For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसस्थानकाशेजारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे होणार स्थलांतर

11:00 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसस्थानकाशेजारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे होणार स्थलांतर
Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर नूतन इमारतीच्या कामाला गती

Advertisement

बेळगाव : नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम लोकसभा निवडणुकीनंतर हाती घेतले जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतराची प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सदर निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. बहुमजली जिल्हाधिकारी कार्यालय इमारत उभारण्यासाठी बांधकाम खात्याकडून जागेचे सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. इमारतीसाठी आवश्यक बाबींचे परीक्षण करण्यात आले आहे. सहा मजली इमारत उभारण्याचे नियोजन केले आहे. दोन तळमजले व चार मजली इमारत उभारण्यात येणार असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, काही अंतरावरच दगड असल्यामुळे दगड फोडणे अधिक कष्टाचे आहे. त्यामुळे तळमजला एकच करण्याचा विचार  आहे. या कारणाने नियोजित आराखड्यात बदल होण्याची शक्यताही आहे. सरकारकडून निधी मंजूर केला आहे. अद्याप कामाला सुरुवात करण्याचा कोणताच आदेश देण्यात आलेला नाही. तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने काम पुढे ढकलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे, असे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी इमारतीची निवड : जिल्हाधिकारी

Advertisement

नूतन जिल्हाधिकारी इमारतीचे बांधकाम लोकसभा निवडणुकीनंतर हाती घेतले जाईल. सध्याचे कार्यालय मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी असणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेतून निर्माण केलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. नागरिकांना सोयीचे होईल या दृष्टीने या इमारतीची निवड करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.