Kolhapur News : कोल्हापुरात मंत्री गेल्यावर रस्त्यांची अवस्था 'जैसे थे' !
कोल्हापूर मार्केट यार्ड: ३० वर्षांनी रस्त्यांवर तातडीचे डांबरीकरण!
by नीता पोतदार
कोल्हापूर : कोल्हापुरात ५ नोव्हेंबर २०२५ रोजी एक आश्चर्यचकित घटना घडली, याचं झालं असं की कोल्हापुरातील रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं, याआधीही अनेक वेळा डांबरीकरण झाले आहे. पण बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी केलेल्या या डांबरीकरणाचं एक विशेष म्हणजे ज्या रस्त्यावर हे डांबरीकरण झालं ते ना कोल्हापूरच्या विकासासाठी होतं ना, नागरिकांसाठी. जे डांबरीकरण झालं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी.. पण या रस्त्याची स्थिती मंत्री गेल्यावर 'जैसे थे' अशीच झालीय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. बुधवारी ५ नोव्हेंबरला कोल्हापुरात मार्केट यार्ड परिसरातल्या रामकृष्ण हॉलमध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थित लावली आणि रामकृष्ण हॉलच्या परिसरात असलेल्या एका रस्त्यावर सुमारे ३० वर्षानंतर डांबरीकरण झाले. साधारण २० ते - २५ वर्षे या रस्त्यांची - अवस्था अत्यंत - बिकट झाली होती. - या रस्त्यावरून अनेक वर्षे वाहनधारक - जीवघेणा प्रवास करत होते. या - रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी अनेक वेळा - निवेदन, मोर्चेदेखील काढण्यात आले, - पण महानगरपालिका प्रशासनाला याचा फारसा फरक पडला नाही. इतके प्रशासन ढिम्म असल्याचे दिसले. त्यामुळे लोकांचे ऐकेल ती महानगरपालिका, कसली अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मेळावा या परिसरातील रामकृष्ण हॉलमध्ये घेतला गेला. अन् या खड्डेमय रस्त्याचे भाग्य उजाडलं. कारण काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिसरात येणार... उपमुख्यमंत्री येणार म्हटल्यावर महानगरपालिका खडबडून जागी झाली. मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं, जे रस्ते गेली अनेक वर्षे बिकट अवस्थेमध्ये नागरिकांना पाहायला मिळत होते, खड्डेमय झाले होते, तेच रस्ते काही तासातच गुळगुळीत झाले, बरं रस्त्याचं डांबरीकरण झालं, ही चांगली गोष्ट आहे, स्थानिकांनी काही तास का होईना या रस्त्याचं डांबरीकरण अनुभवाला मिळाले .
पण या रस्त्यांचं डांबरीकरण तरी चांगले करावे ना ! मंत्री गेले आणि रस्ते उखडले, अशी परिस्थिती नुकत्याच डांबरीकरण केलेल्या याा रस्त्यांची झाली. काही तासातच या रस्त्यांवर भेगा पडलेले, खडी, डांबर निघाल्याने रस्ते उखडल्याचे पाहायला मिळाले. डांबरीकरण करायचं होतं तर चांगलं तरी करायचं. हे फक्त उपमुख्यमंत्र्यांना दिखावा दाखवायला केलं होतं का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अनेक आंदोलने अनेक मोर्चे काढण्यात आले, रस्ता सुरळीत होण्यासाठी, नागरिकांना होणाऱ्या त्रासापेक्षा मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी हे रस्त्यांचा डांबरीकरण होत असेल, तर खरंच हे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे जिवंत उदाहरणच म्हणावं लागेल. जे कोल्हापूरकर सोयी सुविधांसाठी अनेक टॅक्स भरतो, त्या कोल्हापूरकरांच्या त्रासाचं कुणाला काही पडलं नाही, पण उपमुख्यमंत्री शिंदे येणार म्हटल्यावर त्यांची खातरदारी तर व्हायला पाहिजे, खरंच ही कोल्हापूरकरांची उदासिनताच म्हणावी लागेल, अशीही प्रतिक्रिया उमटत आहे.
मंत्र्यांचे दौरे आठवड्यातून सारखे व्हावे
अनेक आंदोलने अनेक निवेदन दिल्यानंतरही महापालिका जागी होत नसेल आणि फक्त मंत्रांच्या दौऱ्याला या रस्त्यांचे डांबरीकरण होणार असेल तर मंत्र्यांचे दौरे आठवड्यातून सारखे व्हावेत, जेणेकरून करून कोल्हापुरातील रस्ते सुरळीत होतील, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.