दोन हुकुमशहांमधील संघर्ष जगास संकटात लोटणारा
गाझा पट्टीतील संघर्ष पुरता शमला नसताना इस्त्रायल व इराणमध्ये तुंबळ संघर्षास तोंड फुटले आहे. 13 जूनला इस्त्रायलने रायझिंग लायन मोहीम सुरू केली आणि इराणने त्याला प्रत्युत्तर दिले. या लष्करी संघर्षात दोन्ही बाजूंची लष्करी, नागरी साधन संपत्ती नष्ट झाली आहे. जीवीतहानीची संख्या वाढते आहे. इस्त्रायली मोहीमेत इराणचे लष्करी उच्चपदस्थ व अणू शास्त्रज्ञ मारले गेले. 2023 च्या हमास हल्यापासून इस्त्रायल-इराण तणाव वाढत चालला होता. त्याचे पर्यवसान आता मोठ्या संघर्षात झाल्याचे दिसते.
मध्यपूर्व पुन्हा एकदा संहारक युद्धाच्या खाईत लोटली जाण्याचा धोका यामुळे निर्माण झाला आहे. आपल्या मोहिमेच्या समर्थनार्थ नेतान्याहू या इस्त्रायली पंतप्रधनांनी, आपली मोहिम इराणचा अणू कार्यक्रम उध्वस्त करण्यासाठी आहे. या कार्यक्रमामुळे इस्त्रायलच्या अस्तित्वावरच संकट उभे असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूने इराण त्याचा अणू कार्यक्रम नागरी हेतूंसाठी आहे व देशांतर्गत युरेनियम समृद्धीचा सार्वभौम अधिकार देशास असल्याची भूमिका मांडत आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिका व इराणमध्ये अणू करारावर खंडीत झालेल्या वाटाघाटी ट्रम्प यांनी पुन्हा सुरू केल्या असतानाच हा हल्ला झाला आहे. यामुळे अनुकूल वाटाघाटींसाठी इराणवर दबाव आणण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या छुप्या पाठिंब्यातून हा हल्ला झाला असावा किंवा वाटाघाटीतून इराणला दिलासा मिळेल असा करार होऊ नये म्हणून नेतान्याहूनी हल्ला घडवून करारात खोडा घातला असावा अशा तर्कास निश्चित वाव मिळतो.
उल्लेखनीय बाब ही देखील आहे की, इस्त्रायलविरोधी संघर्षात इराण ज्या साथीदारांवर अवलंबून होता ते निष्प्रभ झाल्याची नेमकी वेळ इस्त्रायलने साधली आहे. सीरियातील असाद राजवटीचे पतन झाले आहे. हमासची अपरीमित हानी करून तिचे नेतृत्व इस्त्रायलने संपवले आहे. इराण पुरस्कृत हिजबुल्लाह दहशतवादी संघटना इस्त्रायलने दुबळी व नेतृत्वहीन केली आहे. हौथी बंडखोर अमेरिकेशी समन्वय साधून शांत झाले आहेत. इराणी हवाई दलही 2024 मधील इराणी हल्यांना उत्तर देताना इस्त्रायलने केलेल्या कारवाईमुळे कमकुवत बनले आहे. अशा प्रतिकुल स्थितीतील इराणवर आक्रमण करण्यास इस्त्रायलला योग्य संधीची प्रतीक्षा होती. ती संधी आंतरराष्ट्रीय अणूउर्जा संस्थेने आणून दिली. इस्त्रायली हल्याच्या दोन दिवस आधी संस्थेच्या निरीक्षकांना इराणने दोन दशकात प्रथमच युरेनियम संपन्नतेबाबतच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे आढळले. यानंतर कावळा बसायला अन् फांदी तुटायला एकच गाठ पडली. इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरू केले.
