For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रवादीतील संघर्ष आणि शरद पवारांचे असेसमेंट!

06:22 AM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रवादीतील संघर्ष आणि शरद पवारांचे असेसमेंट
Advertisement

गेल्या महिन्यात चार एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्र वार्तापत्र’मध्ये अजित पवार राष्ट्रवादीने अर्थात सुनेत्रा पवार आणि त्यांच्या परिवाराने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याची तयारी चालवली आहे असे स्पष्ट मत मांडण्यात आले होते. निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार यांच्या पत्राला मान्यता दिल्याने आणि राष्ट्रीय कार्यकारणीत किंवा कोणत्याही पदावर दोघांचीही नेमणूक केली नाही यावरून त्या मताला पुष्टी मिळाली.

Advertisement

आता अचानक शरद पवारांच्या प्रकृतीची आठवण झाल्याने तटकरे पवारांना भेटले. मात्र पत्रकार परिषदेत पवारांनी आपण दोघांना किती महत्त्वाची पदे दिली होती (तरीही त्यांनी गद्दारी केली) आता त्यांचे पक्ष वेगळे आहेत आणि नेत्यांचे असेसमेंट जसे असेल तशी त्यांना जबाबदारी मिळते असे सांगून अलिप्तपणा दाखवला आहे. प्रत्यक्षात पवार आपला राष्ट्रवादी पक्ष बळकट करायच्या नादाला लागले आहेत! राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला असून, निवडणूक आयोगाने पक्ष संघटनात्मक नियुक्त्यांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत मोजक्या पण धारदार शब्दांत अजित पवार पक्षाला राजकीय संदेश दिल्याचे स्पष्ट दिसून आले. विशेषत: तटकरे आणि पटेल यांच्या नियुक्त्यांबाबत प्रश्न विचारला असता, “ते आता वेगळ्या पक्षात आहेत. त्यांच्या पक्षाने कोणाला काय जबाबदारी द्यावी हा त्यांचा विषय आहे,’ असे सांगत पवारांनी थेट संघर्ष टाळला; मात्र त्याचवेळी ‘हे दोघे आमच्या पक्षात असताना त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या,’ असे सांगून त्यांनी त्यांची राजकीय उंची स्वत:च्या नेतृत्वातूनच निर्माण झाल्याची अप्रत्यक्ष आठवण करून दिली. याच पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांच्याबाबत आलेल्या प्रश्नांवर पवारांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. त्यांनी कोणतीही वैयक्तिक टीका टाळली; मात्र बारामतीतील राजकारण आणि संघटनात्मक निष्ठा यांचा उल्लेख करताना त्यांनी ‘जनता कोणाला स्वीकारते हे शेवटी कामावर ठरते,’ असा उल्लेख केला. राजकीय वर्तुळात हा अप्रत्यक्ष टोला मानला गेला. विशेष म्हणजे, पार्थ पवार, जय पवार आणि रोहित पवार या नव्या पिढीच्या नेतृत्वाचा उल्लेख पत्रकार परिषदेनंतरच्या चर्चांमध्ये अधिक ठळकपणे पुढे आला. अजित पवार पक्षातील काही नेत्यांच्या वाढत्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार नव्या पिढीचे संतुलन साधत पक्ष पुन्हा उभारण्याच्या प्रयत्नात आहेत का, अशी चर्चा आता रंगली आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत “काही आमदारांना घेऊन तटकरे आणि पटेल भाजपमध्ये जाऊ शकतात शिंदे सेनेतही असे होऊ शकते” असा सूचक आरोप केला होता. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत अविश्वासाचे वातावरण असल्याचे संकेत मिळाले. मात्र, या आरोपांवर ना प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट भूमिका मांडली ना सुनील तटकरे यांनी थेट उत्तर दिले. त्यांनी केवळ “आम्ही पक्षाशी बांधील आहोत,” अशा सर्वसाधारण प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न पूर्णपणे खोडून काढले गेलेले नाहीत. राष्ट्रवादीतून बाहेर पडणारी मंडळी भाजप किंवा शिंदे सेनेत जाऊ नयेत यासाठीचे हे वक्तव्य असावे का असाही प्रश्न आहेच. ठाण्यातील परांजपे यांनी अजित पवार पक्ष सोडून सुरुवात केली आहे. रोहित पवार आक्रमक दिसले मात्र शरद पवार यांनी कुठेही उघड आक्रमकता दाखवली नाही; पण प्रत्येक उत्तरातून अजित पवार गटातील अंतर्गत विसंवाद, नेतृत्वातील स्पर्धा आणि पुढील पिढीतील बदलाचे संकेत अधोरेखित केले. विशेषत: निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर तटकरे पटेल यांच्या भूमिकेभोवती निर्माण झालेला संभ्रम अधिक गडद करण्याचे काम त्यांच्या वक्तव्यांनी केले.

