जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला
कोल्हापूर :
जिल्ह्यात थंडीचा काडका वाढला असून पुढील आठवडाभर कोल्हापूर थंडा-थंडा, कुल-कुल राहणार आहे. शनिवारी 16 डिग्री सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. रविवारी पहाटेपर्यंत तापमानात आणखी तीन ते चार डिग्री सेल्सिअसची घट होणार असून किमान तापमान 12 डिग्रीपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार दिवस किमान तापमान 12 ते 13 आणि कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहणार आहे.
राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासुन थंडीचा जोर कमी झाला होता. उत्तरेतील तापमानात चढ-उतार होत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असून महाराष्ट्रातही थंडी कमी-जास्त होत आहे. शुक्रवारपासून राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही थंडी पुन्हा वाढली असुन शुक्रवारी जिल्ह्यात किमान तापमानाची नोंद 16 डिग्री सेल्सिअस इतकी नोंदवली गेली आहे. थंडीचा हा जोर पुढील आठवडाभर कायम राहणार असून थंडी वाढतच जाणार आहे. आज रविवार 5 रोजी पहाटेपर्यंत जिल्ह्यातील तापमानात आणखी 4 डिग्रीची घट होणार असून तापमान 12 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येणार असल्याचे अंदाज हवामान विभागाचा आहे.
जानेवारी महिना थंडीचाच
जिल्ह्यात पुढील चार दिवस 12 ते 13 डिग्री सेल्सिअस इतके तापमान राहणार आहे. यानतंर थंडीचा कडाक थोड्याफार प्रमाणात कमी होईल. गुरुवार 9 रोजीपासून संपूर्ण महिनाभर जिल्ह्यातील किमान तापमान 14 ते 17 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.