For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यपूर्वेतील युद्धाचा आगडोंब-तटस्थ मध्यस्थ कोण?

06:26 AM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्यपूर्वेतील युद्धाचा आगडोंब तटस्थ मध्यस्थ कोण
Advertisement

आज युद्धाचा एक एक दिवस वाढत आहे, युद्ध काही केल्या थांबत नाही. अमेरिका हट्टाला पेटली आहे आणि इराण तत्काळ शरण येईल असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत होते पण तसे घडले नाही. आयातुला खामेनी शांत झाले परंतु इराण मात्र चिवटपणे अमेरिकेशी झुंज देत आहे आणि तेवढ्याच आक्रमकपणे तो इस्रायलच्या विरोधात कारवाया करत आहे. नाटो राष्ट्रांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचे नाकारले आहे.

Advertisement

इंग्लंड फ्रान्ससारखे देशसुद्धा ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणाला सहमती दर्शवत नाहीत, रशिया चीन तटस्थ आहेत. अशावेळी हे युद्ध थांबविणे हेच इस्रायल अमेरिका आणि इराणसाठीसुद्धा हिताचे आहे. तसेच उभ्या मानव जातीच्या हितासाठीसुद्धा युद्ध तत्काळ थांबणे आवश्यक आहे. मागे बारा दिवसाचे युद्ध जसे थांबले होते तसे हे संभाव्य 24 दिवसाचे युद्ध आता आटोपण्याच्या मार्गावर येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का

Advertisement

अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी गटाचे प्रमुख जो केंट यांनी नुकताच धक्कादायकपणे राजीनामा दिला आणि त्यांनी इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले की इस्रायलच्या दबावामुळे अमेरिका युद्धात ओढली गेली आहे. खरे तर या युद्धात अमेरिकेने पडण्याची गरज नव्हती, अमेरिकेच्या चुकांची त्यांना उपरती झाली. त्यामुळे त्यांनी अकस्मात राजीनामा दिला आणि ट्रम्प यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. आता खुद्द अमेरिकेच्या पेंटागॉनमध्ये काम करणारे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी असे सूचित केले आहे की, आता या तणावपूर्ण परिस्थितीत केवळ भारतच मध्यस्थी करू शकतो. मॅकग्रेगर महोदय हे निवृत्त लष्करी अधिकारी तर आहेतच शिवाय ते राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार म्हणून सुद्धा कार्यरत होते, भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे इस्रायल, इराण आणि अमेरिका या तीनही भांडणाऱ्या घटकांशी मैत्रीचे संबंध आहेत, आता या तीनही घटकांना एकत्र आणून काही तोडगा काढणे, युद्ध थांबविणे याबाबतीत भारतच पुढाकार घेऊ शकेल असे मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे आता साऱ्या जगाच्या आशा भारताकडे डोळे लावून आहेत. युद्ध थांबविण्यात भारत तटस्थ मध्यस्थ म्हणून भूमिका घेऊ शकतो. प्रदेशातील शत्रुत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोन केला तरी युद्धविराम होऊ शकतो असे मॅकग्रेगर यांचे मत आहे. त्यांना असे वाटते की भारताची या तीनही राष्ट्राशी मैत्रीचे संबंध आहेत. या संदर्भात विविध संभाव्यतेची चर्चा प्रस्तुत लेखामध्ये केली आहे.

शांतता व स्थैर्याची हाक

भारताने गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने शांतता व स्थैर्याचे आवाहन केले आहे, असे आवाहन करताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगातील अनेक देशांशी संपर्क साधून संवाद व कूटनीतीच्या मार्गाने हा प्रश्न सुटावा असा आग्रह धरला आहे. युद्ध कोणालाही परवडणारे नाही, दोन्ही गटांनी सामोपचाराने चर्चेच्या टेबलावर यावे अशी भारताची हाक आहे.