गेल्या रविवारी ओमानमध्ये अमेरिका-इराण अणू करार विषयक बैठकीची सहावी फेरी होऊ घातली होती. इस्त्रायली हल्यामुळे ती रद्द झाली. या बैठकीनंतर मागील काळात बराक ओबामांनी केलेल्या इराण-अमेरिका अणू करारासारखा करार शक्य होता. ज्यामुळे कदाचित अमेरिकेस मान्य परंतु इस्त्रायलला अमान्य अशा प्रकारची युरेनियम संपन्नता इराणला साध्य झाली असती. ट्रम्प यांच्या यापूर्वीच्या कार्यकाळात नेतान्याहूनी, ओबामांनी इराणशी केलेल्या अणू करारात मोडता घालण्यास ट्रम्पना प्रवृत्त केले होते. ट्रम्प यांनाही त्यावेळी विरोधी डेमॉक्रॅटीक पक्षाचा वारसा मोडून काढण्यात विशेष स्वारस्य होते. परंतु आताच्या कार्यकाळात ‘ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या’ या उक्तीनुसार ट्रम्प यांना उपरती झाली व ते पुन्हा करारास सज्ज झाले. बैठकीच्या सहाव्या फेरीत हा करार निर्णायक टप्यावर पोहचण्याची शक्यता होती. त्या आधीच हल्ला करण्यामागे या वाटाघाटी उधळवून टाकण्याचा नेतान्याहू यांचा एक हेतू असावा.
वरकरणी इस्त्रायलने हा हल्ला इराणशी अणू करार विषयक वाटाघाटी करणाऱ्या अमेरिकेस न जुमानता केला असे भासत असले तरी, त्याने सुरू केलेल्या संघर्षाची व्याप्ती वाढता सहकार्यासाठी इस्त्रायलला अमेरिकेशिवाय अन्य ठोस पर्याय नाही हे ध्यानी घेणेही महत्त्वपूर्ण ठरते. यातून असा निष्कर्ष निघतो की, इराणला पूर्णत: नमवण्यासाठी आणि भविष्यात अनुकूल करार पदरी पाडून घेण्यासाठी इस्त्रायल-अमेरिका छुप्या संगनमताने ही कारवाई झाली असावी. इस्त्रायली हल्यानंतर ट्रम्पनी इराणला दिलेला इशारा या संदर्भात बरेच काही सांगून जातो. ट्रम्प म्हणाले, जर इराण पुन्हा चर्चेस आला नाही आणि त्याने करार केला नाही, तर पुढील इस्त्रायली हल्ला आणखी क्रूर असेल. या दरम्यान ट्रम्प असेही म्हणाले की, भारत-पाकिस्तान संघर्षात आपण ज्याप्रकारे मध्यस्थी केली. त्याप्रमाणे इस्त्रायल-इराण संघर्षातही करू शकतो. इस्त्रायल आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे अस्तित्व अमेरिकेच्या मदत व पाठिंब्यावर टिकून आहे. जगन्नियंत्याचा आव आणणारे ट्रम्प त्यांच्या अंतस्थ हेतूंसाठी दोन देशात संघर्ष घडवून आणतात आणि त्यानंतर मानभावीपणे मध्यस्थीचे सोंग घेतात. अमेरिका पुरस्कृत देशांच्या कारवायांमागे अमेरिकेचा अदृष्य हात कार्यरत असतो असे अनुमान यावरून निघते.
इस्त्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमावर हल्ला करून तो नामशेष करण्याचा हेतू उघड केला आहे. परंतु फोर्डो पर्वत समूहात खोदलेल्या पाच बोगद्यात इराणचा अणू कार्यक्रम कार्यरत आहे. ही अभेद्य रचना नष्ट करणे सहजसाध्य नाही. त्यामुळे या कार्यक्रमामागे असलेले नेतृत्वच नष्ट करण्याचा इस्त्रायलचा इरादा असू शकतो. ताज्या हल्यात वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. एका अणू शास्त्रज्ञासह इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे विशेष सल्लागार अली शामखानी यांना ठार केल्याचेही वृत्त आहे. गेले काही महिने अमेरिकेसह चाललेल्या अणू करार चर्चेत शामखानी एक प्रमुख व्यक्ती होते. अमेरिकेच्या मदतीने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनीची हत्या करण्याची इस्त्रायलची योजना असल्याची बातमी याच सुमारास आली. दोन्ही देशांच्या नेतृत्वाने तिचे खंडन केले असले तरी इस्त्रायलची कार्यप्रणाली पाहता ही शक्यता दुर्लक्षणीय नक्कीच नाही. नेतान्याहूनी इराणी लोकांना संबोधित करताना म्हटले की आमचे हल्ले तुम्हाला स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून देतील. एकीकडे प्रमुख नेत्यांच्या हत्या करायच्या व दुसरीकडे सतत हल्ले करून प्रस्थापित शक्तीविरूद्ध संताप निर्माण करण्याचे तंत्र इस्त्रायलने हमास व हिजबुल्लाह विरोधात गाझा पट्टीत परिणामकारकरित्या वापरले. तेच इराणमध्येही लागू होण्याची शक्यता आहे.
