थंडीचा कडाका आणखी वाढला...
पारा घसरला 15 अंशापर्यंत
पुढील आठवड्यात कडाका वाढणार
सर्दी, ताप, खोकल्याचे रूग्ण वाढले
मास्क वापरण्याचा डॉक्टरांचा सल्ला
कोल्हापूर
राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसापासून किमान तापमानात घट होत होत असुन कोल्हापूर जिल्ह्यातही थंडी वाढत आहे. मंगळवारी कमाल तापमान 28.2 अंश डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 15.7 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले होते. वातावरणात चांगलीच हुडहुडी वाढली असुन पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मंगळवारी दिवसभर आकाश निरभ्र व तापमानात घट होत असल्याची नोंद झाली. दिवसभर ऊन असले तरी वातावरणात गारठा जाणवत आहे. सायंकाळनंतर गारठ्यामध्ये वाढ होत असुन रात्री थंडीचा जोर आणखी वाढत आहे. पहाटे धुके व सकाळी 10 वाजेपर्यंत बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडावे लागत आहे. उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. पुढील आठवड्यात तापमानात घट होणार असुन थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
थंडीचा कडाका वाढल्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढत आहेत. व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढला असल्याने नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. बाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
किमान तापमानात घट होईल
हिमालय प्रदेशामध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. उत्तरेकडील पंजाब, हरियाणासह दिल्ली आदी राज्यात थंडीत वाढ झाली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातही थंडीमध्ये वाढ झाली आहे. पुढील काही दिवस आणखी तापमानात घट होईल व थंडी जाणवेल.
डॉ. युवराज मोटे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक
पुढील आठवड्यात राहणार असे तापमान (डिग्री सेल्सियसमध्ये) :
वार किमान कमाल
बुधवार 15 28.2
गुरूवार 14 28
शुक्रवार 15 29
शनिवार 16 30
रविवार 17 30
सोमवार 17 30
कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील तापमान असे (डिग्री सेल्सियसमध्ये) :
जिल्हा किमान कमाल
कोल्हापूर : 15.7 28.2
सांगली : 15.3 29.5
सातारा : 1 2.9 28.6
सोलापूर : 15.5 31.7
रत्नागिरी : 19.6 33.2
महाबळेश्वर : 12.6 22.1