऱ्या व्यक्तींची बाह्य रूपे जरी वेगवेगळी असली तरी अंतरी असलेला ईश्वर एकच आहे आणि केवळ तोच सत्य आहे, त्यामुळे कुणी त्रास दिला, नावे ठेवली तरी त्यांच्याकडे दया, क्षमा, शांतीचा विपुल साठा असल्याने ते झालेला त्रास, कुणी केलेला अपमान मनावर न घेता त्याच्यातील ईश्वराचे दर्शन घेत असतात. एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म म्हणतात. एकदा त्यांच्या अंगावर एकशेआठ वेळा थुंकलेल्या माणसाचा राग राग न करता ते शांतपणाने एकशेआठ वेळा गोदावरी नदीत अंघोळ करतात आणि त्याला म्हणतात तुझ्यामुळे मला एकशेआठ वेळा गंगास्नान झाले. त्यांच्याकडे असलेल्या दया, क्षमा, शांतीचा ह्या प्रसंगात प्रत्यय येतो. नामदेव महाराज नैवेद्य दाखवत असताना त्या ताटातील पोळीचा तुकडा एक कुत्रे पळवून नेते. इतर कुणी असतं तर त्याने त्या कुत्र्याला काठीने बडवले असते पण नामदेव महाराजांना त्याच्यातील ईश्वर दिसल्यामुळे ते त्याच्या पाठीमागे पळू लागले आणि पळता पळता म्हणाले, अरे नुसती पोळी खाऊ नको त्यावर तूप वाढतो मग खा. असे आपली संत मंडळी दयेचे सागर असतात. त्यांना सर्व प्राणीमात्रात वसलेला ईश्वर स्पष्ट दिसत असतो व त्यांना स्वत:तील ईश्वराची उपस्थितीही जाणवत असते. त्यामुळे ईश्वर ज्याप्रमाणे आपल्या सर्वांची काळजी घेतो त्याप्रमाणे ते आपणा सर्वांची काळजी घेत असतात. सर्वांशी ते समबुद्धीने वागत असल्याने ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते, ते निरपेक्षतेने करतात कारण त्यांच्या मनात अमुक एक आपला तमुक एक परका असा विचार कधीच येत नसतो. सामान्य माणूस समोर आलेल्या माणसाचा आपल्याला ह्याचा किती उपयोग आहे ह्यावर विचार करून त्याच्याशी कसे वागायचे हे ठरवत असतो पण सर्वत्र ईश्वर पाहणाऱ्या संतांचे वर्तन मात्र सदासर्वदा सर्वांचे समाधान करणारेच असते आणि म्हणूनच ते ईश्वरालाही वंद्य होतात.
क्रमश: