डेन्मार्कमध्ये स्ट्रीटलाइटचा रंग लाल
कारण कळल्यावर तुम्हीही व्हाल चकित
डेन्मार्क सध्या एका अत्यंत अनोख्या प्रयोगावरून चर्चेत आहे. राजधानी कोपेनहेगनच्या नजीक ग्लाडसॅक्से नावाच्या भागात पारंपरिक पांढऱ्या स्ट्रीटलाइट्सच्या जागी लाल रंगाचा प्रकाश असलेले लॅम्प लावले जात आहेत. पहिल्या नजरेत हा बदल छोटा वाटतो, परंतु यामागील कारण कुणालाही चकित करू शकते. हा प्रकाश माणसांसाठी नव्हे तर वटवाघळांसाठी बदलण्यात आला आहे.
ग्लाडसॅक्से पालिकेनुसार फ्रेडरिक्सबोर्गवेय क्षेत्रात वटवाघळांचे मोठे वास्तव्य आहे. या भागात कृत्रिम प्रकाश वटवाघळांचे उडणे, अन्न अन् मार्ग ओळखण्यास अडथळा ठरला होता. याचमुळे रस्त्याच्या विशेष पट्ट्यांवरील पांढऱ्या लाइट्स हटवून लाल रंगाचा प्रकाश करण्यात आला आहे. लाल प्रकाशाच्या तरंग लांब असतात आणि संशोधनानुसार हा वटवाघळांवर सर्वात कमी नकारात्मक प्रभाव पाडतो. तर निळा, हिरवा किंवा पांढरा प्रकाश त्यांच्या वर्तनाला सर्वाधिक प्रभावित करतो.
बदलण्यात आल्या स्ट्रीटलाइट्स
या भागाला पूर्णपणे काळोखयुक्त करणे वटवाघळांसाठी आदर्श होते, परंतु रस्ते सुरक्षेमुळे हे शक्य नव्हते. अशास्थितीत कमी नुकसानीचा पर्याय लाल प्रकाशच होता असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वाहतूक सुरक्षाही प्राथमिकता
रस्त्याच्या काही हिस्स्यांवर लाल प्रकाश आहे, परंतु चौक आणि क्रॉसिंगवर अद्याप पांढरा प्रकाश लावण्यात आला आहे. त्यांना उंच पोल्सवर ठेवण्यात आले आहे जेणेकरून चालक आणि सायकलचालकांना दृश्यतेत कुठल्याही प्रकारची समस्या होऊ नये. प्राणी अधिक सक्रीय असलेल्या भागात लाल प्रकाश तर मानवीय हालचाली अधिक असलेल्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा प्रकाश असेल अशाप्रकारचे लायटिंग डिझाइन करण्यात आले आहे.
मानव अन् निसर्गाचे संतुलन
प्रकल्पाशी निगतिड रोड इंजिनियर जोनास योर्गेन्सन यांनी हा बदल केवळ बल्ब बदलण्यासारखे सोपे पाऊल नाही, याकरता मोठे अध्ययन अन् नियोजन लागल्याचे सांगितले आहे. रस्त्याचा वापरही जारी रहावा आणि वटवाघळांच्या नैसर्गिक हालचालीही प्रभावित होऊ नयेत असा उद्देश होता. हा प्रयोग शहरी प्रकाश व्यवस्थेच्या पारंपरिक पद्धतीला आव्हान देतो. लाल प्रकाश एक प्रकारचे प्रतीक देखील आहे. यातून हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे कळते असे प्रकल्पावर काम करणारे डिझाइनर फिलिप जेलवर्ड यांनी सांगितले आहे.
छोटा प्रयोग, जगभरात उत्सुकता
सध्या लाल स्ट्रीटलाइट्सची व्याप्ती छोटी आहे आणि याला वाढविण्याची कुठलीच योजना नाही. परंतु युरोप आणि अमेरिकेचे अनेक शहरी नियोजनकार या मॉडेलचा उत्सुकतेसह अभ्यास करत आहेत. ऊर्जा बचत, प्रकाश प्रदूषण आणि जैवविविधतेच्या मुद्द्यांना तोंड देणाऱ्या शहरांसाठी हा एक शांत परंतु शक्तिशाली उदाहरण ठरत आहे. कधीकधी रस्ते केवळ प्रकाशाने नव्हे तर विचारात बदल करत सुरक्षित केले जाऊ शकतात असे हा प्रयोग दाखवून देत आहे.