अकराव्या रायसीना शिखर परिषदेत अध्यक्ष डॉक्टर अलेक्झांडर स्टब यांनी केलेल्या भाषणात त्यांनी भारताचा तिसरी प्रभावी शक्ती असा उल्लेख केला आणि आता भविष्यात पूर्व पश्चिम नव्हे तर दक्षिण राष्ट्रांचा नेता म्हणून भारताचा उदय अपरिहार्य आहे, असे भाकीत केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एक संभाव्य तटस्थ मध्यस्थ म्हणून ओळखले जात आहे असे अधोरेखित केले. त्यांनी विशेषत: अमेरिका इस्रायल गट आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्यात भारताने भूमिका बजावावी असे आवाहन केले. त्यानंतर अमेरिकेच्या पेंटागॉनमधील निवृत्त अधिकाऱ्यांनी सुद्धा भारताने याबाबतीत पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता जगातील सर्व राजकीय निरीक्षकांचे आणि पंडितांचे भारताकडे लक्ष वेधले गेले आहे.

मध्यपूर्वेत कृष्णशिष्टाई

भारताचे अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण हे जसे पंचशील या नेहरू प्रणित धोरणावर आधारित आहे तसेच ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सक्रिय अलिप्तता धोरणाचा हा परिपाक आहे. विशेषत: गेल्या दहा वर्षात मोदी युगामध्ये भारताचे परराष्ट्र धोरण हे गीतेमधील दुसऱ्या अध्यायाच्या कर्मयोगावर आधारित नवी झेप घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थितप्रज्ञ असून ते दोन्ही बाजूंनी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता शांतता व स्थैर्य साध्य करण्यासाठी कष्टपूर्वक डिजिटल डिप्लोमसी तंत्राचा सुद्धा वापर करत आहेत. मध्यस्थतेच्या भूमिकेचा पुरस्कार करताना भारताने केवळ मवाळ धोरण न स्वीकारता आपल्या क्षमतांचे आणि भूमिकांचे यथार्थ आणि मजबूतपणे प्रदर्शन केले आहे. निष्पक्ष आणि प्रामाणिक मध्यस्थ असा भारताचा उदय झाला आहे. आपल्या क्षेपणास्त्रांची, लढाऊ विमानांची प्रगती तसेच अणुशक्ती राष्ट्र म्हणून भारताने संपादन केलेले सामर्थ्य यामुळे भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे आणि शांतता उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करण्याची क्षमताही वाढली आहे.

तणाव कमी करण्यासाठी

मध्ये पूर्वेत युद्धाचे ढग रोजच्या रोज अधिक काळवंडत आहेत. क्षेपणास्त्रांचा मारा आणि विमानातून केले जाणारे बॉम्ब हल्ले यामुळे मध्यपूर्वेत अंतराळात रोज धुळीचे लोटच्या लोट दिसत आहेत, जीवित आणि वित्तहानी वाढली आहे. पायाभूत सुविधांचा विनाश होत आहे. अशावेळी तणाव कमी करण्यासाठी भारत उभय पक्षांना प्रामाणिकपणे आवाहन करत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे संवाद व कुटनिती धोरणाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी इस्रायल गट आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष थांबावा, तत्काळ युद्धविराम व्हावा, तणाव कमी व्हावा म्हणून ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. ब्रुसेल्स येथे त्यांनी अनेक युरोपीय नाटो राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांनाही शांततेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. भारताची संतुलित मुत्सद्देगिरी ही स्थितप्रज्ञ नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर आधारलेली आहे. भारताने या प्रदेशात एक नाजूक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. पॅलेस्टाईन उपक्रमांना पाठिंबा देणे हे भारताचे दीर्घकालीन धोरण आहे. त्यासोबतच भारत इस्रायलबरोबरची आपली सामरिक भागीदारी अधिक मजबूत करत आहे. इराणसोबत असलेले आवश्यक कार्यरत संबंधही टिकवून ठेवले आहेत. ही मल्टी अलाइनमेंट म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि हे संतुलन केवळ भारत साध्य करू शकतो आहे. ही संतुलित मुत्सद्देगिरी भारताच्या आजवरच्या तपश्चर्येचा एक भाग आहे.

