गरीबाची मजबुरी...देवीच्या मंडपात चोरी?
साडी, खण, नारळ अन् फळे लांबविली : उलटसुलट मतप्रवाहांना उधाण
बेळगाव : केळकरबाग येथील ‘बेळगावची आदिशक्ती’ देवीच्या मंडपात साड्यांची चोरी झाली आहे. शनिवारी दुपारी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिलेने देवीच्या साड्या, खण, नारळ व फळे नेली आहेत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते जेवणाला गेले होते. मंडपात कोणीच नव्हते. त्यावेळी लहान मुलीसह दर्शनासाठी आलेल्या एका महिलेने मूर्तीच्या शेजारी ठेवलेल्या साड्या व इतर साहित्य पळविले आहे. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. नवरात्रोत्सवात सर्वत्र देवीचा जागर केला जातो. गल्लोगल्ली देवीच्या मूर्तींची स्थापना करून नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केलेले असते. गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सवासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. असे असताना देवीच्या मंडपात चोरी झाली आहे.
या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली. आपल्या लहान मुलीसह मंडपात आलेल्या महिलेवर चोरी करण्याची वेळ का आली? मजबुरीमुळेच तिच्यावर ही वेळ आली असणार, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तर आणखी काही जण मजबुरी आहे म्हणून चोरी करायला नको होती, मंडळांकडे मदतीची याचिका केली असती तर त्यांना मदत मिळाली असती, असा अभिप्रायही व्यक्त केला जात होता. केळकरबागेतील नवरात्रोत्सव मंडळानेही एका पत्रकाद्वारे या प्रकरणाची माहिती देत अशा महिलांना मंडळांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्या महिलेवर देवीच्या मंडपात चोरी करण्याची वेळ आली. ही केवळ तिची चूक नाही, तर आपल्या सर्वांचीच आहे. अशा महिलांना नवरात्रोत्सव मंडळांकडून मदत करून त्यांना सक्षम बनविण्याचे आवाहनही या मंडळाने केले आहे. कोणाचा उत्सव मोठा? हे दाखविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा अशा गरजूंना मदत करणे आपले कर्तव्य असल्याचेही मंडळाने म्हटले आहे.