For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसबा आचरे संस्थानच्या शाही गणेशोत्सवाची सांगता 

07:49 PM Oct 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कसबा आचरे संस्थानच्या शाही गणेशोत्सवाची सांगता 
Advertisement

सागरकिनारी दुमदूमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष

Advertisement

आचरा | प्रतिनिधी , फोटो परेश सावंत

 इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या 39 दिवसांच्या गणरायाची मूर्ती हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात आचरा समुद्रात विसर्जीत करत 39 दिवस रंगलेल्या गणेश उत्सवाची सांगता करण्यात आली. गणेश उत्सवातील श्री गणेशमूर्तीचे सूर्यदेव अस्ताला जात असताना आचरा किनारी दाखल होताच वातावरण काहीसे भावूक बनले होते. विसर्जन मिरवणुकीत सहभागी रयतेच्या पापण्यांच्या कडांवर अश्रू ओथंबलेले होते.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषाने आचरा किनारा पूर्ण दुमदुमन गेला होता.जिल्ह्यातील सर्वाधिक दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवापैकी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा गणेशोत्सव प्रसिध्द आहे. या उत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्येक्रम करण्यात आले. शनिवारी दुपारी श्रीच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आले. महालदार यांची श्री गजानन महाराज अशी ललकारी होताच विसर्जन सोहळ्यास प्रारंभ झाला. ढोलपथक व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक समुद्र किनारी सरकू लागली. रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठमार्गे, भंडारवाडी, काझीवाडी,  गाऊडवाडी, आचराबंदरमार्गे पिरावाडी  येथील श्री देव चव्हाट्यावर मूर्ती काही वेळ ठेवण्यात आले तेथे मच्छीमार बांधवांनी दर्शन घेतले. त्यानंतर मिरवणूक पुन्हा चालू जाली. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणूकीत स्थानिक भाविक , मुंबई,पुणे, कोल्हापुर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते. " मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणांनी आचरे गाव दुमदुमून गेला होता.विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूकीत हिंदू बांधवाबरोबर गावातील अन्य धर्मीय बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्र किनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळांनी भाविकांना प्रसाद  म्हणून मोदक वाटप केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.