For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन् जिल्हाधिकाऱ्यांनी केला बसमधून प्रवास

12:23 PM Oct 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
अन् जिल्हाधिकाऱ्यांनी केला बसमधून प्रवास
Advertisement

बनवासी येथील जनता दर्शन कार्यक्रमासाठी 150 किलोमीटर लांबचा प्रवास

Advertisement

प्रतिनिधी / कारवार

कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी मंगळवारी येथून शिरसी तालुक्यातील बनवासी पर्यंतचा सुमारे 150 किलोमीटर लांबचा प्रवास केएसआरटीसी बसमधून तिकीट काढून केला. ऐशोआरामी सरकारी कार बाजूला ठेऊन एक सर्वसामान्य महिलेप्रमाणे जिल्हाधिकारी मानकर यांनी बसमधून प्रवास केल्याने मानकर यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. बस प्रवासावेळी मानकर यांना कंडक्टरने शून्य रकमेचे तिकीट दिले. कारण यावेळी जिल्हाधिकारी मानकर यांनी राज्य सरकारने महिलांसाठी अमलात आणलेल्या ‘शक्ती’ योजनेच्या लाभ उठविला.

Advertisement

याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, मंगळवारी शिरसी तालुक्यातील बनवासी येथील जयंती हायस्कूलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण प्रदेशातील जनतेशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या व तेथेच समस्यांचे निवारण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला एसी कारमधून जाणे शक्य होते. तथापि सरकारी वाहनावर होणारा अनावश्यक खर्च व प्रदूषण टाळण्यासाठी बनवासीच्या दौऱ्यासाठी स्वतंत्र बसची निवड करण्यात आली होती. या बसमधून जिल्हाधिकारी मानकरसह एकूण 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवास केला. अन्य महिला अधिकाऱ्यांनीही शक्ती योजनेचा लाभ उठविला. तथापि पुरुष अधिकाऱ्यांना मात्र रक्कम मोजून तिकीट घ्यावे लागले.

काही शासकीय अधिकारी किरकोळ कामासाठी केवळ सरकारी वाहनांचा वापरच करीत नाहीत तर अनेक वेळा दुरुपयोगही करीत असतात. अशा अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मानकर यांच्याकडून काही बोध घेणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, बनवासी येथे आयोजित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या कार्यक्रमांतर्गत 350 हून अधिक अर्ज दाखल करण्यात आले. यासाठी 6 काऊंटरची व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळी सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी ग्रामीण जनतेच्या अतिशय संयमाने समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात पहिल्यांदाच करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.