Advertisement

सर्वपक्षीय बैठकीची मागणी आणि ताळमेळ

याच पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी खर्चातील काटकसरीबाबत केलेल्या घोषणेबाबतही पवारांनी भूमिका मांडली. “खर्चावर नियंत्रण असावे, ही भूमिका चुकीची नाही,” असे सांगत त्यांनी मोदींच्या वक्तव्याशी काही प्रमाणात सुसंगत भूमिका घेतली. मात्र, त्याचवेळी “अशा निर्णयांवर सर्वपक्षीय चर्चा व्हायला हवी. राज्यांवर आणि सर्वसामान्यांवर त्याचा काय परिणाम होईल, हे समजून घेणे आवश्यक आहे” असे सांगत त्यांनी सर्वपक्षीय बैठकीची मागणी कायम ठेवली. म्हणजेच, मोदींच्या भूमिकेला पूर्ण विरोध न करता प्रक्रियात्मक लोकशाहीवर त्यांनी भर दिला. अशा प्रकारची बैठक ही विरोधकांच्या पेक्षा सत्ताधाऱ्यांची गरज बनली आहे. तेव्हा पवारांनी असे वक्तव्य करतानाच आणखी एक गुगली टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींबाबत “रिजेक्टेड नेता” असा केलेला उल्लेखही पत्रकार परिषदेत चर्चेत आला. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “लोकशाहीत मतभेद असू शकतात; पण व्यक्तीचा अवमान करून राजकारणाची पातळी खालावू नये.” त्यांनी थेट फडणवीसांवर टीका करताना “राजकीय संस्कृती जपली गेली पाहिजे,” असे स्पष्ट केले. तसेच, काटकसरीच्या संदेशासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुचाकीवरून मंत्रालयात जाणे, तर माजी विरोधी पक्षनेते दानवे आणि मंत्री राणे यांनी पायी मंत्रालयात जाण्याचे केलेले प्रयत्न यावर बोलताना पवार म्हणाले, “दिखावा करून उपयोग नाही. सातत्याने वर्तनात बदल दिसला पाहिजे.” हा टोला केवळ प्रतीकात्मक कृतींवर नव्हे, तर प्रतिमानिर्मितीच्या राजकारणावर असल्याचे मानले जाते. एकूणच, अजित पवारांच्या बंडानंतर काही काळ शांत दिसणारे शरद पवार आता पुन्हा सक्रिय राजकीय पुनर्बांधणीच्या मोडमध्ये आल्याचे या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. त्यांनी कुणालाही थेट माफ केलेले नाही, पण कोणाशीही उघड युद्धही पुकारलेले नाही. मात्र, नव्या नेतृत्वाच्या रूपाने रोहित पवार, पार्थ पवार आणि जय पवार या चेहऱ्यांना पुढे आणत संघटना नव्याने उभी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे संकेत यातून मिळत आहेत. त्याचवेळी तटकरे आणि पटेल यांना “तुमची राजकीय उंची कुठून आली” याची आठवण करून देत त्यांनी इकडे तिकडे आसरा शोधणाऱ्या अजित पवार गटाला, दादांसारखा नेता गमावल्यानंतर पक्ष सावरणे ऐवजी तो दुसऱ्यांच्या दावणीला बांधणारे नेते स्वत:चे भवितव्य ठरवू शकत नाहीत ते दुसऱ्यांची जबाबदारी काय घेणार? असे अप्रत्यक्षपणे दाखवून देत, सगळे दोष पाठीशी घालायला लावणारा नेता आता त्या पक्षात नाही असा स्पष्ट राजकीय इशारा दिल्याचे मानले जात आहे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.