For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झुरळ होणार हेर

06:41 AM Apr 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
झुरळ होणार हेर
Advertisement

प्राण्यांवर चिप किंवा कॅमेरा लावून त्यांच्याकडून हेरगिरी करविली जात असल्याचे तुम्ही चित्रपटांमध्ये पाहिले असेल. परंतु आत हे फिल्मी दृश्य वास्तवात उतरणार आहे, कारण एक स्टार्टअप हेर कॉकरोच तयार करत असून जे गुप्त माहिती जमविण्यास मदत करणार आहे. स्टार्टअप कंपनी झुरळांना मिनी स्पायमध्ये रुपांतरित करण्याची तयारी करत आहे. या जैव-रोबोटिक किड्यांच्या मदतीने अशा ठिकाणांवरुन माहिती जमविण्याचे लक्ष्य आहे, जेथे माणूस किंवा पारंपरिक ड्रोन पोहोचणे अत्यंत अवघड किंवा धोकादायक असते. प्रत्यक्षात माणूस शतकांपासून प्राण्यांच्या खास क्षमतांचा वापर करत आला आहे. पूर्वी संदेश पोहोचविण्यासाठी कबुतरांची मदत घेतली जात होती आणि आता पोलीस तपासात श्वानांची मदत घेत असतात.

Advertisement

आता याच परंपरेला एक नवे आणि तांत्रिक रुप देत जर्मनीतील स्टार्टअप कंपनी स्वार्म बायोटॅक्टिक्सने कीड्यांना हेर आणि शोध-बचाव अभियानांसाठी तयार करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत झुरळांच्या शरीरावर अत्यंत छोटे, खास डिझाइन केलेले ‘मिनी बॅकपॅक’ लावले जातात. या बॅकपॅक्समध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे लावलेली असतात, जी झुरळांची नैसर्गिक चपळता आणि अरुंद जागांमध्ये शिरण्याच्या क्षमतेचा लाभ उचलतात. जेथे मोठे ड्रोन फसू शकतात, किंवा माणसांच्या जीवाला धोका असतो, तेथे हे छोटे जैव-रोबोट सहजपणे पोहोचू शकतात असे कंपनीचे मानणे आहे.

अशाप्रकारे काम करणार झुरळ

Advertisement

तांत्रिक स्वरुपात ही यंत्रणा अत्यंत रंजक आहे. झुरळांच्या हार्नेसमध्ये छोटे छोटे इलेक्ट्रोड लावले जातात, जे त्यांच्या एंटीनाशी जोडलेले असतात. एंटीना झुरळांचा सर्वात महत्त्वाचा सेंसरी अवयवय असतो, ज्याच्या मदतीने ते मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना समजून घेतात. या इलेक्ट्रोड्सद्वारे वैज्ञानिक सौम्य संकेत पाठवून झुरळांना कुठलीही खास दिशा किंवा लक्ष्याच्या दिशेने गाइड करू शकतात. स्वार्म बायोटॅक्टिक्स झुरळांना पूर्णपणे नियंत्रित करत नाही, तर केवळ त्यांची दिशा निश्चित करण्यास मदत करते. या जैव-रोबोटिक झुरळांना जीपीएस मॉड्यूल, मायक्रोफोन आणि अत्यंत छोट्या कॅमेऱ्यांनी युक्त केले जातेय, जेणेकरून ते आतील छायाचित्रे, आवाज आणि लोकेशनची माहिती पाठवू शकतील.

विशिष्ट प्रजातीची निवड

या प्रकल्पासाठी मादागास्कर डिस्सिंग कॉकरोचच्या प्रजातीला निवडण्यात आले आहे. याचे कारण याचा मोठा आकार असून ज्यामुळे ते कुठल्याही त्रासाशिवाय छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरणे वाहून नेऊ शकते. अलिकडेच स्वार्म बायोटॅक्टिक्सने सुमारे 13 दशलक्ष युरोचा निधी जमविला असून यातून हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर काढत प्रत्यक्षात आजमविण्याची तयारी होतेय.

Advertisement
Tags :

.