भारतीय संघाचे सपशेल लोटांगण
फार पूर्वी तीन अंकी नाटकं आपण बघितली असेल. त्यानंतर दोन अंकी नाटकं बरीच दिवस स्थिरावली. कसोटी क्रिकेटमध्ये ज्यावेळी कसोटी सामना पाचव्या दिवसापर्यंत पोहोचतो त्यावेळी तो सामना दोन अंकी नाटकासारखाच असतो. परंतु तोच सामना अडीच दिवसात संपतो त्यावेळी त्याचे रूपांतर एकांकिकामध्ये होते. नेमकी अशीच एक एकांकिका आपण अनुभवली. जागतिक कसोटीत घोड्यावर स्वार होऊन आफ्रिकन संघ भारतात आला तोही खांद्यावर कसोटीची गदा घेऊन.
पहिल्याच दिवशी ती गदा काही दिवसांसाठी खाली ठेवावी लागणार अशीच चिन्हं होती. परंतु मी नेहमीच म्हणतो की शक्य असलेला विजय कसा प्रतिस्पर्ध्याला स्वाहा करावा, हे फक्त आणि फक्त भारताकडून शिकावे. अर्थात याला दोष तरी कोणाला द्यावा, भारताच्या अवसानघातकी फलंदाजांना की क्युरेटरना की सरतेशेवटी ऐनवेळी अनुपलब्ध असलेल्या शुभमन गिलला. एक काळ असा होता की भारतात पाहुण्यांसाठी मंदगती गोलंदाजांचा सापळा तयार करण्यात यायचा. या सापळ्यात ते अगदी सहज अडकायचे. परंतु दिवस बदलले, कालांतराने भारतच या सापळ्यात अडकू लागला. न्यूझीलंडविरुद्धचा व्हाईटवॉश हे त्याचे उत्तम उदाहरण. आणि त्याच ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर आफ्रिकन मंदगती गोलंदाजांसमोर वाकून नमस्कार केला. पाण्यात जसा रंग टाकावा तसा पाण्याचा रंग बदलतो, त्याप्रमाणे या कसोटीत अडीच दिवसात ही खेळपट्टी तासागणिक बदलली. पहिल्याच दिवशी वेगवान गोलंदाजांसाठी जो हिरवागार गालिचा होता तो दुसऱ्या दिवशी अक्षरश: काळाकुट्ट झाला.
कसोटी क्रिकेटमध्ये पाय रोवून किंबहुना खेळपट्टीवर नांगर टाकणं हा प्रकार यावेळी भारतीय फलंदाजांनी ऑप्शनला टाकला होता. आपण कमकुवत वेस्टइंडीजविरुद्ध नव्हे तर बलाढ्या आफ्रिकन संघासमोर खेळतोय याचे भान भारतीय संघाला राहिलेच नाही. कसोटी क्रिकेटमध्ये वरचे ढेपाळले तर खालचे सांभाळतात आणि खालचे गडगडले तर वरचे सांभाळतात, असं सर्वसामान्य चित्र आपण वारंवार बघतो. परंतु या सामन्यात नाव वरचे वधारले ना खालच्यांनी सांभाळलं. हा सामना सुरू होण्याअगोदर दस्तूरखुद्द सौरव गांगुली म्हणाले होते की तिसऱ्या, चौथ्या दिवशी चेंडू कमालीचे वळतील. परंतु हे चेंडू पहिल्या दिवशी संध्याकाळीच वळतील याची सुतराम शक्यता भारतीय संघाला नव्हती. याचा फायदा केशव महाराज आणि ऑफस्पिनर हार्मरने अचूक उचलला. आणि बघता बघता पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी भारतीय संघाला स्वप्नवत वाटणाऱ्या विजयाचे रूपांतर पराजयात केलं. महत्त्वाच्या क्षणी गिलचं संघात नसणं आपल्याला कमालीचं भोवलं हेही तेवढंच खरं. पहिल्या दिवशी 22 यार्डवर गुलाबाचा सुगंध दरवळत होता. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्याच गुलाबाला हात लावताना अनेक काटे टोचले गेले. यातच भारतीय संघ खऱ्या अर्थाने जखमी झाला. आणि ही जखम भारतीय संघाला शेवटपर्यंत भरून काढता आली नाही. पराजयाचा दाढेतून एखादा विजय बाहेर निघाला की त्याची चव काही वेगळीच असते. नेमकी हीच चव काल आफ्रिकन संघाने चाखली असेल. कर्णधाराला डिवचलं की काय होतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. असो.
एकंदरीत काय तर जिथे विजय शंभर टक्के आवाक्यात असताना प्रतिस्पर्धी संघासमोर घालीन लोटांगण करण्याची जुनी खोड या पराभवातून भारतीय संघा कडून पुन्हा एकदा दिसली. या पराभवातून आपण पुढे काही शिकणार आहोत की नाही की येरे माझ्या मागल्या, हेच दृश्य आपल्याला वारंवार बघायला मिळणार याचे उत्तर भारतीय संघाला भविष्यात द्यावे लागणार. तुम्ही बलाढ्या संघासमोर लाल झेंडूच्या प्रेमात कधी पडणार हे मात्र भारतीय संघासमोर न उलगडणारं कोडं आहे येवढं मात्र खरं. या सामन्यात दोन्ही संघांकडून भैरवी ऐकायला मिळाली होती. परंतु यात आफ्रिकन भैरवी काहीशी उजवी ठरली, एवढा मात्र निश्चित.
कव्हर ड्राईव्ह