शांतता प्रक्रियेला गती

युद्धाच्या नावामुळे त्रस्त असलेल्या जगामध्ये शांतता प्रक्रियेला कशी गती द्यावयाची हा मोठा यक्षप्रश्न होता, परंतु भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आता मध्यपूर्वेत शांतता प्रक्रियेला गती लाभत आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

मध्यपूर्वेत शांतता प्रक्रिया ही केवळ जपमाळ ओढल्याने साध्य होणार नाही. त्यासाठी भारताला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. भारत शांतता प्रक्रियेला गती देत आहे. न्यूयॉर्क जाहीरनाम्याला पाठिंबा दर्शविला आहे. कोणतेही तणाव दोन राष्ट्रांनी एकत्र येऊन सोडविले पाहिजेत व तशी वातावरण निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. भारताने पॅलेस्टाईन प्रश्नाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी न्यूयॉर्क जाहीरनाम्याला अनुसरून बोलणी करण्याचे आवाहन केले आहे, तसेच भारताने मानवतावादी दृष्टिकोनावर भर दिला आहे. गाझापट्टीत राहणाऱ्या लोकांना मानवतावादी दृष्टीने शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या निरामय जीवनासाठी मदत करण्यावर भर दिला आहे. व्यापक प्रमाणावर या प्रदेशातील नागरिकांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पॅलेस्टाईन हे स्वतंत्र राज्य म्हणून त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी भारताने सदैव पुरस्कार केला आहे. कोणताही भेदभाव विचारात न घेता प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत मदत पोहोचली पाहिजे, ही भारताची मानवतावादी भूमिका आहे. जरी भारत दहशतवादाला विरोध करत असला तरी आपल्या तटस्थ मध्यस्थाच्या भूमिकेनुसार तो मानवी कल्याणावर सदैव भर देत आहे. प्रादेशिक आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यावर भारताने भर दिला आहे. भारत हा जगातील एक प्रमुख ऊर्जा आयातदार देश आहे, त्यामुळे आखाती देशातील आठ प्रमुख राष्ट्रांशी भारताचे संबंध आहेत. मध्यपूर्वेतील शांतता व स्थैर्यासाठी भारताने या देशांशी सदैव मैत्रीचे संबंध ठेवले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध सुरू होताच दोन दिवस सातत्याने या आठ देशांच्या राष्ट्रप्रमुखाशी चर्चा करून त्यांना शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे. तसेच आखातात राहणाऱ्या एक कोटी 20 लाखापेक्षा अधिक भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी भर दिला आहे. तसेच आपल्या ऊर्जा साधनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारताने प्रयत्न केले आहेत आणि त्या राष्ट्रांची मदतही घेतली आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून भारताने आपल्या मालवाहू जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास प्रारंभ केला आहे आणि काही नौका या भारताच्या काढला बंदरावर पोहोचल्यासुद्धा आहेत. त्यामुळे भारतात कुठलेही ऊर्जा संकट तीळमात्रही निर्माण होणार नाही, याची जनतेने खात्री घेतली पाहिजे कारण भारताच्या सावध तटस्थ मध्यस्थ भूमिकेमुळे ऊर्जा संकटात कोणताही गुंता निर्माण होणार नाही हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आठ आखाती देशांशी संवाद साधला आहे तसेच त्यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कीयन यांच्याशी सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचीही सहानुभूती मिळविली आहे.

भू राजेनैतिक दृष्टी

भारताच्या तटस्थ मध्यस्थ या भूमिकेचे भूराजनैतिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे. पहिली बाब म्हणजे भारत सामरिक स्वायत्तता राखून आहे. 2026 मध्ये वाढत्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सामरिक्ततेला प्राधान्य दिले आहे, त्याही एका बाजूला न वळता भारताने यथार्थपणे संतुलन राखले आहे. एका बाजूला कलने, कलंडणे यापासून भारत नेहमी जागरूक सावध राहून तटस्थ मध्यस्थाची भूमिका संतुलन राखत पार पाडत आहे. प्रादेशिक घटकासोबत सहकार्य करण्यात भारताने जागरूकता दाखवली आहे. भारताच्या सहभागाचे स्वरूप संतुलन राखण्यावर भर देणारे आहे. नाटो तसेच युरोपियन युनियन यांनासुद्धा भारताने मध्यस्थीत पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. भारताने इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे, प्रादेशिक दहशतवाद विरोधी उपक्रम अधिक बळकट करण्यावर भारताने सतत लक्ष केंद्रित केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात याबाबत वारंवार या भूमिकेचा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.