इस्त्रायलचे नेते नेतान्याहू आणि इराणचे नेते खामेनी हे दोघेही देशांतर्गत अस्थिरतेचा, विदेशातून होणाऱ्या विरोधांचा व आंतरराष्ट्रीय न्यायालयातील मानवाधिकार विरोधी खटल्यांचा बराच काळ सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सत्ता व स्वअस्तित्व टिकवायचे तर संघर्ष व युद्धासारखा रामबाण उपाय दुसरा नाही. म्हणूनच परस्परपुरक उपद्रव क्षमता असलेले हे दोन्ही हुकूमशहा युद्धखोरीतून जनता, देश व जगास संकटात लोटत आहेत. त्यातच तथाकथीत मध्यस्थ ट्रम्प यांच्या बेजबाबदार व बेभवरशी धोरणांमुळे हा संघर्ष धोकादायक वळण घेण्याच्या मार्गावर आहे. हा संघर्ष असाच वाढत गेल्यास आधीच मंदीत असलेली जागतिक अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडून पडेल. संघर्ष सुरू झाल्यापासून तेलाच्या किंमतीत 8 टक्क्याने वाढ झाली आहे. जगातील अनेक देशांपर्यंत पोहाचणारे तेल, नैसर्गिक वायू व इतर महत्त्वपूर्ण घटक मध्यपूर्वेतील होर्मुझच्या सामुद्रधुनीसह अन्य गजबजलेल्या सागरी मार्गातून पाठवले जातात. सद्यकालीन संघर्ष तीव्र होता या मार्गात अडथळे निर्माण होऊन जगातील इंधन व उर्जेची समस्या गंभीर स्वरूप धारण करेल. उत्पादन, वाहतूक, उर्जाकेंद्रीत सेवा महाग बनून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनास भीडतील. युद्धाच्या शक्यतेमुळे शेअर बाजार, मध्यपूर्वेकडे जाणाऱ्या विमान सेवा, या प्रदेशातील विदेशी नागरिक या साऱ्या घटकांवर परिणाम होताना दिसत आहे.
इस्त्रायल-इराण संघर्ष भारताच्या विदेशी धोरणाची कसोटी पाहणारा ठरणार आहे. गेल्या आठवड्यात भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या इस्त्रायली हल्यांचा निषेध करणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दोन देशांच्या संघर्षात कोणा एकाची तळी उचलून न धरता प्रतिस्पर्धी देशांशी संतुलित संबंध राखत, शांततेचे आवाहन करण्याची भूमिका भारत गेली अनेक दशके बजावत आला आहे. अमेरिका-रशिया, इराण-सौदी अरेबिया,इस्त्रायल-पॅलेस्टाईन, रशिया-युक्रेन अशा संघर्षांचा काळ भारताची पारंपारिक भूमिका अधोरेखित करतो. भारत हा इस्त्रायलचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश आहे. गेल्या दशकात भारत- इस्त्रायल व्यापारही लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. दुसऱ्या बाजूने भारताचा 80 टक्याहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा इराण व इतर आखाती देशांतून होतो. इराण व मध्य आशियाशी थेट व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारताने इराणच्या चाबहार बंदरात अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. हे बंदर चीन-पाकिस्तान सहकार्याने विकसीत ग्वादर बंदराचे प्रतिस्पर्धी आहे. इराणमध्ये सुमारे 11 हजार भारतीय आहेत. तर इस्त्रायलमध्ये 18 हजार. मध्य पूर्व हा भारतासाठी ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूकीचा प्रमुख स्त्राsत आहे. इजिप्त, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीसह अनेक महत्त्वाचे भागीदार या प्रदेशात आहेत. या पार्श्वभूमीवर इस्त्रायल-इराण संघर्ष वाढता भारतीय अर्थव्यवस्थेवर व विदेशी राजनैतिक धोरणांवर विपरीत परिणाम होणे अटळ आहे. अशा परिस्थितीत हा संघर्ष थांबवण्यासाठी भारताकडून शक्य तितके प्रयत्न होणे अपरिहार्य बनते.
-अनिल आजगांवकर