झुरळाचे वर्तुळ पूर्ण झाले!
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ विरोधातील याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्याला सल्ला दिला की, ‘हे प्रकरण इतक्या भावनिकतेने घेऊ नका.’ सर्व न्यायाधीशांच्या या वक्तव्याने झुरळा संबंधीचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.
खुद्द सरन्यायाधीशांनीच भावनिकतेने घेतले नसते तर झुरळांसाठी झाकण उघडले गेले नसते. असो. या एका वाक्यातच न्यायव्यवस्थेची प्रगल्भता दिसते, पण त्याचबरोबर समाजातील खोलवर रुतलेली निराशा आणि संतापही उघड होतो. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही केवळ सोशल मीडियावरील एक उपहासात्मक चळवळ नाही; ती आजच्या भारतातील तरुणांच्या मनातील अस्वस्थतेचे, बेरोजगारीचे, व्यर्थतेच्या भावनेचे आणि संस्थांवरच्या अविश्वासाचे प्रतीक बनली आहे. सर्व प्रथम, घटनेच्या संदर्भात सरन्यायाधीशांचे पहिले विधान आणि त्यावरून त्यांचा खुलासा विचारात घेता त्यांचे वक्तव्य बनावट पदव्या धारण करणाऱ्या, ऑनलाइन द्वेष पसरवणाऱ्या काही तत्त्वहीन व्यक्तींबद्दल बोलत होते असे आपण मानून चालू. मात्र भाषेची तीव्रता आणि ‘झुरळ’ ही उपमा यामुळे ते सर्व बेरोजगार तरुणांवर लादले गेले. एका उच्च न्यायिक अधिकाऱ्याकडून अशी उपमा येणे हे अपरिहार्यपणे संवेदनशील ठरले. कारण आज भारतात कोट्यावधी तरुण शिक्षण पूर्ण करूनही नोकरीशिवाय बसले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळे, पेपर लीक, भ्रष्टाचार यामुळे युवकांचा विश्वास उडाला आहे. जेव्हा व्यवस्था स्वत:ला ‘समर्थ’ आणि ‘महान’ म्हणवते, पण तरुणांना ‘कॉक्रोच’ म्हणते, तेव्हा राग उफाळणे स्वाभाविक आहे. अभिजीत दीपके यांनी अमेरिकेत बसून सुरू केलेली ही ‘पार्टी’ अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर दोन कोटी फॉलोअर्स गाठते. हजारो तरुणांनी सदस्यत्व घेतले, नियमावली स्वीकारली आणि ‘आम्ही आळशी, बेरोजगार, ऑनलाइन सक्रिय आहोत’ असे आत्म-व्यंग्य स्वीकारले. हे व्यंग्य आहे, पण त्यात खरे दु:ख दडलेले आहे. जेव्हा एखाद्या पिढीला ‘टॅक्सपेयर’ बनण्याची संधीच मिळत नाही, तेव्हा ती ‘कॉक्रोच’ बनून तरी एकत्र येण्याचा मार्ग शोधते. शशी थरूर, सोनम वांगचुक यांनी म्हटल्याप्रमाणे, तरुणांची निराशा समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना अभिव्यक्तीचा प्लॅटफॉर्म नाकारणे हा लोकशाहीला धक्का आहे. एक्स अकाउंट निलंबित करणे हा तात्पुरता उपाय आहे. या घटनेतून तीन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली, सोशल मीडिया ही आजची सार्वजनिक सभा आहे. येथे विनोद, संताप, व्यंग्य आणि राजकीय जागृती एकत्र विणले जाते. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने दाखवले की, जेन-झेड आणि मिलेनियल्स यांच्यातील राग हा केवळ ‘ट्रोलिंग’ नाही, तर तो सिस्टीमिक अपयशाविरुद्धचा आहे. बेरोजगारीचा दर, खासगी क्षेत्रातील अनिश्चितता, सरकारी नोकऱ्यांतील भ्रष्टाचार आणि शिक्षण व्यवस्थेतील अपयश यामुळे तरुण वर्ग हताश झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, न्यायव्यवस्था आणि कार्यकारी यंत्रणेच्या भाषेची जबाबदारी. उच्च पदावरील व्यक्तींनी शब्द निवडताना अत्यंत काळजी घ्यायला हवी. झुरळसारखी उपमा भावनिकदृष्ट्या आघात करते. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विरोधी पक्ष आणि बुद्धिवंत वर्गाने याकडे केवळ राजकीय मुद्दा म्हणून पाहू नये. योगेंद्र यादव यांनी म्हटल्याप्रमाणे, ही केवळ मीम नाही, तर व्यवस्थेतील बंद दरवाजांविरुद्धचा संताप आहे. भारतात लोकशाही मजबूत आहे, याचे श्रेय स्वतंत्र न्यायव्यवस्थेला, मुक्त माध्यमांना आणि सक्रिय नागरिकांना जाते. मात्र हीच लोकशाही तरुणांना ‘कॉक्रोच’ म्हणण्यापर्यंत जाऊ देईल का? सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला ‘भावनिक’ होऊ नका म्हणणे योग्य आहे, कारण न्यायालये भावनांवर चालत नाहीत. पण समाजाच्या भावना दुर्लक्षित करता येत नाहीत. आजच्या तरुणाला नोकरी हवी आहे, शिक्षणात गुणवत्ता हवी आहे, न्यायात पारदर्शकता हवी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याला ‘आशा’ हवी आहे. जेव्हा आशा मरते, तेव्हा व्यंग्य जन्म घेते. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे भविष्य काय असेल, हे सांगता येत नाही. कदाचित ती फक्त एक विनोदी चळवळ म्हणून विरून जाईल. पण त्याने ज्या प्रश्नांना जन्म दिला आहे, ते कायम राहतील.
